धक्कादायक: म्युकर माइकोसिसचा अहमदनगर जिल्ह्यात झाला शिरकाव; जामखेड तालुक्यात झाली पहिल्या रूग्णाची नोंद !
जामखेड टाईम्स वृत्तसेवा : राज्यासह देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. ग्रामिण भारतात कोरोनाचा मोठा शिरकाव झाला आहे. वाड्या वस्त्या कोरोनाबाधित झाल्या आहेत. एकिककडे कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होत असतानाच कोरोनातून बरे झालेल्या रूग्णांसमोर आता आणखीन एक मोठे संकट उभे ठाकले आहे. कोरोना बाधितांमध्ये म्युकर मायकोसिसचा संसर्ग पाहायला मिळत आहे. या आजारावर वेळीच उपचार न झाल्यास रुग्णांचे डोळे काढावे लागत असल्याच्या घटना समोर येऊ लागल्या आहेत.अश्यात म्युकर मायकोसिसचा शिरकाव अहमदनगर जिल्ह्यात झाला आहे. यामुळे जिल्हा हादरून गेला आहे.
अहमदनगर जिल्ह्यात म्युकर मायकोसिसचा पहिला रूग्ण जामखेड तालुक्यातील पिंपरखेड या गावात आढळून आला आहे. रामभाऊ ढवळे (वय 48) असे रूग्णाचे नाव आहे. या रूग्णावर अहमदनगर येथील एका खाजगी रूग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहे. सदर रूग्णाचे दोन्ही डोळे सुजले आहेत तर नजरही कमी झाली आहे. सदर रूग्णाची कौटूंबिक परिस्थिती बेताची असल्याने पुढील उपचार कसे करायचे असा प्रश्न रामभाऊ ढवळे यांच्या कुटुंबियांना पडला आहे. समाजातील दानशुरांनी ढवळे यांच्या मदतीसाठी पुढे यावे असे अवाहन जामखेडचे तहसिलदार विशाल नाईकवाडे यांनी केले आहे.
डोकेदुखीकडे दुर्लक्ष करू नका
कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर काही रुग्णांना डोळ्यांची समस्या निर्माण होते किंवा त्यांचं डोकंदुखू लागतं. त्याकडे दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं. या त्रासामुळे म्युकोर मायकोसिस फंगलचं इन्फेक्शन होऊ शकतं. सायनसमध्ये आधी त्रास होतो. नंतर दोन ते चार दिवसात हे इन्फेक्शन डोळ्यापर्यंत जातं. त्यानंतर 24 तासात मेंदूपर्यंत जातं. अशा परिस्थितीत रुग्णाचे डोळे काढण्याशिवाय काहीच पर्याय राहत नाही. तसे न केल्यास रुग्णाचा जीव जाऊ शकतो.
म्युकर मायकोसिस हे एक प्रकारचं फंगल इन्फेक्शन आहे. नाक आणि डोळ्याला हे इन्फेक्शन होतं. आणि डोळे आणि नाकाच्या मार्गाने मेंदूपर्यंत पोहोचतं. वेळीच योग्य उपचार न मिळाल्यास या आजाराने मृत्यू ओढवतो. एवढं हे इन्फेक्शन्स धोकादायक असतं. कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी या आजाराबाबतची माहिती समोर आली होती. मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत या आजाराने अनेकांची दृष्टीच हिरावून गेतली आहे.
धोका कुणाला?
ज्यांची इन्युनिटी अत्यंत कमजोर आहे. त्यांना या आजाराचा सर्वाधिक धोका असतो. त्यामुळे या लोकांना अधिक सतर्क राहावे लागते. या लोकांना प्रचंड डोकेदुखी होते. डोळे लाल होतात, डोळेही प्रचंड दुखतात, डोळ्यांमधून पाणी येते, डोळ्यांची हालचाल कमी होते, असं तज्ज्ञ सांगतात.
म्युकर मायकोसिस म्हणजे काय?
म्युकोर मायकोसिस हे फंगल इन्फेक्शन आहे. हे इन्फेक्शन शरीरात वेगाने पसरते. त्याला ब्लॅक फंग्सही म्हणतात. मेंदू, फुफ्फुस आणि त्वचेवर याचं इन्फेक्शन होतं. या आजारात डोळ्यांची दृष्टीही जाते. काही रुग्णांच्या नाकाची हड्डी ठिसूळ होते. वेळीच उपचार न केल्यास रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो.
सदर रूग्णाची कौटूंबिक परिस्थिती बेताची असल्याने पुढील उपचार कसे करायचे असा प्रश्न रामभाऊ ढवळे यांच्या कुटुंबियांना पडला आहे. समाजातील दानशुरांनी ढवळे यांच्या मदतीसाठी पुढे यावे असे अवाहन जामखेडचे तहसिलदार विशाल नाईकवाडे यांनी केले आहे. ज्यांना ढवळे यांना मदत करावयाची आहे त्यांनी थेट जामखेडचे तहसिलदार विशाल नाईकवाडे यांच्याशी संपर्क करावा.