धक्कादायक: श्रीगोंद्यात कथित गोरक्षकांचा धुडगूस, शेतकरी व चालकाला अमानुष मारहाण; कपडे काढून लघवी पाजल्याचा आरोप,10–15 जणांविरोधात गुन्हा
जामखेड टाइम्स वृत्तसेवा: गावरान गाय आणि कालवड खरेदी करून घरी घेऊन जाणाऱ्या शेतकऱ्याला व पिकअप चालकाला रस्त्यात अडवून बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना श्रीगोंदा तालुक्यातून समोर आली आहे.

स्वयंघोषित गोरक्षकांच्या टोळक्याने दोघांना काठ्या आणि लोखंडी टॉमीने मारहाण केली, कपडे काढले, बाटलीत लघवी करून ती जबरदस्तीने पाजली आणि या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओही तयार केला. एवढेच नव्हे, तर 50 हजार रुपयांची मागणी करत खिशातील 21 हजार रुपये काढून घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात प्रतीक पाचपुते याच्यासह 10 ते 15 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय भाऊसाहेब शेळके यांनी 5 सप्टेंबर 2026 रोजी टाकळी लोणार येथील पंडित नामदेव दरवडे यांच्याकडून 14 हजार रुपयांना एक गावरान गाय आणि तिची कालवड खरेदी केली होती. आपल्या मुलीच्या बाळासाठी गावरान गायीचे दूध मिळावे, या उद्देशाने गाय खरेदी केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. गाय आणि कालवड घरी नेण्यासाठी शेळके यांनी ओळखीचे पिकअप चालक महेश संदीप जाधव यांचे वाहन बोलावले होते.
शेळके आणि जाधव हे गाय व कालवड घेऊन टाकळी लोणार ते पिसोरे खांड रस्त्याने जात असताना दुपारी सुमारे दीड वाजता काळ्या रंगाच्या मोटारसायकलवरून आलेल्या दोन व्यक्तींनी त्यांचे वाहन अडवल्याचा आरोप आहे. फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, सुरुवातीला या दोघांनी शिवीगाळ व मारहाण सुरू केली. त्यानंतर फोन करून इतर साथीदारांना बोलावण्यात आले आणि काही वेळात विनाक्रमांकाच्या काळ्या कारमधून तसेच इतर दुचाकींवरून आणखी 10 ते 15 जण घटनास्थळी पोहोचले.
फिर्यादीने या टोळक्यातील एकाला सोशल मीडियावरील रिल्समधून प्रतीक पाचपुते म्हणून ओळखत असल्याचे म्हटले आहे. त्यानंतर शेतकरी विजय शेळके आणि चालक महेश जाधव यांना काठ्या तसेच लोखंडी टॉमीने मारहाण करण्यात आल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
याचदरम्यान 50 हजार रुपयांची मागणी करण्यात आली आणि पैसे देण्यास नकार दिल्यानंतर शेळके यांच्या खिशातील 21 हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतल्याचा आरोप आहे. त्यानंतर दोघांचे कपडे काढून बाटलीत लघवी करण्यात आली आणि ती जबरदस्तीने पाजल्याचेही फिर्यादीने पोलिसांना सांगितले आहे. या संपूर्ण प्रकाराचे मोबाईलमध्ये चित्रीकरण करण्यात आल्याचाही आरोप आहे.
घटनेनंतर श्रीगोंदा पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून शेळके आणि जाधव यांना गाय व कालवडीसह पोलिस ठाण्यात आणले. त्यानंतर जखमींना उपचारासाठी श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. विजय शेळके यांच्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलिस ठाण्यात प्रतीक पाचपुते, मोटारसायकलवरील दोन अनोळखी व्यक्ती आणि इतर 10 ते 15 जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सचिन लिमकर करत आहेत.
या प्रकरणाची श्रीगोंदा पोलिसांनी गंभीर दखल घेतल्याचे कर्जतचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुजितकुमार क्षीरसागर यांनी म्हटले आहे. गोरक्षणाच्या नावाखाली कोणी वाहन अडवून पैसे मागत असेल किंवा कायदा हातात घेत असेल तर असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत आणि संबंधितांवर कारवाई केली जाईल, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. या गुन्ह्यातील सर्व संशयित आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
गावरान गाय कायदेशीररीत्या खरेदी करून नेत असताना हा प्रकार घडल्याचा दावा फिर्यादीने केला आहे. त्यामुळे गोरक्षणाच्या नावाखाली सामान्य नागरिकांना अडवणे, मारहाण करणे आणि पैशांची मागणी करणे या आरोपांमुळे प्रकरण अधिक गंभीर बनले आहे. या प्रकरणाचा पोलिस कसून तपास करत आहेत.