धक्कादायक  : उपसरपंचाच्या छळाला कंटाळून ग्रामसेवकाने संपवले जीवन; आठ दिवसानंतर सापडला मृतदेह

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : श्रीगोंदा तालुक्यात कार्यरत असलेल्या झुंबर मुरलीधर गवांदे (Gramsevak Jhumbar Murlidhar Gavande) या ग्रामसेवकाने मागील आठवड्यात जामखेड शेजारील सौताडा दरीतील धबधब्यावरून (Sautada waterfall) उडी मारून आत्महत्या (Suicide) केल्याची घटना घडली होती. आता या प्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. श्रीगोंदा तालुक्यातील उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांच्या मुलाच्या जाचातून ग्रामसेवकाने आत्महत्या केल्याचे समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. (Gramsevak commits suicide due to harassment of Deputy Sarpanch in Shrigonda taluka)

श्रीगोंदा तालुक्यातील खांडगाव- वडघूल या ग्रामपंचायतमध्ये (Khandgaon- Wadghul Gram Panchayat) झुंबर मुरलीधर गवांदे हे ग्रामसेवक म्हणून कार्यरत होते. गवांदे यांनी दि 24 सप्टेंबर रोजी जामखेड शेजारील सौताडा (जि बीड) येथील धबधब्यावरुन उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली होती. खोल दरीत मृतदेह पडला होता. गेली आठ दिवसांपासून नातेवाईक व पोलिस गवांदे यांचा मृतदेह शोधत होते. आठ दिवसानंतर गवांदे यांचा मृतदेह शोधण्यात पोलिसांना यश आले. दरम्यान घटनेच्या दिवशी घटनास्थळाहून पोलीसांना गवांदे यांची बॅग,आयकार्ड, मोटरसायकल मिळाली होती. पाटोदा पोलीस स्टेशनला याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे.

घटनेच्या आठ दिवसानंतर आत्महत्या प्रकरणात नवा ट्विस्ट

ग्रामसेवक झुंबर गवांदे यांनी आत्महत्या करून आठ दिवस उलटले आहेत. त्यांचा मृतदेह आठ दिवसानंतर सौताडा दरीत शोधण्यात यश आले.मृतदेह मिळाल्यानंतर या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. ग्रामसेवक गवांदे यांनी उपसरपंचासह ग्रामपंचायत सदस्यांच्या मुलाच्या जाचातून आत्महत्या केल्याचे एका वायरल ऑडिओ क्लिपमधून समोर आले आहे. संबंधित उपसरपंच ग्रामसेवक गवांदे यांना फोनवरून दमबाजी करत असल्याची ऑडिओ क्लिप आता वायरल झाली आहे.

खांडगाव- वडघुलच्या उपसरपंचावर आरोप

श्रीगोंदा तालुक्यात खांडगाव- वडघुल या ग्रुप ग्रामपंचायतचे उपसरपंच रामदास घोडके (Ram Ghodake Deputy Sarpanch in Shrigonda taluka ) आणि ग्रामसेवक झुंबर मुरलीधर गवांदे यांच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप वायरल झाली आहे. या रेकॉर्डिंगमध्ये गावातील फॉरेस्ट हद्दीतील दिडशे घरांची नियमबाह्य नोंद लावण्यासाठी घोडके हे गवांदे यांच्यावर दबाव टाकत असल्याचे समोर आले आहे. याशिवाय अनेक कामांसाठी घोडके हे दबाव टाकत होते. तसेच वरिष्ठांकडे घोडके यांनी गवांदे यांच्या तक्रारी केल्या होत्या. तक्रारी मागे घ्यायच्या असतील तर मी सांगितलेले कामे करा असे संभाषण वायरल ऑडिओ क्लिपमधून समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.दरम्यान मयत गवांदे यांच्या पत्नीने यासंदर्भात कारवाईची मागणी केली होती.

दोघांविरोधात गुन्हे दाखल

दरम्यान रविवारी उशिरा मयत ग्रामसेवक झुंबर गवांदे यांच्या पत्नी मनिषा गवांदे यांनी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार खांडगाव वडघूलचे उपसरपंच रामदास बन्सी घोडके व ग्रामपंचायत सदस्या सुनंदा शिंदे यांचा मुलगा आनंदा शिंदे यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

बेकायदेशीर अतिक्रमण कायदेशीर करावे यासाठी घोडके व शिंदे ग्रामसेवक गवांदे यांना सातत्याने त्रास देत होते. ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकून गवांदे यांना बाहेर काढण्यात आले होते. तसेच घोडके व शिंदे या दोघांनी सप्टेंबर महिन्यातील ग्रामसभेत गवांदे यांना झाडू मारण्यास भाग पाडले होतो तसेच झाडू मारण्याचा व्हिडीओ वायरल केला होता.या सर्व जाचाला कंटाळून झुंबर गवांदे यांनी आत्महत्या केली आहे अशी फिर्याद गवांदे यांच्या पत्नीने दाखल केली आहे.