महागाईचा डबल शाॅक  :  इंधन दरवाढीनंतर आता 800 औषधे महागणार

जामखेड टाईम्स वृत्तसेवा । गेल्या पाच दिवसांपासून देशात इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे, अश्यातच येत्या 1 एप्रिलपासून 800 औषधांच्या किमती वाढणार आहेत. यामुळे महागाईच्या डबल शाॅकने जनता मात्र बेजार होणार आहे. (Double shock of inflation, 800 drugs to go up after fuel price hike,)

आरोग्यासाठी महत्वाच्या असलेल्या औषधांच्या किमतीत येत्या एक एप्रिलपासून वाढ होणार आहे. पॅरासिटीमलसह 800 औषधांच्या किमतीत 10 टक्क्यांनी वाढ होणार आहे. यामुळे आरोग्याची काळजी घेणं महाग होणार आहे.

उच्च रक्तदाब, ताप, हृदयरोग, त्वचा रोगाच्या उपचारांमध्ये वापरली जाणारी औषधं महागणार आहेत. वेदनाशामक आणि एँटी बायोटिक फिनायटोईन सोडियम, मेट्रोनिडाझोलसारखी आवश्यक औषधांवरही परिणाम होणार आहे. केंद्र सरकारनं त्यासाठी हिरवा कंदिल दिला आहे. घाऊक महागाई दरात वाढ झाल्यानं औषधांच्या किमती वाढवाव्या लागत असल्याचं नॅशनल फार्मास्युटिकल प्राईसिंग ऑथरिटीनं (एनपीपीए) सांगितलं.

औषधांच्या किमती वाढवल्या जाव्यात अशी मागणी कोरोना संकट आल्यापासून या क्षेत्रातील कंपन्या करत होत्या. अखेर एनपीपीएनं औषधांचे दर १०.७ टक्क्यांनी वाढवण्यास मंजुरी दिली. त्यामुळे आवश्यक औषधांच्या किमती वाढतील. कोरोनाची मध्यम ते गंभीर लक्षणं असलेल्या रुग्णांच्या उपचारांसाठी आवश्यक असलेल्या औषधांचे दरही वाढणार आहेत.

इंधन दरवाढीचा शाॅक

आठवडाभरात चौथ्यांदा इंधन दरवाढ झाली आहे. आज 80 पैश्यांनी दरवाढ झाली आहे. पाच दिवसांत 3 रूपये 20 पैश्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. पाच राज्यातील निवडणूकानंतर पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ होईल असा अंदाज व्यक्त केला जात होता तो आता खरा ठरत आहे. देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत.

आज झालेल्या दरवाढीनुसार पेट्रोल प्रतिलिटर 114 च्या आसपास पोहचले आहे. तर डिझेल 97 रूपयांवर पोहचले आहे.येत्या काही दिवसांत डिझेल शतक झळकावेल असा अंदाज आहे. महागाईने जनता होरपळून निघाली आहे.