काय घडलं 2021 मध्ये ? जामखेड पोलिसांची कामगिरी कशी राहिली ? जामखेडकर का घेतायेत सोशल पोलिसींगचा अनुभव ? वाचा सविस्तर : 

नो दलाल... नो मध्यस्थ.. थेट संपर्क आणि जाग्यावर खटका

जामखेड टाईम्स वृत्तसेवा, 31 ऑक्टोबर 2021 । सत्तार शेख | जामखेड तालुक्यातील बिघडलेल्या कायदा व सुव्यवस्थेला आळा घालण्याचे मोठे काम पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या टीमने सरत्या वर्षांत पार पाडले. यातून जामखेड पोलिस दलाची प्रतिमा आणि कामगिरी दमदारपणे उंचावली.जनता आणि पोलिस यांच्यात मैत्रीचा संवाद सुरू झाला. यातून जनतेचा पोलिसांविषयीचा नकारात्मक सुर बदलला. तालुक्यातील जनतेच्या मनात जामखेड पोलिस दलाची सकारात्मक प्रतिमा निर्माण करण्यात पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांना यश आले.

पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांनी वर्षभरापूर्वी जामखेड पोलिस दलाचा कारभार स्वीकारला त्यानंतर त्यांनी सोशल पोलिसींगच्या पॅटर्नचा जामखेड तालुक्यात प्रभावी वापर करण्याचे काम हाती घेतले. समाजातील वेगवेगळ्या घटकांशी सातत्याने संवाद ठेवणे असो की सामाजिक उत्तरदायित्वाच्या जबाबदारीतून रक्तदानासारखे अनेक सामाजिक उपक्रम राबवणे असो यातून पोलिस दलाची प्रतिमा उंचावण्याचे काम घडले.

पुर्वी पोलिस स्टेशनला जायचं म्हटलं की मध्यस्थ दलालांची चलती असायची पण गेल्या वर्षभरात हाही पॅटर्न उध्वस्त करत “नो दलाल…नो मध्यस्थ.. थेट संपर्क आणि जाग्यावर खटका असे समीकरण बनले.” त्यामुळे आता सामान्यातला सामान्य माणूस पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या दालनात दिसू लागलाय. आपले म्हणणे मांडू लागलाय. न्याय मिळवू लागला. कायद्याचे राज्य कशाला म्हणतात याचा अनुभव जनतेला येऊ लागला.पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांनी  जामखेड पोलिस स्टेशनचा पदभार स्वीकारून नुकतेच एक वर्षे पुर्ण झाले आहे. या एका वर्षात खूप काही बदललं आहे. सोशल पोलिसिंगचा नवा अध्याय सरत्या वर्षांत जामखेडकर अनुभवत आहेत.

पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड हे जामखेड पोलिस स्टेशनला दाखल होण्यापूर्वी जामखेड तालुक्यात कायदा व सुव्यवस्थेचे पार धिंडवडे निघालेले होते. राजकीय आश्रयाने वाढलेल्या गुंडांच्या टोळ्या, गटातटाचे राजकारण, त्यातुन टोळीयुध्द, गुंडांच्या टोळ्यांची सामान्य माणसामध्ये दहशत, वर्षानुवर्षे बदल्याची भावना, हाणामाऱ्या, पोलिसात अवाजवी राजकीय हस्तक्षेप, राजकीय कुरघोड्यांमुळे दाखल होणारे खोटे गुन्हे, गोळीबार, दूहेरी हत्याकांड, गावठी कट्टे, खाजगी सावकारकी, बोकाळलेले अवैध्य व्यवसाय, ढासळलेली कायदा सुव्यवस्था, लोकप्रतिनिधींच्या आड स्थानिक पदाधिकाऱ्यांचा अवाजवी हस्तक्षेप असे चित्र जामखेड तालुक्यात होते.

पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी वर्षभरापुर्वी जामखेड पोलीस स्टेशनचा कारभार हाती घेतला. तालुक्याची गुप्तपणे संपूर्ण माहिती घेत अनेकांच्या कुंडल्या तपासल्या. स्थानिक राजकारणाचा अभ्यास केला. कुठल्या गावात काय दोष याची माहिती संकलित केली आणि त्यानंतर ॲक्शन प्लॅन आखत कामाला सुरूवात केली.

जामखेड पोलिसांची लक्षवेधक कामगिरी

आजवर तालुक्यात कसलीही निवडणूक असली की राजकीय दंगली अटळ होत्या. राजकीय वादावादीच्या घटनांमुळे अनेक मतदानकेंद्रे अतिसंवेदनशील असायची. कधी कुठल्या गावात भडका उडेल याचा भरवसा नसायचा. परंतू चालू वर्षांत पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीला कसलेच गालबोट लागले नाही. शांततेत निवडणूका पार पाडण्यात जामखेड पोलिसांना यश आले. खऱ्या अर्थात जामखेड पोलिसांची सर्वाधिक लक्षवेधक कामगिरी म्हणून याकडे पहावे लागणार आहे. निवडणुक काळात एकही राजकीय गुन्हा दाखल झाला नाही हे यश पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या धडाकेबाज नियोजनाचे आहे

बाळ बोठेची अटक

राज्यात गाजलेल्या रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी बाळ बोठे याच्या मुसक्या आवळण्यासाठी राबवण्यात आलेल्या विशेष सर्च मोहिमेत जामखेड पोलिस पथकाचा समावेश होता. पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील जामखेड पोलिस दलाच्या टीमने फरार बाळ बोठेच्या मुसक्या आवळण्याची महत्वाची कामगिरी बजावली.

