राम शिंदेंच्या खांद्यावर भाजपने सोपवली मोठी जबाबदारी

जामखेड टाईम्स वृत्तसेवा ।  सत्तार शेख । कर्जत – जामखेड विधानसभा मतदारसंघाचे माजी मंत्री तथा भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा राम शिंदे यांच्या राजकीय पुनर्वसनासाठी भाजपाकडून शिंदे यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आल्याने अहमदनगर जिल्ह्यातील भाजपमध्ये उत्साह संचारला आहे.

माजी मंत्री राम शिंदे यांची भाजपच्या कोअर कमिटी सदस्यपदी पक्षाने निवड केली आहे. याबाबतची घोषणा बुधवारी पक्षाच्या बैठकीत करण्यात आली. राम शिंदे हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी म्हणून राज्याच्या राजकारणात ओळखले जातात.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील टीमने नुकत्याच पार पडलेल्या गोवा विधानसभा निवडणुकीत वेगवेगळ्या मतदारसंघात निवडणुकीचे जबरदस्त नियोजन केले होते. यात माजी मंत्री राम शिंदे यांचा समावेश होता. अनेक मतदारसंघात शिंदे यांनी पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी मोठी मेहनत घेतली होती.

गोवा विधानसभा निवडणुकीनंतर पक्षाने शिंदे यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. राम शिंदे यांची भाजपा कोअर कमिटी सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.

राज्यात अगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर भाजपची निवडणूक तयारी हाती घेतली आहे. बुधवारी मुंबईत पक्षाची बैठक पार पडली. या बैठकीत कोअर कमिटीचा विस्तार करण्यात आला. या विस्तारित कोअर कमिटीत माजी मंत्री प्रा राम शिंदे यांचा समावेश करण्यात आला आहे.

पक्षाचे ध्येय धोरणे , कार्य , नियोजन, दौरे ,यात्रा, प्रचार , प्रसार व आगामी सर्व निवडणुकीचे उमेदवार निवडणे, प्रचाराची रणनिती ठरवणे यासाठी ही कोअर समिती कार्य करते. या महत्वाच्या समितीत राम शिंदे यांना काम करण्याची संधी पक्षाने दिल्याने कर्जत – जामखेड मतदारसंघातील भाजपात नवचैतन्य संचारले आहे.

भाजपा कोअर कमिटीत यापुर्वी भाजपाचे दिवंगत नेते सूर्यभान वहाडणे व ना. स.फरांदे सरांना यापुर्वी अहमदनगर जिल्ह्यातून संधी मिळाली होती. त्यानंतर  प्रा. राम शिंदे यांच्या रूपाने अहमदनगर जिल्ह्याला तिसऱ्या कोअर कमिटीत संधी मिळाली आहे.राम शिंदे यांच्या निवडीमुळे शिंदे समर्थक जोशात आहेत.

राम शिंदे यांना मानणारा वर्ग राज्यात मोठ्या प्रमाणात आहे.याचा फायदा अगामी महानगरपालिका, नगरपरिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांमध्ये पक्षाला मोठा फायदा होणार आहे.