कर्जत नगरपंचायत चार प्रभागासाठी १० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

जामखेड टाईम्स वृत्तसेवा | 10 जानेवारी | कर्जत नगरपंचायतीच्या उर्वरित चार प्रभागासाठी १० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे ठाकले असून सोमवारी १२ उमेदवारांनी आपले १५ उमेदवारी अर्ज मागे घेतले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले यांनी दिली. प्रभाग क्रमांक १ आणि ५ मध्ये दुरंगी लढत असून ३ व ७ मध्ये तिरंगी लढती पहावयास मिळत आहे. (Karjat Nagar Panchayat has 10 candidates in the fray for four wards)

कर्जत नगरपंचायतीचा १३ जागेसाठी दि २१ डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती. ओबीसी आरक्षणामुळे चार प्रभागाची निवडणूक स्थगित करण्यात आली होती. राज्य निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टाच्या नुतन आदेशानुसार ओबीसी आरक्षणाच्या जागा खुल्या प्रवर्गातून घेत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी या आदेशान्वये कर्जत नगरपंचायतीसाठी पुन्हा चार जागेचा निवडणूक कार्यक्रम नव्याने घेण्यात आला.

चार जागेसाठी तब्बल २२ उमेदवारांचे २५ उमेदवारी अर्ज छाननीनंतर शिल्लक राहिले होते. सोमवार, दि १० रोजी उमेदवार अर्ज माघार घेण्याची अंतिम मुदत असताना आज १२ उमेदवारांनी आपले १५ उमेदवारी अर्ज माघारी घेतले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ अजित थोरबोले यांनी दिली.

प्रभागनिहाय पक्षीय उमेदवार पुढीलप्रमाणे

प्रभाग क्रमांक १ गायकरवाडी : वंदना भाऊसाहेब वाघमारे – भाजपा, ज्योती लालासाहेब शेळके – राष्ट्रवादी.

प्रभाग क्रमांक ३ ढेरेमळा : रावसाहेब खराडे – भाजपा, संतोष मेहत्रे – राष्ट्रवादी, शांता समुद्र – वंचित.

प्रभाग क्रमांक ५ पोस्ट ऑफिस परिसर : रोहिणी सचिन घुले – काँग्रेस, सारिका गणेश क्षीरसागर – भाजपा.

प्रभाग क्रमांक ७ बुवासाहेब नगर : सतीश पाटील – राष्ट्रवादी, दादासाहेब सोनमाळी – भाजपा, शिवानंद पोटरे –

मागील वेळी निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात उमेदवारी अर्ज माघार घेताना झालेला गदारोळ पाहता यंदा कर्जत नगरपंचायतीच्या आवारात पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. १८ जानेवारी रोजी या चार जागेसाठी मतदान प्रक्रिया राबवली जाणार असून १९ जानेवारीला एकूण १७ जागेचा निकाल घोषित करण्यात येणार आहे.

प्रचारात पुन्हा उडणार धुराळा

पहिल्या टप्प्यात १३ जागेसाठी पार पडलेल्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा या दोन्ही पक्षामध्ये आरोप- प्रत्यारोप पहावयास मिळाले. आ रोहित पवार आणि माजीमंत्री राम शिंदे यांच्या प्रतिष्ठेची असणारी कर्जत नगरपंचायत कोणाच्या ताब्यात राहील ? याकडे मतदारसंघासह नगर जिल्हा आणि संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.