Omicron first patient found in Maharashtra | धक्कादायक  : ओमिक्रॉनचा महाराष्ट्रात पहिला रुग्ण आढळला, राज्यातील पहिला रुग्ण या शहरात आढळून आल्याने उडाली मोठी खळबळ ! !

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : Omicron first patient found in Maharashtra । जगाची झोप उडवून देणाऱ्या ओमिक्रॉन कोरोना विषाणूने महाराष्ट्रात धडक मारली आहे. राज्यात ओमिक्रॉनचा पहिला रूग्ण आढळून आल्याने महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली आहे.

ओमिक्रॉन कोरोना व्हेरिएंट हा दक्षिण आफ्रिकेतून समोर आला आहे. आफ्रिकेत या व्हेरिएंटने मोठा धुमाकुळ घातलेला आहे. अश्यातच दक्षिण आफ्रिका व तत्सम अति धोकादायक देशांमधून भारतात परतलेल्या परदेशी प्रवाश्यांचा शोध घेऊन कोरोना तपासणी केली जात आहे.

अश्यातच 24 नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन शहरामधून दुबई आणि दिल्लीमार्गे मुंबईमध्ये आलेल्या ३३ वर्षीय तरुणामध्ये ओमिक्रॉन व्हेरियंट सापडल्याचे प्रयोगशाळा तपासणीतून सिद्ध झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

ओमिक्रॉन या विषाणूने महाराष्ट्रात प्रवेश केल्याचे आता स्पष्ट झाले आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात राज्यातील पहिला ओमायक्रॉनचा रूग्ण आढळून आला आहे. संबंधित रूग्णाने कोविड प्रतिबंधक लस घेतली नसल्याचेही समोर आले आहे.

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील रहिवाशी असलेल्या या 33 वर्षीय ओमिक्रॉन रुग्णाला 24 नोव्हेंबर रोजी सौम्य ताप आला होता. त्याला इतर कुठलेही लक्षणे नाहीत.या रुग्णाचा आजार सौम्य स्वरूपाचा आहे.सध्या कल्याण डोंबिवली येथील कोविड केअर सेंटर मध्ये तो उपचार घेत आहे.

राज्यात आढळून आलेल्या पहिल्या ओमिक्रॉन रुग्णाच्या संपर्कात आलेल्या 35 जणांचा शोध घेण्यात आला आहे. यातील 12 जण अति जोखम निकट सहवासित आहेत तर 23 जण कमी जोखमी निकट सहवासित आहेत.या सर्वांच्या कोरोना तपासणी करण्यात आल्या आहेत. ते सर्वजण कोरोना निगेटिव्ह आढळून आले आहेत.

याशिवाय या तरूणाने दिल्ली ते मुंबई ज्या विमानाने प्रवास केला त्या विमानातील 25 सहप्रवाशांची देखील तपासणी करण्यात आली असून यापैकी सर्वजण कोविड निगेटिव्ह आढळलेले आहेत. या शिवाय आणखी निकटसहवासितांचा शोध घेण्यात येत आहे.

पुण्यात आढळला डेल्टा सबलिनिएज विषाणू

झांबिया देशातून पुणे येथे आलेल्या ६० वर्षीय पुरुषाच्या जनुकीय तपासणीचा अहवालही राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडून प्राप्त झाला असून या रुग्णामध्ये ओमायक्रॉन आढळलेला नाही तथापी डेल्टा सबलिनिएज विषाणू आढळून आलेला आहे.

मुंबई विमानतळावर कसून तपासणी

आज सकाळपर्यंत मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर अति जोखमीच्या देशातून आलेल्या 3839 प्रवाशांची RTPCR तपासणी करण्यात आली आहे. तर इतर देशांमधून आलेल्या 17107 प्रवाशांपैकी 344 प्रवाशांची RTPCR तपासणी करण्यात आली आहे. मुंबई विमानतळावरील तपासणीत 01 डिसेंबरपासून आतापर्यंत 8 प्रवासी कोविड बाधित आढळले असून त्यांचे नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

क्षेत्रिय पातळीवर सर्वेक्षण सुरु

या शिवाय राज्यात 01 नोव्हेंबर पासून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे देखील क्षेत्रिय पातळीवर सर्वेक्षण सुरु आहे. विषाणूमध्ये बदल होणे ही नैसर्गिक प्रक्रिया असून या बाबत जनतेने भीती न बाळगता आपल्या नेहमीच्या व्यवहारात कोविड अनुरुप वर्तनाचा अंगिकार करावा, नागरिकांनी आपले लसीकरण पूर्ण करावे आणि मागील महिनाभरात जे प्रवासी आंतरराष्ट्रीय प्रवास करून भारतात आले आहेत त्यांनीही आपल्या बाबत स्थानिक आरोग्य विभागास अवगत करावे, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने सर्व जनतेला करण्यात आले आहे.