रोहित पवार भडकले | विकास हा रक्तात असावा लागतो; बॅनर लावले म्हणजे कोणी शिल्पकार होत नसतो

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या दिवशी आमदार रोहित पवार यांनी पुन्हा एकदा भाजप व फडणवीस यांना लक्ष्य करत जोरदार टीका केली आहे.पुणे शहरात 'विकासपुरुष' आणि 'शिल्पकार नव्या पुण्याचे' या टॅग लाईनखाली विरोधी पक्षनेते देवेंद्र जी फडणवीस यांचे बॅनर झळकताना दिसले आणि ते पाहून हसायलाही आलं. पण असे बॅनर लावले म्हणजे कोणी शिल्पकार होत नसतो. हे पुणे आहे असे सांगत आमदार रोहित पवारांनी भाजपवर फेसबुक पोस्टद्वारे निशाणा साधला आहे.

आमदार रोहित पवारांनी फेसबुकवर एक सविस्तर पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये पुणे शहराचा विकास कुणी केला याचा पाढा वाचत भाजपवर जोरदार टीका केली आहे.आमदार रोहित पवारांनी आपल्या पोस्टमध्ये नेमकी काय भूमिका मांडली आहे.

आमदार रोहित पवार आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हणतात , आज जो काही पुणे आणि पिंपरी-चिंचवडचा विकास दिसतोय त्याला कारणीभूत आहेत माननीय अजितदादा... राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकार सत्तेत असताना आणि महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची सत्ता असताना पुणे शहराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च करण्यात आला.आघाडी सरकारच्या काळात अर्थमंत्री असताना राज्यात सगळ्या विभागासाठी भरीव निधी दिलाच पण जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याने पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासासाठी निधी देताना अजितदादांनी कधीच हातचं राखून ठेवलं नाही. त्याचीच परिणीती आज पुणे शहराच्या विकासात दिसतेय.

संचेती हॉस्पिटल जवळचा उड्डाणपूल, बालाजीनगर, बंडगार्डन, स्वारगेट, मुंढवा, मगरपट्टा चौक, फुरसुंगी, हडपसर, खराडी, होळकर ब्रीज, कर्वे रस्ता वारजे, वडगाव धायरी, बंडगार्डन येथील दोन्ही पूल, कल्याणीनगर तसंच गणेशखिंड रस्त्यावरील उड्डाणपूल या सर्व उड्डाणपुलांचं जाळं अजितदादांच्या सहकार्यामुळंच विणलं गेलं. यामुळं वाहतूक कोंडीत अडकलेल्या पुणे शहराला मोकळा श्वास घेता आला. गेल्या साडेचार वर्षात भाजपने केवळ सेव्हन लव्हज चौकाकडून मार्केट यार्डकडं जाणाऱ्या रस्त्यावरचा एकमेव उड्डाणपूल बांधला.

पुणे शहरातील उद्यानांची संख्या ७० वरुन १८४ पर्यंत नेण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसची महापालिकेत सत्ता असताना केलं. भाजपच्या सत्ताकाळात २० सुद्धा गार्डन यांना करता आले नाहीत. पुणे ही राज्याची सांस्कृतिक राजधानी. हे लक्षात घेऊन अजितदादांच्या सहकार्याने राज्यात सर्वाधिक नाट्यगृहे पुण्यात निर्माण केली. महात्मा फुले नाट्यगृह, स्व. विठ्ठल तुपे नाट्यगृह, छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह, बिबवेवाडी आणि येरवडा येथील अण्णाभाऊ साठे नाट्यगृह, पंडित जवाहरलाल नेहरू आर्ट गॅलरी, बाळासाहेब ठाकरे कलादालन, सयाजीराव गायकवाड नाट्यगृह ही सर्व नाट्यगृहे अजितदादा आणि राष्ट्रवादी काँग्रेसने उभारून सांस्कृतिक पुणे ही शहराची ओळख अधिक ठसठशीत केली.

