Jamkhed Letest News | वाळूंजकर राष्ट्रवादीच्या वाटेवर : राम शिंदेंना बसणार दुसरा धक्का 

सत्तार शेख । जामखेड टाईम्स वृत्तसेवा । Jamkhed Letest News | जामखेड तालुक्यात अगामी काळात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकांच्या तयारीने वेग घेतल्याचे दिसू लागले आहे. त्या पार्श्वभूमीवर जामखेड तालुक्यात पक्षांतराची लाट सक्रीय होण्याचे संकेत मिळू लागले आहेत.

राजकीयदृष्ट्या महत्वाच्या असलेल्या जवळा गावचे सरपंच प्रशांत शिंदे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेश निश्चित झाल्यानंतर आता भाजपमधून आणखीन एक नेता राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे.

अगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री राम शिंदे यांना जोरदार हादरे देण्याची तयारी राष्ट्रवादीने अर्थात आमदार रोहित पवार गटाकडून हाती घेण्यात सुरूवात झाली आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीकडून कर्जत तालुक्यात मोठे पक्षांतर घडवून आणले गेले होते.असेच पक्षांतर जामखेड तालुक्यातही घडवून आणण्याची तयारी राष्ट्रवादीने हाती घेतली आहे अशी माहिती समोर येत आहे.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पक्षांतराची लाट जवळा जिल्हा परिषद गटातून सक्रीय होणार आहे. विशेषता : या लाटेचा तडाखा भाजपला बसणार आहे. माजी मंत्री राम शिंदे यांचे विश्वासू सहकारी अशी ओळख असलेले जवळा गावचे उपसरपंच काकासाहेब वाळूंजकर हेही आता राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे.

चौंडी येथे माजी मंत्री राम शिंदे यांनी आयोजित केलेल्या दिवाळी फराळ कार्यक्रमात भाजपचे नेते काकासाहेब वाळूंजकर यांनी हजेरी लावली होती. यावेळी वाळूंजकर हे राम शिंदे यांच्या सोबत कायम राहतील असेच बोलले जात होते.परंतू त्यानंतर मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या आहेत. भाजपा नेते काकासाहेब वाळूंजकर यांना राष्ट्रवादीच्या गळाला लावण्यात आमदार पवार गटाला यश आल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान काकासाहेब वाळूंजकर यांच्या संभाव्य राष्ट्रवादी प्रवेशामुळे राम शिंदे यांच्या गटाला मोठा धक्का बसणार आहे. राम शिंदे यांच्या होमग्राऊंडमध्ये पक्षांतराचे वारे वाहू लागल्याने राम शिंदे यांचा मजबूत बालेकिल्ला आता ढासळताना दिसू लागला आहे. जवळ्यातून प्रशांत शिंदे व काकासाहेब वाळूंजकर या दोन्ही नेत्यांचा राष्ट्रवादीतील प्रवेश राम शिंदे यांना धक्का देणारा असणार आहे असेच राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

दरम्यान उपसरपंच काकासाहेब वाळूंजकर यांच्या राष्ट्रवादी प्रवेशासंबंधी वाळूंजकर यांच्याशी संपर्क साधला असता वाळूंजकर यांनी होय आमचं ठरलयं असे सांगत राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे जामखेड टाईम्सशी बोलताना सांगितले.

उपसरपंच काकासाहेब वाळूंजकर यांनी राम शिंदेंची साथ सोडून राष्ट्रवादी प्रवेशाचा निर्णय घेतल्याने जवळ्यातून भाजपची मोठी पिछेहाट होणार असल्याचे निश्चित आहे.