Waqf land scam | वक्फ जमिनी घोटाळ्यात होणार भाजपच्या दोन नेत्यांना अटक ; नवाब मालिकांच्या दाव्याने उडाली खळबळ

मुंबई  : भाजपच्या ज्या नेत्यांनी महाराष्ट्रामध्ये वक्फ बोर्डाच्या जमीनी (Waqf land scam) लाटलेल्या आहेत त्या एकालाही आम्ही सोडणार नाही असा इशारा देत भाजपच्या दोन नेत्यांना लवकरच अटक होणार असल्याचा दावा राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.भाजपच्या कोणत्या दोन नेत्यांना अटक होणार याचीच चर्चा आता राज्यात सुरू झाली आहे. (Two BJP leaders to be arrested soon in Waqf land scam, Excitement erupted over the claims of the Nawab Malik)

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी नवाब मलिका यांच्यावर वक्फ बोर्डाची जमीन हडपल्याचा आरोप केला.तसंच, लवकरच मलिकांच्या घरी सरकारी पाहुणे येणार असल्याचा दावा केला. यावर प्रतिक्रिया देताना ईडीच्या लोकांची पुष्पगुच्छ घेऊन वाट पाहत आहोत.आजपर्यंत ते आले नाहीत,आले तर त्यांचं स्वागतच करु, असं मलिक म्हणाले.

पुढे बोलताना त्यांनी वक्फ बोर्डाची जागा आम्ही हडपलेली नाही. पण आगामी काळात पुण्यातल्या एफआयआरमध्ये ज्यांची नावे आहेत, त्या भाजपच्या दोन नेत्यांना अटक होणार आहे. पुढील आठवड्यात अटक होईल असा दावा देखील मलिकांनी केला.

तसंच, भाजपच्या ज्या नेत्यांनी या महाराष्ट्रामध्ये वक्फ बोर्डाच्या जमीनी लाटलेल्या आहेत. त्या एकालाही आम्ही सोडणार नाही. बघू ईडीचे लोकं त्या भाजपच्या लोकांना बोलवतं की नाही, असं मलिक म्हणाले.वक्फ बोर्डामध्ये कुठल्या केस रजिस्टर केल्या, त्याची काय प्रगती आहे. त्यात आणखी कोण आरोपी होऊ शकतो, याची रितसर माहिती द्या. पत्राद्वारे मागणी करणार आहे, असं नवाब मलिक यांनी सांगितलं.

ईडीच्या कार्यालयात जायला तयार आहे. ज्या पद्धतीने ईडी बातम्या पसरवण्याचं काम करत आहे. भाजप नेत्यांच्या सांगण्यावरुन पुण्यात एंडोमन ताबूत प्रकरण आहे, ज्यामध्ये आम्ही एफआयआर दाखल केला होता, त्या प्रकरणी ईडीचे अधिकारी त्या ठिकाणी गेले. तपास सुरु केला.

माध्यमांमध्ये बातम्या पसरवण्यात आल्या की वक्फ बोर्डाच्या सात कार्यालयांवर छापेमारी करण्यात आली आहे. त्याच दिवशी आम्ही स्पष्ट केलं की वक्फ बोर्डावर छापेमारी झाली नाही. त्यांना काही तपास करायचा असेल तर ३० हजार रजिस्टर आहेत, आम्ही सर्व कागद द्यायला तयार आहोत. माझ्याकडे माहिती आली आहे.

काल वक्फ बोर्डाच्या एका अधिकाऱ्याला दोन दिवसांसाठी बोलावण्यात आलं. ईडीचे अधिकारी वक्फ बोर्डाच्या अधिकाऱ्याला सांगत आहेत की तुम्ही एफआयआरच चुकीचा दाखल केला आहे. ज्या लोकांनी सात कोटी रुपये लुटले त्यांची शिफारस करण्याचं काम ईडीचे अधिकारी करत आहेत, अशी टीका नवाब मलिक यांनी केली.

ईडीच्या अधिकाऱ्यांना सांगू इच्छितो किरीट सोमय्या यांना प्रवक्ता बनवला असाल तर ईडीने अधिकृतरित्या जाहीर करावं. जो काही खेळ महाराष्ट्रात सुरु आहे. जर कोणती कारवाई होणार आहे, तर अधिकृतरित्या प्रेस नोट जाहीर करा. माध्यमांमध्ये खोट्या बातम्या पसरवून महाराष्ट्रातील नेत्यांना महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्याचं काम बंद करा, असं मलिक म्हणाले.