पर्वती, लष्कर, वडगाव, वारजे, होळकर ब्रीज इथले जलशुद्धीकरण केंद्रासाठीही अजितदादांनीच सहकार्य केल्यामुळं शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा योग्य पुरवठा होण्यास मदत झाली. आज पुण्यात मेट्रोचं काम दिसत असलं तरी मेट्रोचा प्रस्ताव हा राष्ट्रवादी काँग्रेस महापालिकेत सत्तेत असताना मंजूर केलाय, हे पुणेकरांना माहीत आहे. किंबहुना मेट्रोसाठी राज्य सरकारच्या वाट्याचा निधी देण्यास अजितदादांनी केलेले प्रयत्नही विसरता येणार नाहीत.

शहराच्या पूर्व भागातील सुमारे १५ लाख लोकसंख्येसाठी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भामा आसखेड पाणी योजनेमुळे निकाली निघाला आणि ही योजना आखण्यापासून ती पूर्णत्वास नेण्यापर्यंत अजितदादांनी केलेले प्रयत्न, दिलेला निधी याची माहिती पुणेकरांना आहे. या योजनेचं ८० % काम अजितदादांनी उपमुख्यमंत्री असताना पूर्ण केलं. त्यानंतर राज्यात भाजपची सत्ता आली, पण पाच वर्षात त्यांना उर्वरित २० % कामही पूर्ण करता आलं नाही. शेवटी राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यानंतरच राहिलेलं कामही अजितदादांनी पूर्ण केलं.

पुण्यातील ससून हॉस्पिटल म्हणजे पुण्यासह सातारा आणि नगर जिल्ह्यातील गरीब रुग्णांसाठी हक्काचं ठिकाण. इथं नेहमीच रुग्णांची प्रचंड गर्दी असते. ही बाब लक्षात घेऊन ससून रुग्णालयासाठी अजितदादांनी १५ मजली देखणी इमारत उभारली. अजितदादांनी ही इमारत उभारली पण सत्ता गेल्यानंतर भाजप सरकारला त्यातील अंतर्गत कामंही पाच वर्षे पूर्ण करता आली नाहीत. विशेष म्हणजे कोविड महामारीच्या आजच्या काळात हीच नवीन इमारत रुग्णांवर उपचार करण्यासाठी कामी आलीय आणि शेवटी अपूर्ण राहिलेलं काम गेल्या दिड वर्षात अजितदादांनीच पूर्ण केलं.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीबाबतही असंच सांगता येईल. या इमारतीचा आराखडा मंजूर बनवण्यापासून तर अगदी इमारत उभारताना बांधकामावर पाणी मारले की नाही आणि किती मारले, मटेरियल कोणत्या दर्जाचं वापरलं जातं अशा बारीक-बारीक गोष्टींवर अजितदादांनी अहोरात्र लक्ष दिलंय. त्यामुळं राज्यातील पहिली शासकीय ग्रीन बिल्डिंग म्हणून पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाची आकर्षक इमारत दिमाखात उभी असल्याचं आपल्याला दिसतं.आघाडी सरकारच्या काळात या इमारतीला अजितदादांनी एक रुपयाही निधी कमी पडू दिला नाही. पण सत्ता गेल्यानंतर या इमारतीत असलेल्या सभागृहाचं काम पूर्ण करायला भाजप सरकारला दोन-अडीच वर्षे लागली. हा यांचा ‘विकास’!

या इमारतीबाबत एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख करावा लागेल तो म्हणजे उदघाटनाच्या कार्यक्रमाचा. या इमारतीचं संपूर्ण काम अजितदादांनी पूर्ण केलं पण उदघाटन करताना मात्र अजितदादांना बोलावण्याचं सौजन्यही भाजप सरकारने दाखवलं नाही. याला काय म्हणावं? पण तरीही उदघाटनाच्या एक दिवस आधी रात्री उशिरा इथं येऊन सर्व काम व्यवस्थित झालंय की नाही याची अजितदादांनी पाहणी केली. याला म्हणतात विकासाशी असलेली निष्ठा!

