- Advertisement -

राज्यात पुढील तीन दिवस पावसाचे : हवामान विभागाकडून राज्यातील ‘या’ जिल्ह्यांसाठी ‘येलो’ अलर्ट जारी

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : राज्यात पाऊस पुन्हा परतला आहे. 25 ऑक्टोबरला मान्सून देशातून परतला होता. परंतू अरबी समुद्रातील श्रीलंका व तामिळनाडू भागात कमी दाबाचे क्षेत्र विकसीत झाल्याने महाराष्ट्र पाऊस पुन्हा परतला आहे.

अगामी तीन ते चार दिवस राज्यात विविध ठिकाणी  विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडणार असल्याचा इशारा भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

4 नोव्हेंबर अर्थात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी राज्यात अनेक भागात पाऊस झाला. अहमदनगर जिल्ह्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली होती. श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण मध्ये मुसळधार पावसामुळे वीटभट्ट्यांचे मोठे नुकसान झाले होते. जामखेड तालुक्यातील काही भागात काल पाऊस झाला.

दरम्यान हवामान विभागाकडून आज 05 नोव्हेंबर रोजी नवा हवामान अंदाज जारी करण्यात आला आहे. या अंदाजानुसार राज्यात पुढील दोन ते तीन दिवस विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.काही जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाकडून ‘येलो’ अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच येत्या 5 दिवसांत अपेक्षित तीव्र हवामानाचा इशारा देण्यात आल्याने किनारपट्टीवरील भागाला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

राज्यातील काही भागात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मध्यम तर जोरदार पाऊस पडत आहे. विशेषता: कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात हा पाऊस सुरू आहे.

हवामान विभागाकडून जारी करण्यात आलेल्या अंदाजानुसार अहमदनगर, बीड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर , पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यांना 5 नोव्हेंबर साठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच 06 नोव्हेंबरसाठी पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर,रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्हांना ‘येलो’ अलर्ट जारी करण्यात आला आहे.

तसेच 08 नोव्हेंबरसाठी सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. साधारणता: 10 नोव्हेंबर पासून राज्यातून पाऊस परतेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.दरम्यान ऐन दिवाळीत अवकाळी पाऊस राज्यात परतल्याने बळीराजाच्या चिंतेत भर पडली आहे.