सावधान : जामखेड तालुक्यातील 76 हजार जनावरांना लम्पी स्कीन रोगाचा धोका, 4 गावांमध्ये लम्पी आजाराचा शिरकाव, प्रशासनाकडून वेगाने लसीकरण सुरु

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख। जामखेड तालुक्यातील चार गावांमध्ये लम्पी स्कीन आजाराचा शिरकाव झाला आहे. तालुक्यातील पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्य पाच झाली आहे. तालुक्यातील 26 गावांमध्ये रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे. यात वाढ होण्याची शक्यता आहे. प्रशासनाने तालुक्यातील 1500 हजार जनावरांचे लसीकरण पूर्ण केले आहे, अशी माहिती गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी जामखेड टाइम्सशी बोलताना दिली.

76 thousand animals in Jamkhed taluka are at risk of lumpy skin disease, lumpy skin disease has entered 4 villages, administration has started vaccination

जामखेड तालुक्यात लम्पी स्कीन रोगाचा शिरकाव झाला आहे. गोवंशीय जनावरे आणि म्हैसवर्गीय जनावरांमध्ये हा आजार झपाट्याने फैलावत आहे.जामखेड तालुक्यातील मोहरी येथे लम्पी स्कीन आजाराचा पहिला रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर नव्याने तीन गावांमध्ये रूग्ण आढळून आले आहेत.

जामखेड तालुक्यातील रुग्णांची संख्या झाली पाच

मोहरी, गवळवाडी, लोणी, जवळा, गुरेवाडी, पिंपळवाडी, बांधखडक, जमादारवाडी या आठ गावांमधून लम्पी स्कीन आजाराचे 11 नमुने पुण्याच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. यातील मोहरी, जवळा, गुरेवाडी, आणि लोणी या गावांमधील चार अहवाल पाॅझिटिव्ह आले आहे. त्यानुसार जामखेड तालुक्यातील रुग्णांची संख्या पाच झाली आहे.

जनावरांच्या वाहतुकीवर बंदी

लम्पी स्कीन आजाराच्या पार्श्वभूमीवर जामखेड तालुक्यात सात एपीसेंटर तयार करण्यात आली आहेत. 26 गावांमध्ये रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे. या सर्व गावात ग्रामपंचायतच्या मदतीने किटकनाशकांची फवारणी करण्यात येत आहे. तसेच लसीकरण वेगाने केले जात आहे. जामखेड तालुक्यात लम्पी स्कीन आजार वेगाने पसरत आहे. पशुपालकांनी आपल्या जनावरांची काळजी घेण्याचे अवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. जामखेडचा जनावरांचा आठवडे बाजार बंद ठेवण्याबरोबरच जनावरांच्या वाहतुकीवरही बंदी घालण्यात आली आहे.

15 हजार जनावरांचे लसीकरण पूर्ण

लम्पी स्कीन आजाराचा फैलाव रोखण्यासाठी प्रशासन युध्दपातळीवर काम करत आहे. तालुक्यातील 15 हजार जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. लम्पी आजाराचे कोणतेही लक्षणे दिसताच पशुपालकांनी जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात किंवा ग्रामपंचायतला संपर्क करावा असे आवाहन गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी केले आहे.

76 हजार जनावरांना लम्पीचा धोका

जामखेड तालुक्यात सन 2020 च्या पशुगणनेनुसार एकुण दोन ते अडीच लाख पशुधन आहे. यामध्ये गायवर्ग – 58 हजार 851 तर म्हैसवर्ग 16 हजार 559 जनावरांची प्रशासनाकडे नोंद आहे. लम्पी स्कीन आजाराचा फटका 76 हजार जनावरांना बसण्याचा धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाने 15 हजार जनावरांचे लसीकरण झाले आहे.

एपिसेन्टर नुसार रेड अलर्ट गावे खालील प्रमाणे

१. मोहरी- मोहरी, जायभायवाडी, गवळवाडी, गीतेवाडी
२. लोणी- लोणी, बालगव्हान, आनंदवाडी, वाकी, दरडवाडी
३. जवळा- जवळा व ग्रामपंचायत अंतर्गत सर्व वस्त्या
४. गुरेवाडी- गुरेवाडी, खूरदैठण, घोडेगाव, धोंडपारगाव
५. पिंपळवाडी- पिंपळवाडी, कोल्हेवाडी, साकत
६. बांधखडक- बांधखडक, नायगाव, नाहुली
७. जामदारवाडी- जामदारवाडी, चुंबळी, काटेवाडी, बटेवाडी, सारोळा, जामखेड शहर पूर्ण.