Arangaon mob lynching | वंजारवाडीच्या ग्रामस्थांनी दिला 04 दिवसांचा अल्टीमेटम

खोटे गुन्हे मागे न घेतल्यास दिला उपोषणाचा इशारा

 

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्यातील अरणगावमध्ये आष्टीच्या चौघांना अमानुष मारहाण केल्याप्रकरणी (Arangaon mob lynching) गंभीर गुन्हे दाखल झाल्यानंतर त्या विरोधात आता वंजारवाडीकर एकवटले आहेत. ग्रामस्थांनी सोमवारी गावात वंजाारवाडीत बैठक घेऊन सदर प्रकरणात खोटे गुन्हे दाखल झाल्याचा आरोप केला आहे.

चर्चेतल्या बातम्या

वंजारवाडी ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार अरणगाव येथे शुक्रवारी घडलेल्या घटनेतील फिर्यादी व त्यांचे साथीदार हे सराईत गुन्हेगार असून त्यांनीच वंजारवाडीत घरफोड्या केल्या आहेत असा आरोप केला आहे.

आष्टीच्या  लोकांवर चोरीचे गुन्हे दाखल करा व वंजारवाडीतील निरपराध लोकांविरोधात दाखल करण्यात आलेले गंभीर गुन्हे मागे घ्या अशी मागणी वंजारवाडीच्या ग्रामस्थांनी  सोमवारी जामखेड पोलिस स्टेशन व तहसिल कार्यालयाला दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. चार दिवसांत कारवाई न झाल्यास उपोषणास बसण्याचाही इशारा यावेळी देण्यात आला आहे. (Arangaon mob lynching)

यावेळी सरपंच शाहूराव जायभाय, सुरेश जायभाय, बबन जायभाय, बाळासाहेब जायभाय, बाळासाहेब सांगळे, अजिनाथ जायभाय, गोकुळ मिसाळ, विठ्ठल जायभाय,  विशाल डोळे, बाबासाहेब जायभाय, विश्वनाथ जायभाय, सुनिता जायभाय, हरी करांडे, शरद शिंदे, सरपंच बाबासाहेब शिंदे, धनंजय काळाणे सह आदींनी प्रशासनाला निवेदन दिले. या निवेदनावर दोनशे पेक्षा अधिक ग्रामस्थांच्या सह्या आहेत.

वंजारवाडी ग्रामस्थांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शुक्रवारी (ता.०६रोजी)  वंजारवाडीतील मधुकर दत्तु जायभाय, शिवाजी बाबासाहेब जायभाय , नाजुका बाबासाहेब जायभाय, आशाबाई व हनुमंत जायभाय यांच्या घराची कुलूप कडी तोडून घरातील सामानाची उचकापाचक करत पैसे व दागिणे चोरी होण्याची घटना दुपारी ०३ ते ०४ सुमारास घडली होती.  या घटनेची माहिती समजल्यानंतर तसेच ग्राम सुरक्षा यंत्रणेवर सदर घटनेची माहिती मिळाल्यानंतर गावातील व बाहेरगावातील तरूणांनी चोरांची गाडी आडवण्याचा प्रयत्न केला असता चोरांनी गाडी थांबवली नाही.

त्यानंतर पुढील गावात फोन करून सांगितल्यानंतर गाडी अरणगावमध्ये अडवण्यात आली. यावेळी विचारपूस केली असता चोरांनी उलट सुलट भाषा वापरत गाडी आवडणार्या मारहाण केली व काही चोरांनी त्यांच्या गाडीच्या स्वता:च काचा फोडल्या. तसेच चोर व जमावामध्ये बाचाबाची व किरकोळ मारामारी झाली. अरणगावमधील काही लोकांनी मध्यस्थी करत चोर व जमावाला बाजुला केले असे निवेदनात नमूद आहे. (Arangaon mob lynching).

तसेच निवेदनात पुढे म्हटले आहे की, या घटनेनंतर चोरांनी वंजारवाडीतील ज्यांच्या घरी चोरी झाली त्यांच्यासह गावातील काही प्रतिष्ठितांविरोधात खुनाचा प्रयत्न करणे यासह विविध कलमान्वये खोटे गुन्हे दाखल केले आहेत.चोरांनी दुसर्‍याच्या सांगण्यावरून वंजारवाडीतील प्रतिष्ठितांचे नावे गुन्ह्यात टाकले आहेत.सदर चोर सराईत असुन त्यांनी दाखल केलेला खोटा तातडीने गुन्हा मागे घ्यावा व चोरांविरोधात गुन्हे दाखल करावेत अशी मागणी करण्यात आली आहे.येत्या चार दिवसांत योग्य ती कारवाई न झाल्यास तहसिल कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा वंजारवाडीच्या ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

दरम्यान वंजारवाडीच्या ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनानंतर माध्यमांशी पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांनी संवाद साधला आहे. त्यांनी अरणगावची घटना माॅब लिंचिंगचा प्रकार नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे. (Arangaon mob lynching)