सावधान : जामखेड तालुक्यातील 26 गावांमध्ये रेड अलर्ट जारी, लम्पी स्कीन आजाराचा धोका वाढला, प्रशासन अलर्टमोडवर !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख। जामखेड तालुक्यात लम्पी स्कीन आजाराचा धोका वाढला आहे. जामखेड तालुक्यातील 26 गावांमध्ये रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे. लम्पी स्कीन आजाराचा जनावरांमध्ये फैलाव रोखण्यासाठी प्रशासनाने युध्दपातळीवर उपाययोजना हाती घेतल्या आहेत. आज अखेर 11000 जनावरांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे, अशी माहिती गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी जामखेड टाइम्सशी बोलताना दिली.

Caution, red alert issued in 26 villages of Jamkhed taluka, risk of lumpy skin disease increased

जामखेड तालुक्यात मागील तीन ते चार दिवसांपासून लम्पी स्कीन रोगाचा शिरकाव झाला आहे. गोवंशीय जनावरे आणि म्हैसवर्गीय जनावरांमध्ये हा आजार झपाट्याने फैलावत आहे. जामखेड तालुक्यातील मोहरी येथे लम्पी स्कीन आजाराचा पहिला रुग्ण आढळून आल्यानंतर प्रशासन सतर्क झाले आहे.

आठ गावांमधील नमुने तपासणीसाठी ताब्यात

जामखेड तालुक्यात आत्तापर्यंत आठ गावांमधून लम्पी स्कीन आजाराचे नमुने गोळा करून पुण्याच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. यामध्ये मोहरी, गवळवाडी, लोणी, जवळा, गुरेवाडी, पिंपळवाडी, बांधखडक, जमादारवाडी या गावांचा समावेश आहे. यापैकी मोहरी येथील नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

26 गावांमध्ये रेड अलर्ट

लम्पी स्कीन आजाराच्या पार्श्वभूमीवर जामखेड तालुक्यात आत्तापर्यंत सात एपीसेंटर तयार करण्यात आली असून त्यामध्ये एकूण 26 गावांमध्ये रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे. या सर्व गावातील जनावरांची काळजी घेण्याबाबत पशुपालकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

जनावरांचा आठवडे बाजार बंद

रेड अलर्ट घोषित करण्यात आलेल्या गावांमध्ये ग्रामपंचायतच्या मदतीने किटकनाशकांची फवारणी करण्यात येत आहे. जामखे मध्ये लम्पी स्कीन डिसीज वेगाने पसरत असून जनावरांचे बाजारही बंद करण्यात आले आहेत. तसा निर्णय जामखेड बाजार समितीने जाहीर केला आहे. जामखेड तालुक्यातील 11000 जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. सदर आजाराचे कोणतेही लक्षणे दिसताच पशुपालकांनी जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात किंवा ग्रामपंचायतला संपर्क करावा, असे अवाहन गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी केले आहे.

Caution, red alert issued in 26 villages of Jamkhed taluka, risk of lumpy skin disease increased

एपिसेन्टर नुसार रेड अलर्ट गावे खालील प्रमाणे

  • मोहरी- मोहरी, जायभायवाडी, गवळवाडी, गीतेवाडी
  • लोणी- लोणी, बालगव्हान, आनंदवाडी, वाकी, दरडवाडी
  • जवळा- जवळा व ग्रामपंचायत अंतर्गत सर्व वस्त्या
  • गुरेवाडी- गुरेवाडी, खूरदैठण, घोडेगाव, धोंडपारगाव
  • पिंपळवाडी- पिंपळवाडी, कोल्हेवाडी, साकत
  • बांधखडक- बांधखडक, नायगाव, नाहुली
  • जामदारवाडी- जामदारवाडी, चुंबळी, काटेवाडी, बटेवाडी, सारोळा, जामखेड शहर पूर्ण.