जामखेड तालुक्यात वादळी पावसाचा धुमाकूळ; बावीत वीज कोसळून ३ गाई दगावल्या, अनेक गावांना फटका, दोघे जखमी
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्यात शुक्रवारी दुपारी अचानक आलेल्या वादळी पावसाने प्रचंड धुमाकूळ घातला. बावी गावात वीज कोसळून ३ गाई दगावल्या आहेत. तर एक जण जखमी झाला आहे. फक्राबादमध्ये पत्रा लागुन एक महिला जखमी झाली आहे. वादळामुळे अनेक घरांवरील पत्रे उडाल्याच्या घटना घडल्या आहेत. तर फळबागांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

भीषण उष्णतेचा सामना करणार्या जामखेडकरांना शुक्रवारी काहीसा दिलासा मिळाला. दुपारनंतर आलेल्या वादळी पावसाने फक्राबाद बावी, धानोरा, डिसलेवाडी, वंजारवाडी, कुसडगाव, हळगाव, नान्नज, जवळा ,मतेवाडी, बोल्रे या भागात जोरदार हजेरी लावली.

जामखेड तालुक्यात वादळी पावसाने प्रचंड कहर केला असून, फक्राबाद व बावी गावाला या वादळाचा सर्वाधिक फटका बसला आहे फक्राबादमध्ये अनेक घरांवरील पत्रे उडून गेल्याने नागरिकांचे संसारोपयोगी साहित्य पावसात भिजले आहे.

तर बावीत वीज कोसळून ३ गाई दगावल्या आहेत. या दुर्घटनेत शेतकरी पवन जाधव हे थोडक्यात बचावले आहेत, त्यांना विजेचा जोरदार धक्का बसलाय. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

फक्राबाद येथील श्रीराम बाबुराव शिंदे यांच्या घरावरील पत्रे उडाल्याने, त्यांच्या मातोश्री हिराबाई बाबुराव शिंदे या पत्रा लागून जखमी झाल्या आहेत. याशिवाय भीमराव भुजबळ आणि सखाराम निवृत्ती उबाळे यांच्याही घरावरील पत्रे उडून मोठे नुकसान झाले आहे.

दरम्यान, वादळामुळे फक्राबाद-पिंपरखेड रस्त्यावर लिंबाचे मोठे झाड उन्मळून पडले होते. यामुळे काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. मात्र, पोलीस पाटील योगीनाथ जायभाय यांनी तत्परता दाखवत जेसीबीच्या साहाय्याने हे झाड बाजूला केले आणि वाहतूक पुन्हा सुरळीत केली.

या वादळी पावसाचा फटका फळबागांनाही बसला आहे. लिंबोणीच्या बागांसह इतर फळझाडे उन्मळून पडली आहेत. अनेक ठिकाणी बागा भुईसपाट झाल्याचे वृत्त आहे. वादळाने बाधित भागाचे तातडीने पंचनामे करून भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.