MPSC Success Story : गरिबांची लेकरं अधिकारी होऊ शकतात का ? त्यांनी हे स्वप्न पहावं का ? अधिकारी होण्यासाठी लागणारा अभ्यास गरिबांच्या लेकरांना झेपेल का ? या प्रश्नांचे उत्तर हो असेच आहे, कारण अभ्यासासाठी गरिब- श्रीमंत असा वर्ग करून चालत नाही, त्यासाठी हवी असते ध्येय गाठण्याची जिद्द, कठोर परिश्रमाची तयारी, अन् बौध्दिक कौशल्य. या जोरावर कुठलीही गोष्ट साध्य करता येते. आयुष्यात काही तरी बनाचयं हे ध्येय उराशी बाळगून झपाटल्यागत काम केलं तर अशक्यप्राय वाटणारी गोष्ट सहज साध्य करता येते. हेच सिध्द करून दाखवण्याची किमया साधला आहे कोल्हापूर जिल्ह्यातील विनायक नंदकुमार पाटील (Vinayak Nandkumar Patil Success Story) या तरूणाने. त्याचीच ही गोष्ट !

शेतकरी कुटुंब, गरीब परिस्थितीत आई – वडिलांनी आपल्या शिक्षणासाठी घेतलेल्या कष्टाची जाणिव ठेवत जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास, उचित ध्येय, परिस्थितीची जाणीव ठेवून अभ्यासात सातत्य, कठोर मेहनत या बळावर कोल्हापुर (Kolhapur) जिल्ह्यातील मुदाळ (ता.भुदरगड) (Mudal Bhudargad) येथील विनायक नंदकुमार पाटील (Vinayak Patil) या तरूणाने आई-वडिलांनी पाहिलेले स्वप्न पुर्ण करून दाखवले आहे. विनायक पाटील हा आता उपजिल्हाधिकारी बनला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या परीक्षेत तो राज्यात पहिला आला आहे. त्याने मिळवलेले घवघवीत यश अनेकांना प्रेरणा देणारे आहे तर गरिबीच्या नावाने रडणार्या अनेकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे आहे. (MPSC Success Story)
विनायक हा शालेय जीवनापासून चमक दाखवणारा विद्यार्थी होता. त्याचे प्राथमिक शिक्षण गावातील प्राथमिक शाळेत झाले.तर प. बा. पाटील माध्यमिक विद्यालयात व कनिष्ठ महाविद्यालयात माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षण घेतले. त्याला दहावीमध्ये 93.20 तर बारावीमध्ये 93. 54 असे गुण मिळाले होते. बारावीनंतर त्याने बीएससी संख्याशास्त्र विषयात पुणे येथील फर्ग्युसन कॉलेजमधून पदवी प्राप्त केली. त्याला बीएससीला 82 टक्के मार्क मिळाले.
MPSC Success Story : स्वयं अध्ययनाच्या जोरावर अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण
घरची परिस्थिती बेताची असल्याने कोणताही खासगी क्लास न लावता स्वयं अध्ययनाच्या जोरावर त्याने अधिकारी होण्याचे स्वप्न पाहिले. त्या स्वप्नाला सत्यात उतरवण्यासाठी तो कठोर मेहनत घेत होता. त्याने घेतलेल्या मेहनतीला यश मिळाले.एमपीएससी मार्फत घेण्यात आलेल्या उपजिल्हाधिकारी परीक्षेत तो पहिल्याच प्रयत्नात यशस्वी झाला. शिवाय तो राज्यात पहिला आला. दरम्यान आठ महिन्यांपूर्वी त्याने उपशिक्षणाधिकारी पदाची परीक्षा दिली होती. त्यामध्येही तो पात्र झाला होता. एसटीआय, एएसओ या परीक्षा ही तो चांगल्या मार्गाने उत्तीर्ण झाला होता. विनायकने घेतलेली गरुड भरारी खरोखरच आजच्या युवा पिढीला प्रेरणा देणारी अशीच ठरणार आहे. (MPSC Success Story)

परिस्थितीची जाणीव ठेवून ध्येयवेढे झालो. तर, आपणास कठीण असे शिखर सुद्धा सहज गाठता येते. आजच्या तरुणांनी ध्येय वेडे होऊन यश प्राप्त करावे शिक्षण घेण्यासाठी आर्थिक स्थिती चांगली असावीच असे नाही. प्राप्त परिस्थितीत आपल्याला वाटचाल करता येते विना क्लास स्वयं अध्ययनाच्या जोरावर जर आपण प्रयत्नशील राहिलो. तर, आपणास यश मिळते असे मत विनायक नंदकुमार पाटील याने यावेळी व्यक्त केले. (MPSC Success Story)
शिकणाऱ्या मुलाला पाठबळ द्यावे यासाठी आम्ही कुटुंबीयांनी कधीही परिस्थितीची उणीव त्याला जाणू दिली नाही. तो समजदार होता शिकणार होता. मिळेल त्यात समाधान मानणारा होता. कौटुंबिक परिस्थितीची जाणीव होती. त्यामुळे त्याने आमच्याकडे कोणताही हट्ट केला नाही. उलट त्याचे शिक्षण पूर्ण व्हावे यासाठी आम्ही शेतीबरोबरच इतर व्यवसाय केले व त्याच्या शिक्षणात हातभार लावला. आपला मुलगा उपजिल्हाधिकारी झाला. जीवनात आणखी काय पाहिजे ? पोरानं आमच्या जन्माचे सार्थक केलं. असे भावूक उद्गार वडील नंदकुमार पाटील यांनी यावेळी बोलताना काढले. (MPSC Success Story)
मुलाची शिकण्याची जिद्द ओळखून वडील नंदकुमार पाटील यांनी मिळेल तो काम धंदा करून आपल्या कुटुंबाच्या उपजीविके सोबतच मुलाचे शिक्षण सांभाळले. स्वतःचं कुटुंब चालावे यासाठी त्यांनी कधी रिक्षा चालवली तर चहाची टपरी काढून व्यवसाय केला. थोड्याशा शेतीवर कुटुंब अवलंबून असल्यामुळे परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी त्यांनी विना संकोच व्यवसायात उडी घेतली. त्यांनी घेतलेल्या मेहनतीचे मुलगा विनायक याने जाणिव ठेवली आणि आता तो उपजिल्हाधिकारी बनला आहे. कुटूंबाने पाहिलेले स्वप्न त्याने सत्यात उतरवले आहे. त्याने मिळवलेले घवघवीत यशाची कहाणी संघर्षमय जीवन जगण्यार्या प्रत्येकाला प्रेरणा देणारी आहे. (MPSC Success Story)