अफूची शेती आणि बंदूक रॅकेट उध्वस्त

त्याचबरोबर जातेगाव शिवारातील अफूची शेती उध्वस्त करण्याची मोठी कारवाई जामखेड पोलिसांनी केली. याशिवाय अवैध बंदूक विक्रीचे रॅकेटही उघडकीस आणले. एकाच वेळी केलेल्या कारवाईत 6 पिस्टल आणि 08  राऊंड हस्तगत करण्यात आले होते. जामखेड शहर व तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध बंदूकांची होत असलेली तस्करी या कारवाईच्या निमित्ताने उजेडात आली होती. जामखेड पोलिसांनी जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई केली होती.

जामखेड पोलिसांनी वर्षभरात गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपींना पकडले, नामचीन गुंडांच्या मुसक्या आवळल्या, अवैध सावकारांविरोधात गुन्हे दाखल केले, बनावट दुध बनवण्याचा अड्डा उध्वस्त केला, अवैध वाळू तस्करांवर कारवाया केल्या. जामखेडमध्ये कार्यरत असलेल्या गुंडांच्या टोळ्यांचा बंदोबस्त केला अश्या अनेक धडाकेबाज कारवाया करत गुन्हेगारांना सळो की पळो करून सोडले. कोरोना काळात महत्वाची कामगिरी जामखेड पोलिसांनी बजावली.

वाहतुक कोंडीतून जामखेडचा श्वास मोकळा

जामखेड शहरातून जाणाऱ्या सर्वच रस्त्यावर वाहतुकीची सतत कोंडी होत असायची. वाहतुक कोंडीचा प्रश्न अतिशय जटिल बनलेला होता. सततच्या वाहतुक कोंडीमुळे शहराचा कोंडलेला श्वास कधी मोकळा होणार? याकडे जनतेच्या नजरा असायच्या. वाहतुक सुरळीत रहावी यासाठी पुर्वी नेमलेले वाहतुक पोलिस “कलेक्शन” मोहिमेवर असायचे.

मात्र पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांनी या प्रश्नांवर तोडगा काढण्याची भूमिका घेतली. शहराच्या वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी कठोर पावले उचलली. तसेच नगरपरिषदेने सम विषमचे बोर्ड जागोजागी लावले. वाहतुक कर्मचारी नेमून दिलेल्या ठिकाणी आपले काम करू लागले. याचा अपेक्षित परिणाम समोर आला. जामखेड शहराची वाहतुक कोंडीच्या समस्येतून सुटका झाली. अजूनही काही कठोर उपाय केल्यास वाहतूक कोंडीवर कायमचा तोडगा निघेल.

भारतातील सर्वात खतरनाक गुन्हेगार जेरबंद

उत्तर भारतातील अनेक राज्यातील पोलिसांना हवा असलेल्याफरमान अली ऊर्फ फिरोज ऊर्फ समीरूद्दीन ऊर्फ उडा या खतरनाक गुन्हेगाराच्या मुसक्या आवळण्याची धडक कारवाई पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या टीमने पार पाडली. वर्षभरात परराज्य आणि परजिल्ह्यातील अनेक मोठ्या गुन्ह्यातील आरोपींना जामखेड पोलिसांनी जेरबंद करण्याची कारवाया केल्या परंतु उडाची अटक जामखेड पोलिसांच्या वर्षभराच्या कामगिरीतील मैलाचा दगड ठरणारी कामगिरी आहे. जामखेड पोलिसांच्या धडाकेबाज कार्यपध्दतीची चुणूक यानिमित्ताने देशपातळीवर दखलपात्र ठरली आहे.

दरम्यान जामखेड पोलिसांची कामगिरी वर्षभरात उंचावली आहे. येत्या नव्या वर्षांतही जामखेड पोलिस दमदार आणि धडाकेबाज कामगिरीचा आलेख उंचावतील. दुर्जनांचा बिमोड करून सामान्य माणसांना न्याय मिळवून देतील असा विश्वास तालुक्यातील जनतेत आहे. या विश्वासाला तडा जाऊ न देण्याची जबाबदारी जामखेड पोलिस दलातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या खांद्यावर असणार आहे हे मात्र निश्चित!

जामखेड पोलिस स्टेशन वर्षभरात दाखल झालेले गुन्हे खालीलप्रमाणे

दंगल 32, खून 2, खूनाचा प्रयत्न करणे 6, दरोडा 3, जबरी चोरी 5, घरफोडी 29, आर्म अँक्ट 3, विनयभंग 16 ,बलात्कार 8,  चोरी 51, जूगार 19, वाळू चोरी 9, दारू कारवाई 150, अपहरण 8, ठकबाजी 6, दुखापती – मारामारी 76, सावकारी कायदा 7, सरकारी कर्मचाऱ्यांवरील हल्ले 3 असे गुन्हे वर्षभरात जामखेड पोलिस स्टेशनला दाखल झाले आहेत अशी माहिती क्राईम विभागाचे पोकाँ दत्तु बेलेकर यांनी दिली.