Karjat news | रोहित पवारांच्या पुढाकारातून कर्जतमधील युवकांना 30 टेम्पोचे वाटप 

जामखेड टाईम्स वृत्तसेवा | Karjat News | कर्जत जामखेड तालुक्यातील बेरोजगार तरुणांसाठी रोजगार देण्यासाठी आमदार रोहित पवार यांच्या अभिनव संकल्पनेतून आणि कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थेद्वारे ‘माझा व्यवसाय, माझा हक्क’ या उपक्रमाची कर्जत तालुक्यात सुरूवात करण्यात आली.

कर्जत तालुक्यातील राशीनच्या जगदंबा मंदिर परिसरात आमदार रोहित पवार यांनी ‘माझा व्यवसाय माझा हक्क’ या योजनेचे निकष पूर्ण केलेल्या 30 युवकांना 30 टेम्पोचे नुकतेच वाटप केले.

‘माझा व्यवसाय माझा हक्क’ या योजनेमार्फत कर्जत जामखेडमधील तरुणांना रोहित पवारांची कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्था तसेच जिल्हा उद्योग केंद्र यांच्याकडून सहकार्य केलं जातं. तसेच या योजनेच्या लाभार्थ्यांना 25 ते 35 टक्के शासनाकडून अनुदान दिलं जातं.

तरुणांना स्वतःच्या पायावर उभे करून आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी बनवण्यासाठी ही योजना राबवण्यात येत आहे. तसेच या योजनेच्या माध्यमातून मतदारसंघातील अर्थ व्यवस्थेलाही गती मिळणार असल्याचं पाहायला मिळत आहे.

Karjat News

यावेळी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अतुल दवंगे, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी बी आर मुंडे, बँक ऑफ महाराष्ट्रचे विभागीय व्यवस्थापक सागर नाईक, सांगली जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संतोष गवळी, मनीषाताई जाधव, माऊली सायकर, दादासाहेब परदेशी, युवराज भोसले, हरिभाऊ पाडुळे, माधुरीताई व किसन पवार इत्यादी मान्यवर उपस्थित होते.