जामखेड तालुक्यातील दोन ग्रामपंचायतींवर भाजपचा कब्जा, खर्ड्यात राजकीय चमत्कार तर गुरेवाडी- महारूळीत बिनविरोध निवड !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । कर्जत-जामखेड मतदारसंघाचे लक्ष लागलेल्या खर्डा आणि गुरेवाडी – महारूळी ग्रामपंचायतच्या सरपंचपदासाठी आज निवडी पार पडल्या. दोन्ही ग्रामपंचायतीमध्ये भाजपने सत्तांतर घडवत राष्ट्रवादीला धोबीपछाड दिला. या निकालामुळे जामखेड तालुक्यात आमदार प्रा.राम शिंदे यांची राजकीय ताकद वाढू लागल्याचे स्पष्ट झाले आहे.

BJP captures two gram panchayats in Jamkhed taluka, political miracle in Kharda and unopposed election in Gurewadi Maharuli gram Panchayat sarpanch Election, jamkhed news,

जामखेड तालुक्याच्या राजकारणात अतिशय महत्त्वपूर्ण असलेल्या खर्डा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या निवडणुकीत बाजार समितीचे संचालक वैजीनाथ पाटील यांच्या सौभाग्यवती संजीवनीताई पाटील यांनी एका मताने विजय मिळवला. संजीवनीताई पाटील यांच्या विजयाने खर्डा ग्रामपंचायतीवर भाजपने आपले वर्चस्व प्रस्थापित केले. आमदार प्रा.राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजपने खर्ड्यात घडवून आणलेल्या राजकीय चमत्काराची तालुक्यात जोरदार चर्चा रंगली आहे.

BJP captures two gram panchayats in Jamkhed taluka, political miracle in Kharda and unopposed election in Gurewadi Maharuli gram Panchayat sarpanch Election, jamkhed news,

खर्डा राष्ट्रवादीतील गटबाजीचा फायदा उठवत भाजपने खर्ड्यातील राष्ट्रवादीच्या सत्तेला सुरूंग लावला.खर्डा सरपंचपदाच्या निवडणुकीत भाजपा नेते रविंद्र सुरवसे यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती. सुरवसे यांनी खेळलेली खेळी या निवडणुकीत यशस्वी ठरली. आमदार प्रा.राम शिंदे यांच्या नेतृत्वाखालील खर्डा ग्रामपंचायत सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी आखलेला गेम प्लॅन यशस्वी करण्यासाठी भाजपा नेते रविंद्र सुरवसे, सामाजिक कार्यकर्ते प्रा सचिन गायवळ यांच्यासह भाजपातील इतर नेते व कार्यकर्त्यांनी मोठी मेहनत घेतली.त्यामुळे खर्डा ग्रामपंचायतवर भाजपने आपला झेंडा फडकावला.

सामाजिक कार्यकर्ते प्रा सचिन गायवळ यांचा करिष्मा

जामखेड तालुक्यातील नान्नज या भागातील गुरेवाडी – महारूळी ग्रामपंचायतींवर भाजपने आपला झेंडा फडकावला आहे. सामाजिक कार्यकर्ते प्रा सचिन गायवळ यांच्या नेतृत्वाखालील भाजपने गुरेवाडी – महारूळी ग्रामपंचायतीत सत्तांतर घडवले. या ठिकाणी राष्ट्रवादीच्या सरपंच अंजली लक्ष्मण ढेपे यांनी काही दिवसांपुर्वी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे याठिकाणी सरपंचपदाची निवडणूक आज पार पडली.

गुरेवाडी – महारुळीच्या सरपंचपदी संतोष ठाकरे यांची बिनविरोध निवड

सात सदस्य संख्या असलेल्या गुरेवाडी – महारुळी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या निवडीवेळी पाच सदस्य हजर होते. माजी सरपंच अंजली ढेपे व सोनाली जाधव हे दोन सदस्य गैरहजर होते. सरपंचपदासाठी संतोष बबन ठाकरे यांचा एकमेव अर्ज आला त्यामुळे ठाकरे यांची बिनविरोध निवड झाली. सामाजिक कार्यकर्ते प्रा सचिन गायवळ यांच्या नेतृत्वाखाली गुरेवाडी – महारुळी ग्रामपंचायतीवर भाजपने आपला झेंडा फडकावला. प्रा गायवळ यांनी यापुर्वी जामखेड तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीच्या बिनविरोध केल्या आहेत, आता गुरेवाडी – महारुळीच्या सरपंचपदाची निवडणूक बिनविरोध करत आपला राजकीय करिष्मा कायम असल्याचे या माध्यमांतून पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे.

भाजपची राजकीय ताकद वाढवणारा निकाल

जामखेड तालुक्यातील दोन ग्रामपंचायतींवर भाजपने आपला झेंडा फडकावल्यामुळे अगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर या घटना भाजपची राजकीय ताकद वाढवणारी तर राष्ट्रवादीच्या गोटात चिंता वाढवणारी ठरली आहे. खर्डा सारख्या मोठ्या ग्रामपंचायतींवर भाजपने झेंडा फडकावत राष्ट्रवादीला जोरदार झटका दिला आहे. राष्ट्रवादीतील गटबाजी सातत्याने उफाळून येत आहे. याला रोखण्यासाठी आमदार रोहित पवार व स्थानिक नेते अपयशी ठरत असल्याने यानिमित्ताने अधोरेखित होत आहे.