100 रूपयांच्या स्टॅम्पवरील प्रतिज्ञापत्रातून जामखेडकरांची सुटका : तहसीलदार योगेश चंद्रे यांनी घेतला हा महत्वाचा निर्णय

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : कुठल्याही शासकीय कामांसाठी 100 रूपयांच्या प्रतिज्ञापत्राची सक्ती अनेकदा शासकीय कार्यालयांकडून केली जाते. याविरोधात तहसीलदार योगेश चंद्रे यांनी मोठे पाऊल उचलले आहे. जामखेड तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालये व महा ई सेवा केंद्रांना शासनाने घेतलेल्या एका महत्वाच्या निर्णयाची आठवण करून देत प्रतिज्ञापत्रासाठी 100 रूपयाच्या स्टॅम्पची सक्ती करू नये असे आदेश सोमवारी काढले आहेत. (Jamkhedkar released from affidavit on Rs 100 stamp Important decision taken by Tehsildar Yogesh Chandre)

राज्यातील नागरिकांना छोटी मोठी शासकीय कामे करताना प्रतिज्ञापत्र सादर करावे लागते.हे प्रतिज्ञापत्र 100 रूपयांच्या स्टॅम्पवर असणे आवश्यक असते.  शासकीय कामे करून घेताना प्रतिज्ञापत्राच्या आडून नागरिकांचा नाहक खर्च होत होता.यामुळे राज्य सरकारने  01 जुलै 2004 रोजी राजपत्र प्रसिध्द केले होते.

या निर्णयानुसार  मुन्द्रांक अधिनियम 1958 मधील तरतुदिंना अनुसरून लोकहितास्तव आवश्यक असल्याने तहसिल कार्यालयाद्वारे देण्यात येणाऱ्या सर्व सेवांसाठी जसे कि उत्पन्न प्रमाणपत्र /वास्तव्य प्रमाणपत्र /राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र /जात प्रमाणपत्र व इतर शासकीय कार्यालयातील सेवा मिळवण्यासाठी तसेच शासकीय कार्यालयामध्ये दाखल करावयाच्या इतर सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रावर उक्त अधिनियमाच्या अनुसूची 1 मधील अनुच्छेद 4 अन्वये आकारणीयोग्य असलेले मुद्रांक शुल्क माफ करण्यात आलेले आहे असा निर्णय घेतला होता.परंतू या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी राज्यात होऊ शकली नाही. यामुळे नागरिकांच्या माथी नाहक मुद्रांक शुल्काचा भार पडत होता. क्षुल्लक कामासाठी नागरिकांना शंभर रूपयांच्या स्टॅम्पवर प्रतिज्ञापत्र सादर करावे लागत असायचे.

दरम्यान जामखेडला नव्याने बदलून आलेले कर्तव्यदक्ष तहसीलदार योगेश चंद्रे यांच्या निदर्शनास ही बाब येताच. चंद्रे यांनी जामखेड तालुक्यातील गोरगरीब जनतेच्या मदतीसाठी सोमवारी मोठे पाऊल उचलले.

अमेझाॅन ग्रेट इंडियन फेस्टिवल दिवाळी स्टोअरमधून खरेदी करा आणि आपला आनंद द्विगुणित करा : शाॅपिंग करा

 

शासकीय सेवा लोकांना सुलभतेने देण्यासाठी आणि विनाकारण होणारा खर्च टाळण्यासाठी शासकीय कार्यालयामध्ये 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्राची आवश्यकता राहणार नाही यासाठी तहसीलदार योगेश चंद्रे यांनी सोमवारी एक आदेश जारी केला आहे. या आदेशात म्हटले आहे की, जामखेड तालुक्यातील सर्व  शासकीय विभागाचे कार्यालय प्रमुख, तहसील कार्यालयातील सर्व कर्मचारी, तलाठी, मंडळ अधिकारी  सर्व महा ई सेवा केंद्र यांना या आदेशा द्वारे सूचित करण्यात येते की, आपल्याद्वारे देण्यात येणाऱ्या कोणत्याही शासकीय सेवेसाठी कोणत्याही व्यक्तीकडून १०० रुपयाच्या स्टॅम्प पेपर वर प्रतिज्ञा पत्राची मागणी करण्यात येऊ नये त्या ऐवजी संबंधित व्यक्तीचे स्वाक्षरी  केलेले स्वयं घोषणापत्र घ्या असा आदेश जारी करण्यात आला आहे.

तसेच आदेशात पुढे म्हटले आहे की, सदर आदेश हे शासकीय सेवा लोकांना सुलभतेने देण्यासाठी  आणि विनाकारण होणारा खर्च टाळण्यासाठी  असल्याने आदेशाची अंमलबजावणी योग्य पद्धतीने करून सामान्य जनतेला विनाकारण त्रास होणार नाही याची दक्षता सर्व कार्यालय प्रमुखांनी घ्यावी आणि आपल्या अधिनस्त सर्व कर्मचारी यानाही तशा सूचना देण्यात याव्यात. सदर आदेश माननीय दिवाणी न्यायालयाला लागू असणार नाहीत असेही या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

तहसीलदार योगेश चंद्रे यांनी घेतलेल्या धडाकेबाज लोककल्याणकारी निर्णयामुळे तालुक्यातील जनतेला मोठा फायदा होणार आहे. तर काहींच्या धंद्यांचा मात्र बाजार उठणार आहे. तहसीलदार योगेश चंद्रे यांच्या निर्णयाचे जनतेतून स्वागत केले जात आहे.