Karjat Nagar Panchayat election | कर्जतमध्ये महाविकास आघाडी होण्याची शक्यता धुसर, काँग्रेस 17 जागांवर लढणार?

सोमवारी काँग्रेस घेणार इच्छूकांच्या मुलाखती

जामखेड टाईम्स वृत्तसेवा । डाॅ अफरोज पठाण। कर्जत नगरपंचायत निवडणूकीत (Karjat Nagar Panchayat election) महाविकास आघाडी एकदिलाने निवडणूक लढवणार अश्या राजकीय वल्गना झाल्या खऱ्या पण काँग्रेसने (Congress)17 जागांसाठी सोमवारी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्याचा निर्णय घेतल्याने महाविकास विकास आघाडी होण्याची शक्यता आता धुसर दिसू लागली आहे.

कर्जत नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेस सर्व 17 जागा लढवणार आहे. सोमवारी उमेदवारांच्या मुलाखती पार पडणार आहेत. काँग्रेसने शनिवारी रात्री उशिरा हा निर्णय संगमनेरमध्ये झालेल्या बैठकीत घेतला आहे अशी माहिती जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके आणि उपाध्यक्ष प्रवीण घुले यांनी दिली.

कर्जत नगरपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम (Karjat Nagar Panchayat elections) जाहीर झाला आहे. १७ प्रभागासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता अवघे दोनच दिवस बाकी असून आजमितीस तरी महाविकास आघाडी अथवा युती की स्वबळ याची राजकीय स्थिती स्पष्ट झालेली नाही. यामुळे मागील तीन दिवसात एक ही उमेदवारी अर्ज दाखल झाला नव्हता.

जामखेडमधील एका कार्यक्रमात आ रोहित पवार यांनी कर्जत नगरपंचायत निवडणूक महाविकास आघाडी करूनच लढवली जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली होती. याबाबत मागील चार-पाच दिवसापासून राजकीय खलबते देखील सुरू होते. महाविकास आघाडी की स्वबळ यात इच्छुक उमेदवार देखील भरडले जात होते. त्यामुळे तीन दिवसांत अर्ज भरण्याकडे एक ही उमेदवार फिरकला नव्हता.

शनिवारी संगमनेर येथे महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या निवासस्थानी कर्जतच्या स्थानिक काँग्रेसची बैठक संपन्न झाली. यात कर्जतच्या सद्यपरिस्थितीची माहिती पदाधिकाऱ्यांनी थोरात यांच्यासमोर मांडली. अखेर सर्व पदाधिकाऱ्यांच्या भावना लक्षात घेता कर्जत नगरपंचायतीमध्ये काँग्रेस स्वतंत्र लढेल यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.शनिवारी रात्री उशिरा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके आणि उपाध्यक्ष प्रवीण घुले यांनी याची माहिती पत्रकारांना दिली. सोमवारी १७ प्रभागासाठी काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांची मुलाखती पक्ष निरीक्षक यांच्या उपस्थितीमध्ये पार पडणार आहेत.

स्वबळाचा नारा त्रिशंकुच्या दिशेने?

कर्जत नगरपंचायत निवडणुकीत सर्वच प्रमुख पक्ष स्वबळावर निवडणुकीस सामोरे गेल्यास जनतेचा कौल त्रिशंकू राहील. भाजपा माजीमंत्री राम शिंदे आणि खा सुजय विखे यांच्या मार्गदर्शनाखाली मैदानात उतरेल तर राष्ट्रवादी आ रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली जोरदार ताकद लावेल. काँग्रेस व शिवसेनाही मैदानात स्वतंत्र लढले तर कोणत्याही एका पक्षाला पूर्ण बहुमत मिळण्याची शक्यता धुसर आहे.या निवडणूकीत बंडखोर उमेदवार आणि अपक्ष उमेदवार तसेच इतर छोट्या पक्षांचे उमेदवार कसे बॅटिंग करतात हेही पहावे लागणार आहे. एकुणच कर्जतमधील लढती आता अतिशय चुरशीच्या होणार हे जवळपास स्पष्ट आहे.

सोमवारी भाजपा उमेदवारी अर्ज दाखल करणार

दि १ डिसेंबर रोजीच भाजपाने आपल्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती माजीमंत्री राम शिंदे आणि पक्ष निरीक्षक बाळासाहेब महाडीक यांच्या उपस्थितीमध्ये पार पाडल्या. यामध्ये १७ प्रभागासाठी ६३ इच्छुकांनी मुलाखती दिल्या होत्या. सोमवार, दि ६ रोजी राम शिंदे, खा सुजय विखे, जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे यांच्या उपस्थितीत भाजपा उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती माजीमंत्री राम शिंदे यांनी दिली.

१३ रोजी होणार लढतीचे चित्र स्पष्ट

मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत असून सर्वच राजकीय पक्ष आपले एबी फॉर्म उमेदवारी अर्जासोबत जोडतील. यानंतर १३ तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज माघार घेण्याची मुदत असल्याने या मधल्या काळात अनेक ठिकाणी तडजोडी होऊन महाविकास आघाडी की युती ? की स्वबळ अशा स्पष्ट लढती पहावयास मिळेल. मात्र काही प्रभागात इच्छुक उमेदवारांची भाऊ गर्दी पाहता तेथे तिरंगी अथवा चौरंगी लढती अस्तित्वात येतील.