कर्जत – जामखेडमधील भाजपची साडेसाती रोहित पवार धुवून काढणार – धनंजय मुंडेंचा भाजपाविरोधात हल्लाबोल

जामखेड टाईम्स वृत्तसेवा | कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या ताब्यात दिला आणि अभूतपूर्व विकास या मतदारसंघाने पाहिला. त्यामुळे आता कर्जत नगरपंचायत ताब्यात द्या. आणि कर्जत शहराचा खरा विकास काय असतो ते पहा म्हणत असे म्हणत २१ डिसेंबरला राष्ट्रवादी- काँग्रेस आणि मित्रपक्षाच्या उमेदवारांना मताधिक्याने विजयी करा असे अवाहन सार्वजनिक न्याय मंत्री ना धनंजय मुंडे यांनी केले.

कर्जत येथे राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस आणि मित्रपक्षाच्या प्रचार सभेप्रसंगी मुंडे बोलत होते. यावेळी काँग्रेसचे युवा आयडॉल हार्दिक पटेल, आ रोहित पवार, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, बारामती ऍग्रोच्या विश्वस्त राजेंद्र पवार, सुनंदाताई पवार, सामाजिक कार्यकर्त्या सविता व्होरा आदी उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना ना धनंजय मुंडे म्हणाले की, बारा खात्याचे मंत्री असताना समोर बसलेल्या जनसमुदायाने रोहित पवार यांना आमदार केले. त्यांचे ऋण कधीच फेडता येणार नाही असे म्हणत कर्जत-जामखेडकराना धन्यवाद दिले. मतदारसंघातील भाजपाची २० वर्षाची साडेसाती आ रोहित पवार धुवून काढल्याशिवाय राहणार नाहीत. कोरोनातील दोन्ही संकटात आ पवार यांनी मोठी जबाबदारी मतदारसंघात पार पाडली. ओबीसी आरक्षणशिवाय निवडणुका घेऊ नका असे महाविकास आघाडी सरकार सांगत असताना केंद्र सरकारची एक शाखा असणारी निवडणूक आयोगाने ती फेटाळली. त्यामुळे राज्य सरकारने विनंती करून देखील राज्य निवडणूक आयोगाने दोन टप्प्यात निवडणूक घेत त्याचीच एक शाखा असल्याची प्रचिती दिली.

यावेळी काँग्रेसचे युवक आयडॉल हार्दिक पटेल म्हणाले की, गुजरातला आम्ही भाजपाच्या चांगल्या-चांगल्या व्यक्तींना जागेवर आणले तर येथील स्थानिक नेत्यांना पण त्यांची जागा दाखवू म्हणून आज कर्जतला आलो आहे. गुजरात मॉडेलच्या नावावर देशातील जनतेला फसवले जात आहे. गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या करत आहे. मोठ्या प्रमाणात अवैध वस्तूची तस्करी केली जात आहे. मात्र यावर कोणीच बोलत नसल्याचे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केले.

आ रोहित पवार यांच्याकडे विकासाची दूरदृष्टी आहे. निश्चित ते कर्जत-जामखेडचा विकास केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. दोन वर्षात २४० कोटी रुपयांचा निधी आ पवार यांनी आणले असून त्याचे फलित पुढील काही दिवसात पाहायला मिळेल. देशातील चोरा विरोधात आपल्या तरुणाईना लढायचे आहे असे म्हणत भाजपाचा समाचार घेतला. महाराष्ट्र कधी दिल्लीपुढे झुकला नाही असे म्हणत महाराष्ट्रातील नेत्यांचा गुणगौरव केला.

