विधानपरिषद सभापती पदासाठी राम शिंदेंचे नाव आघाडीवर, कर्जत – जामखेड मतदारसंघात भाजपात संचारला उत्साह

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । राज्यातील एकनाथ शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचे खाते वाटप जाहीर झाल्यानंतर भाजपने विधान परिषदेच्या सभापती निवडणुकीसाठी हालचाल सुरू केली आहे. या पदासाठी कर्जत – जामखेड मतदारसंघाचे सुपुत्र असलेले भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा आमदार राम शिंदे यांचे नाव अघाडीवर आले आहे. (Ram Shinde’s name on the front for the post of Legislative Council Speaker, BJP is excited in Karjat Jamkhed Constituency)

Ram Shinde's name on the front for the post of Legislative Council Speaker, BJP is excited in Karjat Jamkhed Constituency

कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार असताना तत्कालीन फडणवीस सरकारमध्ये राम शिंदे यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून काम केले आहे. आपल्या मंत्रिपदाच्या माध्यमांतून शिंदे यांनी मतदारसंघासाठी करोडो रूपयांचा निधी खेचून आणत राज्यात नवा विक्रम केला होता. राम शिंदे हे सध्या विधानपरिषदेचे सदस्य आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू सहकारी अशी त्यांची राज्याच्या राजकारणात ओळख आहे.

उद्या बुधवारपासून राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. शिंदे सरकारचे हे पहिले पावसाळी अधिवेशन असणार आहे. विधान परिषदेत आपला सभापती बसवण्यासाठी भाजपने हालचाली सुरू झाल्या आहेत. शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळात संधी न मिळालेल्या माजी मंत्री राम शिंदे (ram shinde) यांची विधानपरिषदेच्या सभापतीपदी वर्णी लागणार अशी चर्चा रंगली आहे.

विधानपरिषदेत निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी सभागृहाच्या सभापती पदावर आपल्या पक्षाचा नेता बसावा, यासाठी भाजपने हालचाली सुरू केल्या आहेत. सभागृहाच्या कामकाजावरील पकड घट्ट करण्यासाठी सभापतिपद मिळवण्याचा भाजपचा प्रयत्न असणार आहे. या पदासाठी विधानपरिषदेचे आमदार राम शिंदे यांचे नाव आघाडीवर असल्याची माहिती मिळते आहे.

आमदार राम शिंदे यांच्याकडे विधीमंडळीय कामकाजाचा गाढा अभ्यास आहे. राज्याच्या राजकारणात शिंदे हे अतिशय अभ्यासू आणि संयमी नेतृत्व म्हणून ओळखले जाते. भाजपाच्या नेतृत्वाच्या गुड बुकमध्ये त्यांना महत्वाचे स्थान आहे. त्यामुळे निवडणूक कोणतीही असो त्यात राम शिंदे यांचे नाव अघाडीवर असते.

आमदार राम शिंदे एकनिष्ठ नेते म्हणून पक्षात ओळखले जातात. पक्ष संघटनेत पक्ष देईल त्या जबाबदारीला न्याय देण्यासाठी ते नेहमी काम करत आले आहेत. टीम फडणवीसमध्ये जे मोजके विश्वासू नेत्यांचा सहभाग आहे त्यात राम शिंदे यांचा समावेश आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी म्हणूनही ते सध्या काम पाहत आहेत. राम शिंदे यांच्या रूपाने कर्जत जामखेड मतदारसंघाला पुन्हा एकदा लाल दिवा मिळणार असल्याने मतदारसंघातील भाजपात उत्साह संचारला आहे.

विधानपरिषदेतील पक्षीय बलाबल

भाजप – 24
शिवसेना 11
राष्ट्रवादी 10
काँग्रेसकडे 10
जागा रिक्त -16

रिक्त 16 जागांमध्ये राज्यपाल नियुक्त 12 जागांचाही समावेश आहे. विधान परिषदेचा सभापती निवडण्यापूर्वी या जागांची नियुक्ती झाल्यास भाजपचे संख्याबळ महाविकास आघाडी पेक्षा जास्त होईल आणि भाजपला विधान परिषदेतही बहुमत सिद्ध करता येईल.