Ram Shinde News : प्रा. राम शिंदे यांच्या संघर्षाला विधान परिषद सभापतीपदाच्या रुपाने मिळाले सर्वोच्च फळ – अण्णा हजारे
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : स्वतःचे चारित्र्य स्वच्छ ठेवून राजकारण व समाजकारणात काम करणाऱ्या प्रा. राम शिंदे यांच्या संघर्षाला विधान परिषद सभापतीपदाच्या रुपाने सर्वोच्च फळ मिळाले, असे गौरवोदगार ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आज शनिवारी बोलताना व्यक्त केले. सभापतीपदाच्या रुपाने भविष्यातही ते स्वच्छ काम करतील, अशी अपेक्षा यावेळी हजारे यांनी व्यक्त केली. सत्काराबद्दल प्रा. शिंदे यांनी कृतज्ञता व्यक्त करताना सभापतीपदाच्या माध्यमातून जिल्ह्याच्या विकासाला गती देण्याची ग्वाही दिली.
सभापती प्रा. राम शिंदे यांच्या सर्वपक्षीय सत्कार सोहळ्याचे आयोजन शनिवारी (4 जानेवारी) येथील माऊली सभागृहात करण्यात आले होते. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे व पद्मश्री पोपटराव पवार यावेळी उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ समाजसेवक हजारे, पद्मश्री पवार, आमदार तांबे व आमदार ओगले यांच्या हस्ते प्रा. राम शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिंदे यांच्या पत्नी जामखेड पंचायत समितीच्या माजी सभापती आशाताई शिंदे, प्रा शिंदे यांचे चिरंजीव अजिंक्य शिंदे तसेच कर्जत जामखेड मतदार संघातील कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी माजी आमदार दादा कळमकर व बाळासाहेब मुरकुटे, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अॅड. अभय आगरकर, ठाकरे सेनेचे शहर प्रमुख संभाजी कदम, माजी महापौर भगवान फुलसोंदर, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य वसंत लोढा, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड, शिंदे सेनेचे जिल्हा प्रमुख बाबूशेठ टायरवाले, भाजपचे शहर सरचिटणीस सचिन पारखी, आरपीआयचे सुनील साळवे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना हजारे यांनी प्रा. शिंदे यांच्या संघर्षाचे कौतुक केले. त्यांनी राजकारण व समाजकारणात स्वतःला स्वच्छ ठेवल्याने या कार्यक्रमास आलो आहे. विधान परिषदेच्या सभापतीपदाच्या माध्यमातून त्यांच्या संघर्षाला न्याय मिळाला व सर्वोच्च पद मिळाले आहे. असेच स्वच्छ काम त्यांनी सभापतीपदाच्या माध्यमातून करावे, ही अपेक्षा आहे व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छाही आहेत, असेही हजारे यांनी आवर्जून सांगितले.
सीना नदी स्वच्छ करा- पोपटराव पवार
पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी देशभरात पाण्यासाठी सामाजिक काम केले आहे. त्यांचा वारसा जपणार्या प्रा. राम शिंदे यांना सर्वोच्च पद मिळाल्याने त्यांचा आगळावेगळा गौरव झाला आहे. या पदाच्या माध्यमातून प्रा. शिंदे यांनी सीना नदी स्वच्छ करण्याची मोहीम हाती घ्यावी, असे आवाहन करून पद्मश्री पोपटराव पवार म्हणाले, समाजकारण व राजकारण एकाच धाग्याने बांधण्याची परंपरा नगर जिल्ह्याला आहे. त्याचे दर्शन व जपवणूक प्रा. शिंदेंच्या सर्वपक्षीय सत्कार समारंभातून झाले आहे. ही परंपरा पुढेही कायम राहावी तसेच जिल्ह्यात सरकारी वैद्यकीय महाविद्यालय होण्यासाठी प्रा. शिंदे यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहनही पवारांनी केले.
