गोदड महाराजांचा कौल मिळेना; दुसर्‍या दिवशीही राम शिंदेंचे मौनव्रत ठिय्या अंदोलन सुरूच

जामखेड टाईम्स वृत्तसेवा । सत्तार शेख | कर्जत नगरपंचायत निवडणूकीचे वातावरण जोरदार पेटले आहे. अर्ज मागे घेण्याच्या दिवशी कर्जतमध्ये राजकीय नाट्याचा जोरदार धुराळा उडाला आहे. सत्ताधारी राष्ट्रवादीकडून राजकीय बळाचा वापर करण्यात आल्याच्या आरोपाने कर्जतच्या राजकीय मैदानातील राजकीय युध्द जोरदार तापले आहे.

अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी आमदार रोहित पवार गटाने दबावतंत्राचा वापर करत भाजपच्या उमेदवारांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यास भाग पाडल्याच्या निषेधार्थ माजी मंत्री प्रा राम शिंदे यांनी गोदड महाराजांच्या दरबारात मौनव्रत ठिय्या अंदोलन हाती घेतले आहे. सोमवारी दुपारपासून राम शिंदे व कर्जत भाजपने नेते व कार्यकर्ते गोदड महाराज मंदिरासमोर अंदोलन करताना दिसत आहेत.

सोमवारची संपुर्ण रात्र राम शिंदे व त्याच्या समर्थकांचा मुक्काम गोदड महाराजांच्या दरबारात होता. मंगळवारी सकाळी अंदोलन संपेल असे वाटत  होते मात्र अजुनहीअंदोलन सुरूच आहे. मंगळवारी सकाळपासून गोदड महाराज मंदिर परिसरात भाजपा कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होऊ लागली आहे.

मंगळवार दुपारी एक वाजेपर्यंत राम शिंदे यांनी सुरू केलेल्या मौनव्रत अंदोलनास <span;>आज दुसऱ्या दिवशी मोठा प्रतिसाद मिळाला. यावेळी भाजपाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी काळया फिती लावत विद्यमान आमदार रोहित पवार आणि प्रशासनाचा निषेध केला. गोदड महाराजांचा जोवर कौल मिळत नाही तोवर अंदोलन सुरूच राहणार असेच दिसत आहे. सध्या अंदोलन स्थळी पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे.

दरम्यान माजी मंत्री राम शिंदे, भाजपा  जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे, सचिन पोटरे, अंबादास पिसाळ, दादासाहेब सोनमाळी यांच्यासह स्थानिक भाजपा पदाधिकारी हे दुपार नंतर कर्जत शहरात मूक मोर्चा काढून निषेध नोंदविणार आहेत. मोर्चा नंतर राम शिंदे एकुणच संपुर्ण प्रकरणावर काय बोलणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

दरम्यान राम शिंदे यांनी हाती घेतलेल्या अंदोलनाची चर्चा राज्यात झाली आहे. राम शिंदे विरूध्द रोहित पवार या संघर्षामुळे कर्जत तालुका राज्याच्या राजकारणात पुन्हा चर्चेत आला आहे. कर्जतमध्ये सुरू असलेल्या या राजकीय संघर्षामुळे कर्जत जामखेडमधील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे.