कर्जतच्या प्रांत कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर गोळीबार, जमिन वादाने केला कहर 

 

जामखेड टाईम्स वृत्तसेवा, दि, 31 डिसेंबर 2021 :  कर्जत येथील प्रांताधिकारी कार्यालयाच्या आवारात रेहेकुरी येथील देवस्थान जमिनीच्या वादातुन बाचाबाची होऊन एका व्यक्तीने हवेत गोळीबार करण्याची घटना घडली. सदर आरोपीस कर्जत पोलिसांनी हत्यारासह ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार व भरत नामदेव मांडगे यांनी दिलेल्या फिर्यादी अनुसार, रेहेकुरी (ता.कर्जत) येथील कोकनाथ महादेव या नावाने देवस्थान जमिन गट नं. ७०, ७१, ७२, ७३ या चार गटामध्ये एकुण ७५ एकर क्षेत्र आहे. सदरचे क्षेत्र हे बरेच वर्षापासून फिर्यादीच्या भावकीतील पुर्वीचे चार कुटूंब वहीत करून खात होते व कोकनाथ महादेव मंदिराची आम्ही देखभाल करीत होतो. परंतु फिर्यादीच्या भावकीतील संदिप छगन मांडगे याने देवस्थानाचे नावाने ट्रस्ट स्थापन करून त्याने घरातील सर्व अध्यक्ष व सभासद केले आहेत.

यानंतर संदिप छगन मांडगे याने दुस-या भावकीतील लोकांचा काही एक संबंध नाही व वरील चारही गटातील शेतजमीनीच्या इतर हक्कातील नावे कमी करण्यासाठी उपविभागीय दंडाधिकारी कर्जत येथे दावा दाखल केलेला आहे. त्यावरून फिर्यादी व फिर्यादीच्या भावकीतील लोक गुरुवार, दि ३० डिसेंबर रोजी उप विभागीय दंडाधिकारी कार्यालय कर्जत येथे तारीख असल्याने उपस्थित होते.

उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय कर्जत येथील तारीख झाल्यानंतर फिर्यादी व इतर शांतीलाल बाबु मांडगे (वय ६० वर्षे), रोहीदास खंडू मांडगे (वय ७५ वर्षे), शहाजी बाबू मांडगे (वय ५५ वर्षे), आश्रु यशवंता मांडगे (वय ७० वर्षे), भानुदास यशवंत मांडगे (वय ८० वर्षे), हारीभाऊ आण्णा मांडगे (वय ५५ वर्षे), नारायण देवीदास मांडगे (वय ५० वर्षे), आप्पा गंगाराम मांडगे (वय ५५ वर्षे), धनराज खंडू मांडगे (वय ५० वर्षे सर्व रा. रेहकुरी ता. कर्जत जि. अहमदनगर) असे सर्वजण सांयकाळी ६ वाजताचे सुमारास कर्जत येथील उपविभागीय दंडाधिकारी कर्जत यांच्या कार्यालयाजवळील प्रवेशद्वाराजवळ थांबले असताना त्यावेळी आरोपी संदिप छगन मांडगे (वय ३२ वर्षे) व सचिन छगन मांडगे (वय ३० वर्षे दोघे रा. रेहकुरी ता. कर्जत) आले.

यावेळी फिर्यादी भरत नामदेव मांडगे याचा चुलत भाऊ शहाजी बाबू मांडगे याने त्याची मोटार सायकल फिर्यादीला घरी घेवून जाण्याचे सांगितल्याने ते सदर मोटारसायकल घेवून घरी निघाले होते. त्याचवेळी संदिप छगन मांडगे याने फिर्यादिस “ए कुत्र्या मोटारसायकल घेवून जावू नको. खाली उतर” असे म्हणून शिवीगाळ दमदाटी केली. त्यावेळी फिर्यादी व आरोपी यांच्यामध्ये शाब्दीक बाचाबाची होवून झटापट चालू असताना संदिप छगन मांडगे याने त्याचे कंबरेचा रिव्हालव्हर काढून फिर्यादी व त्याचे सोबत असलेले वरील नातेवाईक यांच्या जिवीतास धोका होऊ शकतो हे माहीत असताना रिव्हालव्हर मधून हवेत फायर केला.

त्यानतंर संदिप छगन मांडगे हा निघून गेला. याबाबत पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना माहिती मिळताच त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर मुंढे, भगवान शिरसाठ, पोलीस अंमलदार शाम जाधव, पांडुरंग भांडवलकर, अमित बर्डे, उद्धव दिंडे यांनी घटनास्थळास भेट दिली.

सदर आरोपीस कर्जत पोलिसांनी हत्यारासह ताब्यात घेतले. या प्रकरणात इतरांचे जीव धोक्यात येईल अशी कृती करणे आणि भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून आरोपीकडे लायसन असलेले रिव्हॉल्वर आणि ५ जिवंत राऊंड आणि १ वापरलेला राऊंड जप्त करण्यात आला आहे.