निवडणुका संपताच मोदी सरकारचा जनतेला मोठा झटका, पेट्रोल डिझेल पाठोपाठ घरगुती गॅस महागला !

मुंबई  :  देशातील पाच राज्यांच्या निवडणुका संपताच इंधन दरवाढीने पुन्हा डोके वर काढले आहे. पेट्रोल डिझेलसह गॅसच्या दरात वाढ झाल्याने सामान्यांना आर्थिक फटका बसणार आहे. इंधन दरवाढीमुळे राजकीय वर्तुळातून तिखट प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. निवडणूका संपताच पंतप्रधान मोदींनी जनतेला मोठा झटका दिला आहे. रशिया – युक्रेन युध्दामुळे कच्च्या तेलाचे भाव वाढल्याने इंधन दरवाढ झाल्याचे बोलले जात आहे.

देशात महागाईचा आगडोंब उसळलेला आहे. त्यातच इंधन दरवाढ झाल्याने सर्वसामान्यांना चारही बाजूने महागाईचा फटका बसत आहे. पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसच्या दरात वाढ झाली आहे. नव्या दर वाढीमुळे सामान्यांची आर्थिक गणिते बिघडली आहेत.

सरकारने घरगुती गॅसच्या दरात ५० रूपयांची वाढ केली आहे. १४.२ किलो वजनाच्या घरगुती गॅस सिलेंडरचा दर ५० रुपयांनी वाढवण्यात आला आहे. अनेक महिन्यांनी एलपीजी सिलेंडरचा दर वाढवण्यात आला आहे. याआधी ६ ऑक्टोबर २०१९ ला हा दर वाढवण्यात आला होता. दिल्लीमध्ये घरगुती गॅस सिलेंडरसाठी ९४९ रुपये ५ पैसे मोजावे लागत आहेत. याआधी ८९९ रुपये ५० पैसे मोजावे लागत होते.

देशात गेल्या अनेक महिन्यांपासून स्थिर असलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत अखेर वाढ झाली आहे. राष्ट्रीय स्तरावर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत ८० पैशांची वाढ करण्यात आली आहे. पेट्रोल ८४ तर डिझेल ८३ पैशांनी महागलं आहे.