हजारो विद्यार्थ्यांना मिळणार दिलासा : महाराष्ट्र सरकार लॉकडाऊन काळातील गुन्हे मागे घेणार – गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील

जामखेड टाईम्स वृत्तसेवा । राज्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राबवण्यात आलेल्या विविध प्रतिबंधात्मक उपाय योजना हाती घेतल्या गेल्या होत्या, राज्यात कडक लाॅकडाऊन लावण्यात आला होता. कोरोना काळात शासनाने लावलेल्या निर्बंधाचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. हे गुन्हे रद्द करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारच्या विचाराधीन असून, लवकरच याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे.

राज्यात लॉकडाऊन लागू असताना, त्याचबरोबर नंतरच्या काळात संचारबंदी असताना नियमांचं उल्लंघन करणाऱ्या विद्यार्थी, नागरिकांवर भारतीय दंड विधान कलम १८८ नुसार गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. हे गुन्हे रद्द करण्याचा विचार राज्य सरकारच्या विचाराधीन असून लवकरच हा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत मांडला जाणार आहे अशी माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली.

“कोरोना लॉकडाऊनच्या काळात कलम १८८ अंतर्गत विद्यार्थ्यांसह राज्यातील नागरिकांवर हजारो गुन्हे दाखल आहेत. यासंदर्भात सरकार काही पावलं उचलणार आहेत का? यावर बोलताना गृहमंत्री वळसे पाटील यांनी वरील माहिती दिली.

कलम 188 अंतर्गत दाखल गुन्हे मागे घेण्याचा गृहविभागाचा तत्त्वतः निर्णय झालेला आहे. यासंदर्भात मंत्रिमंडळासमोर जाऊन हा प्रस्ताव मांडू आणि हे गुन्हे घेतले जातील. कारण विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी जाताना बऱ्याच प्रकारच्या अडचणी सामना करावा लागतो. तो करावा लागू नये, असाच आमचा प्रयत्न असेल”, असं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले.