रशिया – युक्रेन युध्दातील मोठी घडामोड  : रशियाने केला युक्रेनमधील अणूऊर्जा प्रकल्पावर हल्ला, जगावर येणार मोठे संकट

जामखेड टाईम्स वृत्तसेवा । रशियाने युक्रेन विरोधातील युध्द अधिक गतीमान केले आहे. युक्रेनवर रशियाकडून वेगाने हल्ले चढवले जात आहेत. या युध्दाची भारताला सुध्दा बसली आहे. भारतातील हजारो विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकून पडले आहेत. याशिवाय दोघा विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. रशियाने युक्रेनवर जोरदार हल्ले सुरू ठेवले असतानाच युक्रेनमधून जगाची झोप उडवणारी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

युरोपमधील सर्वात मोठा अणूऊर्जा प्रकल्प युक्रेनमध्ये आहे. युक्रेनमधील झपोरेजिया (Zaporizhzhia NPP) अणूऊर्जा प्रकल्पाला आग लागली आहे. याबाबतची माहिती युक्रेनचे परराष्ट्र व्यवहार मंत्री दिमित्रो कुलेबा यांनी दिली आहे. या वृत्ताचे ट्विट ANI वृत्तसंस्थेने केले आहे.

युरोपातील सर्वात मोठे अणूऊर्जा प्रकल्प असलेल्या झपोरेजिया प्रकल्पाच्या इमारतीवर रशियन सैन्याकडून जोरदार गोळीबार सुरू आहे. यामुळे इमारत आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहे. ही आग लवकर आटोक्यात न आल्यास प्रकल्पाचा मोठा विस्फोट होऊ शकतो. जर असे झाले तर जगावर मोठे संकट येऊ शकतं.

या प्रकल्पातील अणूऊर्जा भट्टीचा स्फोट झाल्यास रेडिएशनचा मोठा धोका निर्माण होणार आहे. चर्नोबील पेक्षा दहा पट अधिक विध्वंस होण्याची भीती आहे. मानव जातीसाठी याचा मोठा धोका आहे. यामुळे रशियाकडून सुरू असलेले हल्ले त्वरित थांबवावेत अशी मागणी युक्रेनकडून केली जात आहे.

युक्रेनमधील अणूऊर्जा केंद्रातून युक्रेनसाठी आवश्यक असलेल्या एक तृतीयांश विजेचं उत्पादन केलं जातं, हा प्रकल्प पुर्व युक्रेनच्या झपोरेजिया शहरात आहे. हे शहर नीपर नदीच्या किनारी वसले आहे. रशियाने या अणूऊर्जा प्रकल्पावर संपुर्ण ताबा मिळवल्यास युक्रेनसाठी मोठा ठरणार आहे.

दरम्यान युक्रेनमधील अणूऊर्जा प्रकल्पाला लागलेल्या आगीमुळे युक्रेनवर वीज टंचाईचं मोठं संकट घोंघावत आहे. या प्रकल्पाची मोठी हानी झाल्यास युक्रेनमधील परिस्थिती बिघडू शकते असे तज्ञांचं म्हणणं आहे.