BJP Member Registration Campaign 2025 : देशात आणि राज्यात आपलं सरकार; अभिमानाने आणि स्वाभिमानाने भाजपचे सदस्य व्हा – विधान परिषद सभापती प्रा राम शिंदे यांचे अवाहन
BJP Member Registration Campaign 2025 : भाजपा सदस्य नोंदणी महाअभियानात सर्वांनी सहभाग घ्यावा, प्रत्येक बुथवर २५० लोकांची नोंदणी झाली पाहिजे यासाठी काम करा.सर्व स्तरातील लोकांचा त्यात सहभाग ठेवा. महिलांनाही संधी द्या.आपल्या जामखेड तालुक्यात ३७ हजार ७५० एवढी सदस्य नोंदणी झाली पाहिजे, त्यादृष्टीकोनातून आपण सर्वांनी प्रयत्न करावेत.देशात आणि राज्यात आपलं सरकार आहे.अभिमानाने आणि स्वाभिमानाने भाजपचे सदस्य व्हा, असे अवाहन महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य प्रा राम शिंदे यांनी केले.
विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत जामखेड तालुक्यातील पिंपरखेड येथे रविवारी ५ जानेवारी रोजी भाजपा सदस्य नोंदणी महाअभियानाचा मोठ्या उत्साहात शुभारंभ करण्यात आला.ऐन कडाक्याच्या थंडीत पार पडलेल्या कार्यक्रमास कार्यकर्ते व गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी पिंपरखेड ग्रामस्थांनी प्रा शिंदे यांचा नागरी सत्कार केला. यावेळी आयोजित कार्यक्रमात प्रा शिंदे बोलत होते.
यावेळी भाजपाचे जेष्ठ नेते प्रा मधुकर राळेभात, तालुकाध्यक्ष अजय काशिद, बाजार समिती सभापती शरद कार्ले, माजी जि. प. सदस्य सोमनाथ पाचरणे, मनोज कुलकर्णी, सरपंच बापुराव ढवळे, पांडुरंग उबाळे, युवा नेते प्रशांत शिंदे, सरपंच सुशिल आव्हाड, संचालक डाॅ गणेश जगताप, लहू शिंदे, विष्णू गंभीरे, मोहन पवार, अमित जाधव, नितीन कोल्हे, काशिनाथ ओमासे, सरपंच राजेंद्र ओमासे, अंकुश ढवळे, उदय पवार, नजीरभाई शेख, सचिन चोरगे, उध्दव हुलगुंडे चेअरमन सह आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
तुमच्या सर्वांच्या आशिर्वादाने मी विधानपरिषदेचा सभापती झालो – प्रा. राम शिंदे
यावेळी पुढे बोलताना प्रा शिंदे म्हणाले की, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत आपण कुठे कमी पडलो असं नाही पण आपला पराजय झाला, तो आपण मान्यही केला नाही. अतितटीच्या लढाईत कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. संघर्ष केला.आपापल्या गावात अधिकची मतं मिळवण्यासाठी चिकाटीने काम केलं. पण यश आलं नाही. दोन वेळेस आपण जिंकलो आणि दोन वेळेस आपण हरलो. गेल्या वेळेस हरलो तरीही आमदार होऊन आलो. आताच्या निवडणुकीत आपला अल्पशा मताने पराभव झाला, पण महिनाभरातच तुमच्या सर्वांच्या आशिर्वादाने मी विधान परिषदेचा सभापती झालो. या पदाला आपण न्याय देऊ, जनतेची कामे करू, नेतृत्वाने टाकलेली जबाबदारी सिध्द करून दाखवू, असा शब्द यावेळी त्यांनी दिला.
त्याच्यामुळे मी भाग्यवान आहे
जिथं आपण जातो तिथं दुसर्याला खोड्या करण्यापेक्षा आपली जागा मजबुत करण्यावर माझं लक्ष असतं हे तुम्हाला चांगलचं माहित आहे. दुसर्याला खोड्या करत, दाबत, माणूस काही मोठा होत नाही. त्याच्यातच जास्त वेळ वाया जातो, असे सांगत राम शिंदे पुढे म्हणाले, आण्णा हजारे यांच्या भूमिकांमुळे अनेकदा सरकार हादरतं, दिल्लीतले सरकार बदललं.
माझ्या जीवनात मोठं भाग्य आहे की, जेष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांनी नगरमध्ये माझा सत्कार केला आणि त्यांनी मला आशिर्वाद दिला. माझ्याविषयी ते जे काही दोन शब्द बोलले ते पाहून मी आयुष्यात सगळं कमवलं असं मला वाटलं. त्यांनी सांगितलं स्वच्छ आणि निष्कलंक, कुठलाही डाग नसलेल्या व्यक्तीच्या सत्काराला मी आलोय, आज पर्यंतच्या इतिहासात राजकारणातील सत्ताधारी दोनच व्यक्तींच्या कार्यक्रमाला गेलोय. एक म्हणजे स्वर्गीय आर आर पाटील आणि दुसरा म्हणजे मी, त्याच्यामुळे मी भाग्यवान आहे, असे सांगत शिंदे हे यावेळी काहीसे भावनिक झाले होते.
मी भाजपचा नसतो तर सभापती झालो असतो का ?
लोकं म्हणले पद खूप मोठं आहे. हे कामं करता येणार नाही, ते काम करता येणार नाही. मला त्यांना प्रश्न आहे की, मी भाजपचा नसतो तर सभापती झालो असतो का ? मग आता भाजपचं सदस्य नोंदणी अभियान पुढं होऊन मी नाही केलं तर मग दुसरं कोण करेल? सदस्य नोंदणीत भाग घेतला म्हणजे मला सगळीकडे भाग घेता येतो, असे शिंदे म्हणताच उपस्थितांनी त्यांना जोरदार दाद दिली.
अन् पुण्याच्या कलेक्टरला नोटीस धाडली
मी पहिल्यांदा पुण्याला गेलो. सगळं दिवसभराचं काम उरकलं आणि संध्याकाळी कलेक्टरला सांगितलं की प्रोटोकॉल आणि शिष्टाचार प्रमाणे आजची कारवाई झालीय का ? झाली असली तर तसा अहवाल पाठवा, नसली झाली तर कोणी चुक केली तसा अहवाल पाठवा, त्यानुसार पहिली नोटीस पुण्याच्या कलेक्टरला काढली. त्यानंतर छत्रपती संभाजीनगरला एका कामानिमित्त गेलो होतो तेव्हा, सर्व वरिष्ठ विभागीय अधिकारी दोन तास माझी वाट बघत तिथे उपस्थित होते. राज्याचे मुख्यमंत्री यांचा जो प्रोटोकॉल आहे त्यांच्यानंतर मी आहे. बाकीचं जाऊद्या तिकडं, तुमच्यापुरता मी भरून पुरुनय, तुमच्या अडचणी दुर करण्यासाठी मी कधीही रात्रीच्यालाही हजर आहे, असे वक्तव्य शिंदे यांनी करताच उपस्थितांनी जोरदार दाद दिली.