काका पुतण्याच्या संघर्षाचा नवा अंक : राष्ट्रवादीला भगदाड पाडण्यासाठी शिवसेना सज्ज, बीडमध्ये आज होणार राजकीय भूकंप !

जामखेड टाईम्स वृत्तसेवा । बीडमध्ये राष्ट्रवादीला ‘दे धक्का’ देण्यासाठी शिवसेनेने कंबर कसली आहे. राष्ट्रवादीचे आमदार संदिप क्षीरसागर यांच्या समर्थकांनी ‘शिवबंधन’ हाती बांधण्याचा निर्णय घेतला आहे.माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर विरूध्द आमदार संदिप क्षीरसागर यांच्यातील संघर्ष टोकाला पोहचला आहे. काका पुतण्याच्या संघर्षाचा नवा अंक बीडच्या राजकारणात लिहिला जाऊ लागला आहे.

बीडचे आमदार संदिप क्षीरसागर यांचे कट्टर समर्थक असलेले अमर नाईकवाडे, फारूक पटेल, गंगाधर घुमरे, नितीन लोढा आणि प्रेमचंद हे पाच नेते आज सायंकाळी शिवसेनेत प्रवेश करणार आहे.(Five NCP leaders from Beed will join Shiv Sena today)

या नेत्यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत संदिप क्षीरसागर यांच्या विजयासाठी जीवाचे रान केले होते.परंतू निवडणुकीनंतर सन्मानाची वागणूक मिळत नसल्याने दुखावलेल्या नेत्यांनी हाती शिवबंधन बांधण्याचा निर्णय घेतला आहे. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली हे पाच नेते शिवसेनेत दाखल होणार आहेत.

राज्यात महाविकास आघाडी सत्तेत असली तरी बीडमध्ये मात्र महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादीत संघर्ष उफाळून आला आहे. बीडमध्ये काका विरूध्द पुतण्या या संघर्षातून महाविकास आघाडीत खदखद निर्माण झाली आहे. अमर नाईकवाडे यांनी ‘जय महाराष्ट्र, 28 मार्च’ असे सोशल मीडियावर लिहित शिवबंधन बांधण्याचे संकेत दिले आहेत.

बीड नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या गटाचे प्रमुख फारुक पटेल,अमर नाईकवाडे यासोबतच बीड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष गंगाधर घुमरे हे संदीप क्षीरसागर यांना सोडचिठ्ठी देऊन जयदत्त क्षीरसागर यांच्या नेतृत्वात शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.