यावेळी आ रोहित पवार म्हणाले की, राजकारणात विरोधक असणारे भाजपा खालच्या पातळीवर जात टीका करीत आहे आपण मात्र कधीच त्या पातळीवर जाणार नाही असे म्हणत राम शिंदेना टोला लगावला. समोरचा जनसमुदाय पाहून आपली ऊर्जा वाढते. मतदारसंघात अजून फार बदल करायचा आहे. त्यासाठी आपल्या सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे. दोन वर्षात काय केले ? म्हणनाऱ्यानी एकदा समोर यावे त्यांना सांगतो आपण काय काय कामे केली ते पहा.

कर्जतच्या प्रलंबित प्रश्नांना प्राधान्याने सोडविणार आहे. बारामतीसारखीच एमआयडीसी कर्जतला आणायची आहे त्यासाठी पाठपुरावा सुरू आहे आणि ती आपण आणनारच म्हणत राम शिंदेचा समाचार घेतला. भविष्यात फक्त विकासाचेच काम करायचे आहे. सर्वाना स्वताचे घर देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. टपरीधारकांना आपण वाऱ्यावर सोडणार नाही असे आश्वासन देतो. परवा विरोधक एडीचा प्रवक्ता आणणार असल्याचे म्हणत किरीट सोमय्या यांचा उल्लेख करीत समाचार घेतला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके म्हणाले की, सध्याची निवडणूक एकतर्फी झाली असून आ रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मतदारसंघात विकासाचे प्रतीक आहे. माजीमंत्र्यानी माझी काळजी करू नये. मला पक्षात काय स्थान ते जनतेला माहीत आहे. आ पवारांची दहशत मात्र ती त्यांच्या विकासकामाची म्हणून शिंदे यांच्या पायाखालची वाळू सरकत आहे.

यावेळी काँग्रेसचे प्रवीण घुले, माजी सभापती नानासाहेब निकत, लीगल सेलचे अड सुरेश शिंदे, सरपंच अशोक जायभाय, विजय मोढळे, सूर्यकांत मोरे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष किरण पाटील, रघुआबा काळदाते यांची भाषणे झाली. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष काकासाहेब तापकीर, सभापती मनीषा जाधव, उपसभापती राजेंद्र गुंड, जी जि प सदस्य मोहिनी घुले, नितीन धांडे, प्रा विशाल मेहत्रे, दत्ता वारे, उमेश परहर, बारामती ऍग्रोचे सुभाष गुळवे, सचिन घुले, शरीफ पठाण, सुनील शेलार यांच्यासह महाआघाडीचे पदाधिकारी आणि मोठा जनसमुदाय उपस्थित होता.

भविष्यातील देशाचे युवक आयडॉल आ रोहित पवार – नामदेव राऊत

काँग्रेसचे युवक आयडॉल म्हणून देशात हार्दिक पटेल यांना पाहिले जात आहे. तसेच भविष्यात कर्जत-जामखेडचे आ रोहित पवार यांना देशाचे आयडॉल म्हणून पाहिले जाईल असे गौरव उदगार माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी केले. भाजपाच्या चिल्लर व्यक्तींनी आ पवार यांना लक्ष्य केल्यास यापुढे जसाच तसे उत्तर दिले जाईल असा टोला टीकाकारांना राऊत यांनी दिले.

भाजपा उमेदवार शिबा सय्यद यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

प्रभाग क्रमांक १४ चे भाजपाचे उमेदवार शिबा तारक सय्यद यांनी राष्ट्रवादीच्या ताराबाई कुलथे यांना ना धनंजय मुंडे, काँग्रेसचे युवा आयडॉल हार्दिक पटेल, आ रोहित पवार यांच्या उपस्थितीमध्ये जाहीर पाठींबा देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणुकीच्या अगोदरच जोगेश्वरवाडी आणि सोनारगल्ली दोन जागा बिनविरोध करीत माजीमंत्री राम शिंदे आणि खा सुजय विखे यांना आ पवार यांनी जोर का झटका देत आगामी येणाऱ्या राजकारणाचे रणशिंग फुकले.

——————————-

डाॅ अफरोज पठाण, कर्जत प्रतिनिधी