जामखेड टाइम्स वृत्तसेवा । विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. त्यात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार भाषण करत असताना सत्ताधारी पक्षातील काही आमदारांनी गोंधळ घातला. तेव्हा अजितदादा चांगलेच संतापले. विधानसभेत अर्थ खात्याच्या पुरवणी मागण्यांवर अजित पवार भाषणास उभे होते.
अजित पवार बोलताना सत्ताधारी बाकांवर गोंधळ झाला. तेव्हा अजित पवारांनी सांगितले की, मगाशीच तुम्हाला म्हटलंय जे बोलायचं ते उठून बोला. थांब बाबा, तुलाच फार कळतंय का, आम्ही इथं गोट्या खेळायला आलोय का? असा संतापून सवाल केला. गेल्यावर्षी 4 कोटी आमदार निधी केला. त्यानंतर यंदा अर्थसंकल्पात 5 कोटी आमदार निधी केला. अर्थमंत्री असताना हा शिवसेना, भाजपाचा, अपक्ष, बच्चू कडूंच्या प्रहारचा असा कुठलाही भेदभाव मी केला नाही असं स्पष्टीकरण अजित पवारांनी दिलं.
देवेंद्र फडणवीसांनी मनाचा मोठेपणा दाखवावा. 25 -15 निधीची सुपीक कल्पना नेत्यांच्या डोक्यात आली. त्याचा वापरही मीदेखील मोठ्या प्रमाणात केला. 25 – 15 निधी देताना आम्ही महाविकास आघाडीच्या आमदारांना 5-5 कोटींचा निधी दिला हे आम्ही मान्य करतो. परंतु त्याचवेळेस तुमच्याकडून याद्या घेऊन तुमच्याही आमदारांना 2-2 कोटींचा निधी दिला. 2 कोटी दिले नाहीत 1 कोटी दिले असंही अजित पवारांनी सभागृहात म्हटलं. अजित पवारांच्या या विधानावरून सभागृहात गोंधळ झाला. तेव्हा अजित पवार संतापल्याचं पाहायला मिळालं.
महाविकास आघाडी सरकारमध्ये निधी वाटप करताना शिवसेनेच्या आमदारांना निधी दिला जात नव्हता. जास्त निधी राष्ट्रवादीच्या आमदारांना मिळायचा कारण त्यांच्याकडे अर्थ खाते होते. निधी वाटपात अन्याय झाल्याचा सातत्याने आरोप शिंदे गटातील आमदारांनी बंडखोरीनंतर केला. शिवसेनेसह काँग्रेसनेही आमदारांना निधी मिळत नसल्याचा आरोप केला होता. विधानसभेत आज अर्थ खात्याच्या पुरवणी मागण्यांवर अजित पवारांनी या गोष्टीवर भाष्य केले. मात्र त्यावेळी निधी वाटपावरून सत्ताधारी पक्षातील आमदारांनी गोंधळ घातला. त्यावर अजित पवारांनी संतापून भाष्य केले.