द़ृढनिश्चय व लक्ष्यभेद करण्याची ताकद बाळगून संघर्ष करीत राहिलो, त्यामुळे सभापतीपदासारखे सर्वोच्च पद मला मिळाले – प्रा राम शिंदे
शुगर लॉबीच्या व प्रस्थापितांच्या जिल्ह्यात मी अगदीच छोटा आहे. मी स्वप्नच बघू शकत नाही. पण द़ृढनिश्चय व लक्ष्यभेद करण्याची ताकद बाळगून संघर्ष करीत राहिलो, त्यामुळे सभापतीपदासारखे सर्वोच्च पद मला मिळाले, असे स्पष्ट करून सत्काराला उत्तर देताना प्रा. शिंदे म्हणाले, देवावर माझी श्रद्धा आहे व देवाभाऊवरही श्रद्धा आहे. ती अपार निष्ठा आहे. मंत्री, प्रदेशाध्यक्ष, सभापती अशा विविध पदांसाठी माझे नाव कायम चर्चेत असायचे. पण मला मिळालेले कोणतेही पद सहजासहजी मिळालेले नाही. संघर्ष करावाच लागला आहे, असेही सभापती राम शिंदे यांनी आवर्जून सांगितले.
कर्जत-जामखेडचा भूमिपुत्र विधानसभा निवडणुकीत हरला असला तरी अहिल्यानगरचा सुपुत्र विधान परिषदेच्या सभापतीपदी विराजमान होऊन यशस्वी ठरला आहे, असे भाष्य करून ते पुढे म्हणाले, सत्ता कधीही माझ्या डोक्यात गेली नाही. कारण, गरिबी. राजकारण-समाजकारणात कोणाचेही पाय ओढण्याची माझी प्रवृत्ती नाही. जिथे जाईल तेथे आपले स्वतःचे स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान झालेल्या पराभवांतून कधीही खचलो नाही. धनगर समाजाचा मी पहिला व्यक्ती आहे की, जो विधान परिषदेच्या सभापतीपदी विराजमान झाला आहे, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.
सीना-साकळाई-कुकडीकडे लक्ष
यावेळी बोलताना सभापती प्रा. शिंदे यांनी जिल्ह्यातील विकास कामांना गती देण्याची ग्वाही दिली. सीना नदी स्वच्छतेसाठी लवकरच बैठक घेऊन तेथे पद्मश्री पोपटराव पवारांना बोलावले जाईल. तसेच साकळाई पाणी योजना व कुकडीच्या पाच टीएमसी पाणी वाटपाबाबतही निर्णय घेऊ, असे त्यांनी सांगितले. आता बोलण्यापेक्षा कृती करू तसेच उत्तर व दक्षिण असा वाद न करता दक्षिणेतील वंचित भागात सुविधा निर्माण करण्यास प्राधान्य देऊ, असेही त्यांनी आवर्जून स्पष्ट केले.
या कार्यक्रमासाठी महायुतीचे दहा आमदार, महाविकास आघाडीचे दोन आमदार व दोन खासदार निमंत्रित होते. पण महायुतीचे कोणीही आले नाही. महाविकास आघाडीचे दोन्ही खासदारही फिरकले नाहीत. फक्त विधान परिषदेचे अपक्ष आमदार सत्यजित तांबे व श्रीरामपूरचे आमदार हेमंत ओगले हे दोघेच राजकीय नेते उपस्थित होते. त्यामुळे या कार्यक्रमात अपेक्षित असलेली राजकीय जुगलबंदी झालीच नाही. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत वाघ यांनी प्रास्ताविक केले. अॅड. अभय आगरकर यांनी स्वागत केले व हिंदू राष्ट्र सेनेचे संजय आडोळे यांनी आभार मानले. यावेळी दादा कळमकर, फाळके, मुरकुटे, तांबे, ओगले यांची भाषणे झाली.