अखेर राज्यातील शाळा सुरू होणार : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली तारखांची घोषणा !

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : राज्यातील शाळा कधी सुरु होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. सरकारने राज्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. यासंदर्भात शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी घोषणा केली आहे.

राज्यातील सर्व शाळा या एक डिसेंबरपासून सुरु होणार असल्याचे वर्षा गायकवाड यांनी सांगितले. याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला असून पहिली ते दहावीचे वर्ग सुरु होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शिक्षणमंत्री वर्ष गायकवाड यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्या म्हणाल्या की, कोरोना संक्रमणामुळे आणि लॉकडाऊनमुळे गेली दीड वर्षाहून अधिक काळ शाळा बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. सध्या राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी आहे. यामुळे राज्यातील शाळा पुन्हा सुरु करण्यात येत असल्याबाबत घोषणा गायकवाड यांनी केली. त्यामुळे आता शाळा न पाहिलेल्या चिमुकल्यांना आता शाळेत जाता येणार आहे.

पाचवी ते बारावीच्या शाळा सुरू झाल्यानंतर आता इयत्ता पहिली ते चौथीचे वर्गही ऑफलाइन सुरु करण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मंत्रिमंडळ बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले.

तत्पूर्वी या विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष शाळा सुरू करण्यासाठी आरोग्य विभागाने परवानगी दिली होती. राज्याच्या कोविड टास्क फोर्सनेही पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना शाळेत येण्याबाबत हिरवा कंदिल दाखवला होता.

राज्यात कोविड-१९ संक्रमणग्रस्तांची संख्या गेले काही महिने सातत्याने कमी होत आहे. परिणामी परिस्थिती सामान्य होत असल्याने राज्य सरकारने टप्प्याटप्प्याने निर्बंध शिथील करत आणले आहेत.

शाळा सुरू करण्याबाबतची नियमावली खालीलप्रमाणे

१) शाळा सुरु करण्यापूर्वी कमीत कमी एक महिना संबंधित शहरात / गावात कोविडचा प्रादुर्भाव कमी झालेला असावा.

२) शिक्षकांचे लसीकरण करणे आवश्यक आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी नियोजन करावे.

३) विद्यार्थ्यांच्या पालकांना गर्दी टाळण्यासाठी शाळेच्या परिसरात प्रवेश देऊ नये.

४) कोविड संबंधी सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.

५) विद्यार्थ्यांमध्ये लक्षणे आढळून आल्यास किंवा तशी लक्षणे असल्यास विद्यार्थ्यांना घरी पाठविणे व लगेच कोरोना चाचणी करून घेणे.

६) विद्यार्थी कोविडग्रस्त झाल्याचे आढळल्यास तात्काळ शाळा बंद करुन शाळा निर्जंतुकीकरण करावी.

७) शाळा सुरू करताना मुलांना टप्प्या-टप्प्यात शाळेत बोलविण्यात यावे.