जामखेड : डोळ्यात मिरची पूड टाकून साडेदहा लाख लुटल्याचा बनाव; खर्डा पोलिसांनी तपास केला अन् भलतंच सत्य आलं समोर!

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेड-खर्डा महामार्गावर डोळ्यात मिरची पूड टाकून तब्बल १० लाख ५० हजार रुपये आणि मोबाईल लुटल्याची माहिती डायल ११२ वर देण्यात आली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन खर्डा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपासाची चक्रे फिरवली. पोलिसांनी केलेल्या तपास चक्रावून टाकणारी माहिती समोर आली. लोकांचे देणे टाळण्यासाठी लुटीचा बनाव केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाल्याने बालाजी अर्जुन लांडगे (वय ३९, रा. सुर्वेगल्ली, खर्डा) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

10.5 lakh robbery case, Kharda police,  balaji landage, jamkhed news,

खर्डा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. ८ सप्टेंबर) दुपारी १२.०७ वाजता खर्डा पोलीस ठाण्याला डायल ११२ वर कॉल आला. जामखेड-खर्डा महामार्गावरील सतेवाडी फाट्याजवळ डोळ्यात मिरची पूड टाकून पैसे आणि मोबाईल लुटल्याचे कॉल करणाऱ्या व्यक्तीने सांगितले.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेत सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश जाधव, पोलीस उपनिरीक्षक अशोक खेडकर आणि पोलीस अंमलदारांनी तातडीने सतेवाडी फाटा गाठला. यावेळी बालाजी लांडगे याने पोलिसांना सांगितले की, आपण पुण्याहून खर्ड्याकडे येत असताना दोन मोटारसायकलींवरील व्यक्तींनी गाडी आडवी लावली. त्यानंतर डोळ्यात मिरची पूड टाकून गाडीतील १० लाख ५० हजार रुपये असलेली बॅग घेऊन ते पसार झाले.

पोलिसांनी या माहितीच्या आधारे घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली. मात्र तेथे संशयास्पद काहीही आढळून आले नाही. त्यानंतर जामखेड रोडवरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. लांडगे याने वर्णन केल्याप्रमाणे विनाक्रमांकाच्या स्प्लेंडर मोटारसायकलवरील संशयित या मार्गावरून गेल्याचे फुटेजमध्ये दिसून आले नाही.

त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. लांडगे याची सखोल चौकशी करण्यात आल्यानंतर १० लाख ५० हजार रुपयांच्या लुटीची माहिती खोटी असल्याचे निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. खर्ड्यातील काही लोकांचे पैसे देणे बाकी असल्याने ते देणे टाळण्यासाठी लुटीचा हा बनाव करण्यात आल्याचे पोलीस तपासात समोर आले.

डायल ११२ वर खोटी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल केल्याप्रकरणी बालाजी अर्जुन लांडगे याच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम २१२ नुसार खर्डा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमक्का, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्गे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुजितकुमार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश जाधव, पोलीस उपनिरीक्षक अशोक खेडकर तसेच संभाजी शेंडे, शशी म्हस्के, बाळू खाडे, राहुल खेडकर आणि प्रवीण थोरात यांनी कारवाईत सहभाग घेतला. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल संभाजी शेंडे करत आहेत.

दरम्यान, खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्वलसिंह राजपुत यांनी नागरिकांना डायल ११२ या आपत्कालीन सेवेचा गैरवापर न करण्याचे आवाहन केले आहे. या क्रमांकावर खोटी माहिती देणे किंवा विनाकारण वारंवार कॉल केल्यास संबंधित व्यक्तीविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.