मला भाजपला सांगायचंय की विकास हा असा रक्तात असावा लागतो.जनतेशी बांधिलकी, प्रशासनावरची पकड, विकास करताना लागणारी सौंदर्यदृष्टी, कामाचं सातत्य याबाबत अजितदादांचा हात कुणीही धरू शकत नाही. कामाच्या दर्जाबाबत कोणतीही तडजोड अजितदादांनी कधी केली नाही.पुण्यातील जिल्हा परिषदेची भव्य इमारत, नवीन सर्किट हाऊस, समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहाच्या इमारती यासाठी निधी हा अजितदादांनीच दिला. हे सर्व सांगायचं कारण म्हणजे गेल्या काही दिवसांपासून शहरात 'विकासपुरुष' आणि 'शिल्पकार नव्या पुण्याचे' या टॅग लाईनखाली विरोधी पक्षनेते देवेंद्र जी फडणवीस यांचे बॅनर शहरात झळकताना दिसले आणि ते पाहून हसायलाही आलं. पण असे बॅनर लावले म्हणजे कोणी शिल्पकार होत नसतो. हे पुणे आहे.

बॅनर लावणाऱ्यांनी जगाला ज्ञान द्यावं, पण पुणेकरांना ज्ञान देण्याच्या भानगडीत पडून हाताने हसू करून घेऊ नये. कदाचित फडणवीस साहेबांना याची काही माहितीही नसेल, पण त्यांना खूष करण्यासाठी काही नेत्यांनी हा उद्योग केला असावा, असं वाटतंय! गेल्या वेळी याच पुणेकरांनी भाजपच्या पारड्यात भरभरून मताचं दान टाकलं, पण त्यांनी काय केलं याची नोंद ठेवण्यास पुणेकर कधीच विसरत नाहीत.

 

भाजपचे सगळेच नेते ‘स्मार्ट सिटी’चे ढोल पिटत होते ती स्मार्ट सिटी कुठंय? महापालिकेत सत्ता असताना अनेक रस्त्यांची चाळण झालेली आणि फुटपाथ उखडलेले दिसतात. फक्त रंगसफेदी करून ‘स्मार्ट सिटी’ होत नसते.भाजपच्या नेत्यांनी लक्षात घ्यावं, की पुणे हे नवं कधीच नव्हतं. पुण्याला मोठा आणि अभिमान वाटावा असा इतिहास आहे.आदरणीय पवार साहेबांनी मुख्यमंत्री असतानाच्या काळात पुणे, पिंपरी-चिंचवडला आयटी हब, ऑटोमोबाईल हब अशी ओळख निर्माण करून देऊन जगाच्या नकाशावर आणलं आणि अजितदादांनी ही ओळख अधिक दृढ केली.

आजही पिंपरी-चिंचवडमध्ये गेल्यावर तिथला विकास, रस्ते, गार्डन हे सर्व पाहून परदेशात गेल्याचा फिल येतो, यामागे अजितदादांनी घेतलेली मेहनत आहे. असं असताना 'नव पुण्याचे शिल्पकार' अशी जाहिरातबाजी करायला त्यांच्या कार्यकर्त्यांना काहीच कसं वाटंत नाही?आज पेट्रोल- डिझेल, खाद्यतेल याचे भाव गगनाला भिडले आहेत. महागाईने सामान्य माणसाचं कंबरडं मोडलंय. असं असतानाही याविरोधात एखादा फ्लेक्स लावला असता तर सामान्य माणसासोबतच माझ्यासारख्यानेही त्याचं स्वागत केलं असतं. पण फक्त बॅनरबाजी आणि फ्लेक्सबाजी करुन हवेत विकास करण्याची सवय असलेल्या भाजपकडून अशी अपेक्षाही करणं चुकीचं आहे टोला रोहित पवारांनी लगावला आहे.