जामखेड टाइम्स वृत्तसेवा : कर्जत तालुक्यातील खुरंगेवाडी येथून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एकाच विहिरीत प्रेमी युगुलाचे मृतदेह आढळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. बेपत्ता असलेल्या तरुणाचा शोध घेण्यासाठी सकाळपासून राबवण्यात आलेल्या मोहिमेला रात्री उशिरा यश आले असून त्याच विहिरीत रात्री नऊ वाजता त्याचा मृतदेह हाती लागला.

खुरंगेवाडी येथील शिंगाडे कुटुंबाच्या मालकीच्या विहिरीत सकाळी वैष्णवी विलास जगधने (१८) या तरुणीचा मृतदेह आढळला होता. तिच्यासोबत असलेला वैभव भाऊसाहेब शिंगाडे (२१) हा तरुण बेपत्ता असल्याची माहिती मिळताच मिरजगाव पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
वैष्णवीचा मृतदेह विहिरीतून काढण्यापूर्वी नातेवाईकांनी वैभवचा शोध घेण्याची आग्रहाची मागणी केली. त्यानुसार पोलिसांनी खोल विहिरीत शोधकार्य सुरू केले. मात्र पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने अडथळे येत होते. अखेर विहिरीतील पाणी उपसून शोधमोहीम वेगाने राबविण्यात आली.
सकाळपासून सुरू असलेल्या अथक प्रयत्नांनंतर रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास वैभवचा मृतदेहही त्याच विहिरीत सापडला. दोन्ही मृतदेह बाहेर काढून पुढील वैद्यकीय तपासणीसाठी मिरजगाव ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे खुरंगेवाडी परिसरात शोककळा पसरली असून दोन्ही कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सुजित क्षीरसागर, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झांजाड यांच्यासह अहिल्यानगर येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. या मृत्यूमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून मिरजगाव पोलीस अधिक तपास करत आहेत.
शोधमोहिमेचा घटनाक्रम
सकाळी तरुणीचा मृतदेह आढळल्यानंतर तरुण बेपत्ता असल्याचे समोर आले. दुपारपासून विहिरीत शोधमोहीम सुरू करून सायंकाळी पाणी उपसण्यास सुरुवात झाली. अखेर रात्री नऊ वाजता तरुणाचा मृतदेह सापडला.