अखेर झोपलेल्या मोदी सरकारला आली जाग : गुरुवारपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर होणार कमी; जाणून घ्या किती स्वस्त होणार पेट्रोल आणि डिझेल

जामखेड टाईम्स वृत्तसेवा :  मंगळवारी पार पडलेल्या विधानसभा व लोकसभा पोटनिवडणुकीत जनतेने भाजपला अनेक ठिकाणी हिसका दाखवल्यानंतर मोदी सरकारचे डोळे उघडले आणि इंधन दरवाढीचा सुरू असलेला सिलसिला बुधवारी थांबला. दिवाळीच्या मुहूर्तावर मोदी सरकारने देशातील जनतेला दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोल डिझेलची दरवाढीने देशाची जनता हैराण झाली होती.पेट्रोलच्या दरात सलग ७ दिवस तर डिझेलच्या दरात सहा दिवस ३५-३५ पैशांची वाढ करण्यात आली होती. मंगळवारी पेट्रोलच्या किंमतीत ३५ पैशांची वाढ करण्यात आली होती. परंतु डिझेलच्या किंमतीत वाढ झाली नव्हती.देशात काही ठिकाणी पेट्रोलचे दर १२० रूपयांच्या पुढे गेले होते. तर डिझेलचे दरही १०० रूपयांच्या पुढे गेले होते यामुळे देशातील जनतेत मोदी सरकारविरोधी संताप पसरला होता.

मंगळवारी देशभरातील विधानसभा व लोकसभा निवडणुकीच्या पोटनिवडणुकीत भाजपला अनेक ठिकाणी पराभवास सामोरे जावे लागले होते. वाढती महागाई व इंधन दरवाढ हेच भाजपच्या पराभवाला कारण ठरल्याची बाब भाजपच्या नेत्यांनी बोलून दाखवली होती. गाढ झोपलेल्या मोदी सरकारला निवडणूक निकालानंतर जाग आली असून खडबडून जागे झालेल्या मोदी सरकारने  दिवाळीच्या तोंडावर उत्पादन शुल्कात (excise duty) कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पेट्रोलचे दर हे ५ रूपयांनी तर डिझेलचे दर हे १० रूपयांनी कमी होणार आहेत.

केंद्र सरकारनं पेट्रोल डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता पेट्रोलचे दर ५ रूपयांनी आणि डिझेलचे दर १० रूपयांनी कमी होणार आहेत. नवे दर गुरूवार पासून लागू होणार आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे महागाईनं त्रस्त झालेल्या देशवासीयांना काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे.