कर्जतमध्ये 600 झाडांच्या वाढदिवसानिमित्त होणार महाश्रमदान ! | Mahashram donation to be held on the occasion of birthday of 600 trees in Karjat

 

जामखेड टाईम्स वृत्तसेवा, दि, 31 डिसेंबर 2021 । कर्जत । प्रतिनिधी । कर्जतमध्ये 600 झाडांच्या वाढदिवसानिमित्त महाश्रमदानाचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व सामाजिक संघटना आणि कर्जत नगरपंचायतीच्या माध्यमांतून हा कार्यक्रम पार पडणार आहे. (Mahashramdan to be held on the occasion of birthday of 600 trees in Karjat)

नुतन वर्षाच्या पहिल्या दिवशी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात लावण्यात आलेल्या झाडाचा वाढदिवस आणि माझी वसुंधरा २ यामध्ये नवीन वर्षात १०० झाडे लावत साजरा करण्याचा अभिनव उपक्रम शनिवार, दि १ जाने २२ रोजी घेण्यात येणार आहे. या महाश्रमदानात कर्जतकरांनी सहभाग घ्यावा असे आवाहन सर्व सामाजिक संघटना आणि कर्जत नगरपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.

२ ऑक्टोबर २० पासून कर्जत शहरात सर्व सामाजिक संघटना आणि कर्जत नगरपंचायत यांनी दररोज सकाळी ६:३० ते ७:३० यावेळात तब्बल विक्रमी ४५५ दिवस श्रमदान करण्याचे काम अविरत सुरू ठेवले आहे. या काळात या सर्व श्रमदात्यानी कर्जत शहराचे रूप बदलण्याचे काम पार पाडले आहे.

घाणेरडा, किळसवाना परिसर अल्पावधीतच चकाचक करीत त्या जागी सुंदर झाडे लावत देखणा करण्याची किमया लीलया साधली. यासह त्या परिसराची निगा आणि लावलेले झाडे जगविण्याची जबाबदारी देखील श्रमदाते पार पाडत आहे.

कचरामुक्त कर्जत, सुंदर कर्जत आणि हरीत कर्जतसाठी ध्येयवेडे श्रमदाते भर पावसाळ्यात देखील आपले कार्य प्रामाणिकपणे पार पाडताना दिसले. कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात दि १ जाने २०२१ रोजी याच श्रमदात्यानी ६०० झाडे लावत त्याची उत्तम जोपासना केली.

उद्या शनिवार, दि १ जाने २०२२ रोजी त्या सर्व झाडांचा वाढदिवस साजरा करण्याचे श्रमदात्यानी आयोजन केले आहे. यासह त्यात या नुतन वर्षी पुन्हा नवीन १०० झाडे लावण्याचे नियोजन आखले आहे. यासाठी कर्जतकरानी या महाश्रमदानास उपस्थित राहावे असे आवाहन सर्व सामाजिक संघटना आणि कर्जत नगरपंचायतीद्वारे केले आहे.

खतांचा केक वृक्षांना बहाल

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ६०० वृक्ष लागवडीला शनिवारी एक वर्ष पूर्ण होत आहे. सदर लागवड करण्यात आलेल्या वृक्षांचा वाढदिवस खतांचा केक कापून करण्यात येणार आहे. आणि तोच केक सर्व श्रमदाते वृक्षाना बहाल करत त्यांची उत्तम निगा राखण्याची शपथ घेणार आहे. या आगळ्या-वेगळ्या उपक्रमाचे परिसरात कौतुक होत आहे.