अहमदनगर जिल्ह्यातील 12 गावांमधील वाळूसाठ्यांचा होणार ऑनलाईन लिलाव | Online auction of sand stocks from 12 villages in Ahmednagar district

जामखेड टाईम्स वृत्तसेवा | अहमदनगर जिल्ह्यातील 12 गावांमधून वाहणाऱ्या नद्यांमधील 23 हजार 942 ब्रास वाळूसाठ्याचा लिलाव होणार आहे. तब्बल वर्षभरानंतर जिल्हा प्रशासनाने वाळूलिलावाची प्रक्रिया सुरू केली आहे. लवकरच हा लिलाव ऑनलाईन पध्दतीने होणार आहेत. (Online auction of sand stocks from 12 villages in Ahmednagar district)

अहमदनगर जिल्ह्याला गौणखनिजातून दरवर्षी कोट्यावधींचा महसूल प्राप्त होत आहे. गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात वाळू लिलावाच्या चार फेऱ्या घेण्यात आल्या होत्या. मात्र, म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नव्हता.त्यामुळे दोनच वाळूसाठ्यांचा लिलाव झाला होता. या लिलावातून सरकारला ३ कोटी ८५ लाख रुपयांचा महसूल प्राप्त झाला होता.

अहमदनगर जिल्हा प्रशासनावा  2021 – 22, 2022 -23 व 2023-24 या तीन आर्थिक वर्षासाठी नदीपात्रांतील वाळूसाठ्यांचा लिलाव करण्यास राज्य सरकारने मुभा दिली आहे. त्यानुसार पहिल्या फेरीसाठी 12 गावांतील गोदावरी, भीमा, घोड, मुळा व प्रवरा या नदीपात्रांतील वाळूसाठ्यांवा लिलाव आयोजित केला आहे.

कोपरगाव वा तालुक्यातील डाऊच खुर्द, कुंभारी,काष्टी, वांगदरी, डोमाळवाडी, आदी गावांतील घोड नदीवरील वाळूसाठे लिलावासाठी निश्चित केली आहेत. राहुरी तालुक्यातील वळण या गावातील मुळा व महालगाव येथील प्रवरा नदीपात्रातील एक अशा प्रकारे १२ गावांतील एकूण २३ हजार ९४२ ब्रास वाळूसाठ्यांचा लिलाव ऑनलाईन आयोजित केला आहे.

कोपरगाव तालुक्यातील गोदावरी नदी पात्रांत ८ हजार ८०० ब्रास वाळूलिलावासाठी उपलब्ध आहे. घोड नदीपात्रात ८ हजार ९२ ब्रास तर प्रवरा व मुळा नदीपात्रांत एकूण ७ हजार ७० ब्रास वाळूसाठा उपलब्ध आहे.जिल्हा प्रशासनाने २ फेब्रुवारी २०२२ रोजी ऑनलाईन लिलाव आयोजित केला आहे.

एक ब्रास वाळूचा दर 4 हजार 525

सध्या राज्य सरकारने 1 ब्रास वाळूला 4  हजार 525 रुपये दर जाहीर केलेला आहे. यापेक्षा कमी दरात लिलाव करता येणार नाही. दरवर्षी यामध्ये बदल होत आहे. सरकारने जाहीर केलेल्या दरापेक्षा अधिक दर लिलावात मिळतो. मात्र,चोरटी वाळू पकडल्यास संबंधित वाहनचालकांकडून बाजारभावाच्या पाचपटीने दंड वसूल करुन गुन्हा दाखल केला जात आहे.

लिलावातून 11 कोटींचा महसुल अपेक्षित

अहमदनगर जिल्ह्यातील 12 गावांमधून होणाऱ्या 24 हजार ब्रास वाळूसाठ्यांतून राज्य सरकारला ११ कोटी ३१ लाख ५० हजार ४९६ रुपयांचा महसूल राज्य सरकारच्या तिजोरीत अपेक्षित आहे.

जिल्ह्यात वाळूतस्कर बोकाळले

अहमदनगर जिल्ह्यात अवैध वाळू तस्करीचे मोठे रॅकेट सक्रीय आहे.राजकारणी आणि प्रशासनाच्या आशीर्वादाने वाळू तस्कर बोकाळले आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात वाळूतस्करांचा हैदोस सुरू आहे.वाळू तस्करांचा बिमोड करण्यासाठी कठोर पावले उचलली जाणे अपेक्षित आहेत परंतू जुजबी कारवाया करून तेरी भी चुप मेरी चुप चा ड्रामा राजरोस सुरू आहे.