Big Breaking : परिवहन मंत्री अनिल परब अडचणीत, मंत्री परबांच्या निकटवर्तीयांवर प्राप्तिकर विभागाचे २६ ठिकाणी छापेमारी

मुंबई  : राज्यात गेल्या काही दिवसांपासून भाजप विरूध्द महाविकास आघाडी हा संघर्ष शिगेला पोहचला आहे. भाजपकडून ठाकरे सरकारमधील अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करून राजकीय धुराळा उडवून दिला जात आहे. भाजपा नेत्यांच्या आरोपानंतर केंद्रीय तपास यंत्रणांकडून सरकारमधील अनेक नेत्यांच्या घरी अथवा निकटवर्तीयांच्या घरांवर धाडीवर धाडी पडत आहेत. विशेषता: ईडी कडून या कारवाया अधिक होत आहेत. राष्ट्रवादीचे दोन मंत्री ईडीने अटक केल्यानंतर आता नंबर कुणाचा अशी चर्चा होत आहे. अश्यातच शिवसेनेच्या गोटात खळबळ उडवून देणारी एक बातमी समोर आली आहे.

शिवसेनेचे जेष्ठ नेते तथा राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी संबंधित २६ ठिकाणी आयकर विभागानं धाडी टाकल्या आहेत. मुंबई, पुणे, सांगली, रत्नागिरीत आयकर विभागानं छापे टाकले आहेत. दापोली येथील जमीन व्यवहार प्रकरणात आयकर विभागाकडून कारवाई सुरू आहे.

अनिल परब यांचे निकटवर्तीय मानले जाणारे सदानंद कदम आयकर विभागाच्या रडारवर आहेत. याशिवाय परब यांच्या जवळच्या सरकारी अधिकाऱ्यांच्या घरांवरही छापे पडले आहेत. जमीन खरेदी प्रकरणात आयकर विभागाची कारवाई सुरू आहे. दापोलीतील जमीन खरेदी, तिथे बांधण्यात आलेलं रिसॉर्ट, त्यासाठी झालेले व्यवहार याचा तपास आयकर विभागाकडून सुरू आहे.

दापोलीमध्ये २०१७ मध्ये जमीन खरेदीचा व्यवहार झाला. एका व्यक्तीनं १ कोटी रुपये मोजून जमीन खरेदी केली. दोन वर्षांनंतर म्हणजेच २०१९ मध्ये जमिनीची नोंदणी करण्यात आली. २०२० मध्ये ही जमीन दुसऱ्या व्यक्तीनं खरेदी केली. या व्यक्तीचं नाव सदानंद कदम आहे. कदम हे परब यांचे निकटवर्तीय असून ते व्यवसायानं केबल ऑपरेटर आहेत.

२०२० मध्ये सदानंद कदम यांनी १ कोटी १० लाखाला जमीन खरेदी केली. त्यानंतर तिथे रिसॉर्ट बांधण्यात आलं. त्यासाठी ६ कोटी रुपयांचा खर्च आला. ही सगळी रक्कम रोख स्वरुपात खर्च करण्यात आली. रिसॉर्ट बांधताना सीआरझेडच्या नियमांचं उल्लंघन करण्यात आलं. या व्यवहारात मूल्यांकन कमी दाखवून कमी स्टॅम्प ड्युटी भरण्यात आली. त्यामुळे सरकारी तिजोरीत कमी महसूल झाला. सरकारची फसवणूक करण्यात आली, असा आयकर विभागाचा आरोप आहे.

दापोली जमीन खरेदी प्रकरणात एक सरकारी अधिकारीही आयकर विभागाच्या रडारवर आहे. हा अधिकारी परब यांचा निकटवर्तीय असल्याचं समजतं. आयकर विभागानं त्याचं नाव सांगितलेलं नाही. मात्र त्याच्या मालकीचा एक बंगला, फार्महाऊस असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

दरम्यान अनिल परब यांच्या निकटवर्तीयांवर आयकर विभागाकडून टाकण्यात आलेल्या धाडीनंतर भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी ट्विट केले आहे, त्यात म्हटले आहे की, आयकर विभागाच्या धाडींचे परिणाम: अनिल परब, सदानंद कदम, बजरंग खारमाटे हे कोट्यावधींची रोकड, अपारदर्शक व्यवहार व money laundering मध्य सहभागी असल्याचे आढळले असा दावा सोमय्या यांनी केला आहे. तसेच सोमय्या यांच्या ट्विटसोबत आयकर विभागाची प्रेसनोट देण्यात आली आहे. सोमय्या यांनी आयकर विभागाच्या धाडीनंतर ED ने सुद्धा कारवाई करावी अशी विनंती केली आहे.