Maratha Reservation Movement । मराठा आरक्षण आंदोलनातील गुन्हे मागे, कर्जतमध्ये अंदोलकांनी केला जल्लोष !

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : मराठा समाजास आरक्षण (Maratha Reservation Movement) मिळावे यासाठी राज्यात सर्वत्र मोठे आंदोलन उभारले होते. कर्जत तालुक्यात देखील मोठ्या संख्येने मराठा समाज रस्त्यावर उतरला होता.

या आंदोलनाच्या वेळी मराठा युवकांवर कर्जतमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले होते. नुकतेच सर्व गुन्हे मागे घेत निकाली काढण्यात आले. यावर मराठा समाजाने जल्लोष व्यक्त करत गुन्हे दाखल असलेल्या युवकांचा फेटा बांधून सत्कार केला.

कर्जत तालुक्यामध्ये दोन-तीन वर्षांपूर्वी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यांवर मोठे आंदोलन पेटले होते. त्यावेळी अनेक मराठा युवकांवर वन खात्याची जीप जळीत प्रकरणासह आणखी चार वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले होते. सरकारने मराठा आरक्षण आंदोलनाचे सर्व गुन्हे मागे घेण्याची घोषणा केली होती. परंतु प्रत्यक्षात अंमलबजावणी होत नसल्याने गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया लांबली गेली. कर्जतमधील नितीन तोरडमल या आंदोलनात सहभागी असणाऱ्या युवकाने जोपर्यंत मराठा आंदोलनातील सर्व गुन्हे मागे घेतले जात नाहीत. तोपर्यंत पायात चप्पल न घालण्याची भुमिका घेतली.

या सर्व प्रश्नांवर कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी सरकार दरबारी योग्य तो पाठपुरावा केला होता. नुकतेच कर्जत न्यायालयातील मराठा आरक्षण आंदोलनातील सर्व गुन्हे मागे घेत निकाली काढण्यात आले. मराठा आंदोलकांवरील गुन्हे निकाली काढल्यानंतर सर्व मराठा सेवकांनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र येत फटाके वाजवून आनंद व्यक्त केला.

त्यावेळी आंदोलनाच्या गुन्ह्यातून मुक्त झालेल्या मराठा युवकांचा फेटा बांधून सत्कार करण्यात आला. तसेच नितिन तोरडमल या युवकास सकल मराठा समाज कर्जतच्या वतीने पायात चप्पल घालण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने सकल मराठा समाज कर्जतचे पदाधिकारी उपस्थित होते.