जामखेड : हळगाव कृषि महाविद्यालयाच्या मुलभूत सुविधांबाबत आमदार प्रा.राम शिंदे यांनी वेधले कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचे लक्ष !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्यातील हळगाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषि महाविद्यालयातील अपूर्ण मुलभूत सोयी सुविधा पुर्ण करण्यासाठी आमदार प्रा.राम शिंदे यांनी पुढाकार घेतला आहे. त्याच अनुषंगाने त्यांनी राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची आज भेट घेतली. या भेटीत शिंदे यांनी हळगाव कृषि महाविद्यालयातील मुलभूत सुविधा व विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांकडे कृषिमंत्र्यांचे लक्ष वेधले.

Jamkhed, MLA Prof. Ram Shinde drew the attention of Agriculture Minister Dhananjay Munde regarding the basic facilities of the Agricultural College!

फडणवीस सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री असताना आमदार प्रा.राम शिंदे यांच्याच पुढाकारातून जामखेड तालुक्यातील हळगाव येथे 100 एकर जागेत 65 कोटी रूपये खर्चाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषि महाविद्यालयाला सरकारने मंजुरी दिली होती.  महाविद्यालयाचे काम पुर्ण होऊन गेल्या वर्षीपासून हळगाव येथे कृषि महाविद्यालयाचे वर्ग नियमितपणे भरवले जाऊ लागले आहेत.आमदार प्रा.राम शिंदे यांच्या पुढाकारातून कृषि पदविकेचे शिक्षण जामखेड तालुक्यात उपलब्ध झाले आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषि महाविद्यालय हे नवीन असल्यामुळे या ठिकाणी अनेक मुलभूत सोयी सुविधा उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांना अनेक गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. यामुळे विद्यार्थ्यांनी मागील आठवड्यात यासंबंधी आवाज उठवला होता. याबाबतचे निवेदन त्यांनी आमदार प्रा.राम शिंदे यांना दिले होते.

आमदार प्रा.राम शिंदे यांनी याची तातडीने दखल घेऊन राज्याचे कृषि मंत्री धनंजय मुंडे यांची आज भेट घेतली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषि महाविद्यालयाच्या वीज पाणी व इतर मुलभूत सोयी सुविधांच्या प्रश्नाकडे त्यांनी कृषिमंत्र्यांचे लक्ष वेधले. याबाबत त्यांनी मुंडे यांना निवेदन दिले.या निवेदनासोबत विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

आमदार प्रा.राम शिंदे यांनी दिलेल्या निवेदनाची कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी  तातडीने दखल घेतली. महासंचालक MCEAR पुणे यांनी ‘अ’ बाबतचा प्रस्ताव तातडीने सादर करावा असे आदेश कृषिमंत्र्यांनी दिले आहेत. वर्षभरापासून अनेक गैरसोयींचा सामना करत असलेल्या हळगाव कृषि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा प्रश्न आमदार प्रा.राम शिंदे यांनी शासन दरबारी तातडीने पोहचवला. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी शासनस्तरावरून तातडीने हालचाली सुरू झाल्या आहेत. आमदार प्रा राम शिंदे यांच्या माध्यमांतून हळगाव कृषि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या समस्या लवकरच सुटणार आहेत. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.