- Advertisement -

Powerful launch of Rohit Pawar from Mahavikas Aghadi : महाविकास आघाडीकडून रोहित पवारांचे दमदार लाँचिंग ! 

मतदारसंघातील जनतेच्या अपेक्षा उंचावल्या 

जामखेड टाईम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । Powerful launch of Rohit Pawar from Mahavikas Aghadi । राज्यात गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी विरूध्द भाजप हा सामना रंगला आहे. भाजपकडून केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमांतून राज्य सरकारला हादरे देण्याचा आटोकाट प्रयत्न होत आहे.परंतू महाविकास आघाडी आता एकसंधपणे राजकीय डावपेच खेळताना दिसत आहे. राज्यात भाजपकडून निर्माण करण्यात आलेल्या नकारात्मक वातावरणाला छेद देण्यासाठी महाविकास आघाडीने विकास कामांना प्राधान्य देण्यास सुरूवात केली आहे.

महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी कर्जत – जामखेड मतदारसंघात हजेरी लावत कोट्यावधी रूपये खर्चाच्या विकास कामांचा नुकताच दणक्यात शुभारंभ केला आहे. महाविकास आघाडी आता राज्यात एकसंधपणे विकास कामांचा धुराळा उडवून देणार असल्याचे संकेत यातून मिळाले आहेत. महाविकास आघाडीची ही वाटचाल आता ग्रामीण भागात चर्चेचा विषय ठरली आहे.

कर्जत – जामखेड हा मतदारसंघ मराठवाड्यासह पुणे, सोलापूर जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातील मतदारसंघ आहे. शरद पवारांचे नातू रोहित पवार हे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. रोहित पवारांनी काही दिवसांपूर्वी देशातील सर्वात उंच भगवा स्वराज्य ध्वज खर्डा येथील ऐतिहासिक शिवपट्टण भुईकोट किल्ल्यासमोर उभारला आहे. या निमित्ताने कर्जत – जामखेडची राज्यभर चर्चा झाली. त्यातच आता महाविकास आघाडीतील बड्या मंत्र्यांनी एकाच दिवशी कर्जत – जामखेड तालुक्यात हजेरी लावत कोट्यावधी रूपये खर्चाच्या विकास कामांचा शुभारंभ केला.

या दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार, बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, राज्यमंत्री अब्दूल सत्तार, दत्ता मामा भरणे यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघात हजेरी लावली. महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी एकदिलाने  विकास कामांचा धडाका एकाच दिवशी सुरू केला. यातून तीनही पक्षांच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांना एकदिलाने राहण्याचा दिलेला संदेश महत्वाचा आहे. याचे पडसाद आता कर्जत – जामखेड शेजारील मतदारसंघातही उमटताना दिसणार आहेत.

याशिवाय अगामी काळात होऊ घातलेल्या कर्जत नगरपंचायत, जामखेड नगरपरिषद, मार्केट कमिटी, जिल्हा परिषद, पंचायत समिती या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी एकसंधपणे सामोरे जाणार असल्याचे संकेत अजित पवारांनी दिले आहेत. यामुळे मतदारसंघातील महाविकास आघाडीतील घटक पक्षांची योग्य पध्दतीने मोट बांधण्याचे मोठे अव्हान आमदार रोहित पवार यांच्या खांद्यावर येऊन ठेपले आहे.आमदार रोहित पवार हे महाविकास आघाडीतील घटक पक्षांना सन्मानाने अगामी काळात कसे सामावून घेणार हे पाहणे रंजक ठरणार आहे.

विधानसभा निवडणुकीला दोन वर्षे उलटली. मतदारसंघात विकास कामे ठप्प झाल्याचा आरोप विरोधी भाजपाकडून केला जात होता. माजी मंत्री राम शिंदे यांनी जोरदार हल्लाबोल करत मोठा धुराळा उडवून दिला होता. अश्यातच महाविकास आघाडीतील बड्या मंत्र्यांनी मतदारसंघात कोट्यावधी रूपयांच्या विकास कामांचा शुभारंभ केल्याने भाजपाच्या आरोपांची हवा निघून गेली आहे.

आमदार रोहित पवार यांनी मतदारसंघातील प्रशासकिय विभागांना बळ देण्याचा सपाटा लावला आहे. पहिल्या टप्प्यात विविध शासकीय कार्यालये, अधिकारी व कर्मचारी निवास्थाने उभारण्यास त्यांनी प्रारंभ केला आहे. त्यासाठी कोट्यावधीचा निधी आणण्यात त्यांना यश आले आहे.

दमदार लाँचिंग अन जनतेच्या वाढलेल्या अपेक्षा

आमदार रोहित पवार यांनी 13 नोव्हेंबर रोजी कर्जत व जामखेड या शहरात कोट्यावधी रूपये खर्चाच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन समारंभातून अजित पवार, अशोक चव्हाण, अब्दूल सत्तार, दत्ता मामा भरणे या मंत्र्यांची उपस्थिती तर होतीच शिवाय सर्वच मंत्र्यांनी रोहित पवारांवर स्तुस्तीसुमने उधळली. महाविकास आघाडीकडून आमदार रोहित पवारांचे पुन्हा एकदा नव्याने जोरदार लाँचिंग घडवून आणण्यात आले. यामुळे कर्जत – जामखेड मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेच्या आमदार रोहित पवार यांच्याकडून आता अधिकच अपेक्षा उंचावल्या आहेत.

रोजगार पाणी शिक्षण आणि रोहित पवार

कर्जत – जामखेड या दोन्ही तालुक्यात बेरोजगार तरुणांची संख्या मोठी आहे. या तरूणांच्या हाती काम मिळावे याकरिता दोन्ही तालुक्यात MIDC ला लवकर चालना मिळणे आवश्यक आहे. MIDC सुरू झाल्याशिवाय या भागातील तरूणांच्या हाताला हक्काचा रोजगार मिळणे अशक्य आहे. याशिवाय शिक्षणातही हा परिसर खूप मागास आहे. या भागात शिक्षणाच्या दर्जेदार सोयी उपलब्ध होणे आवश्यक आहेत. जामखेड तालुक्याला सर्वाधिक अपेक्षा कुकडीच्या पाण्याची आहे. हक्काचे पाणी कधी मिळणार याकडे तालुक्यातील बळीराजा मोठ्या आशेने आणि अपेक्षेने रोहित पवारांकडे नजरा लावून आहे.  रोजगार, पाणी, शिक्षण या विषयात जोवर मोठे निर्णय होऊन त्याचा थेट लाभ जनतेला होत नाही तोवर जनतेच्या अपेक्षा कायम असतील. येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वी या पैकी एक गोष्ट पुर्ण करण्याचा मोठा दबाव रोहित पवारांवर असणार आहे.