नान्नज दरोडा प्रकरणाचा पर्दाफाश; कुख्यात टोळीतील पाच दरोडेखोरांना बेड्या, १० गुन्हे उघडकीस, मास्टरमाईंड महिला फरार

जामखेड टाइम्स वृत्तसेवा :  जामखेड तालुक्यातील नान्नज येथे पडलेल्या सशस्त्र दरोड्याचा छडा लावण्यात अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेला (LCB) मोठे यश आले आहे.या कारवाईत पोलिसांनी कुख्यात टोळीतील पाच दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या असून, त्यांच्याकडून जामखेड व खर्डा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जबरी चोरी व घरफोडीचे तब्बल १० गंभीर गुन्हे उघडकीस आले आहेत. पोलिसांनी आरोपींकडून ६ लाख ९२ हजार ५०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत.

१ ऑक्टोबर २०२६ रोजी मध्यरात्री दोनच्या सुमारास फिर्यादी मनिषा श्रीमंत गोरे (वय ४५, रा. नान्नज, ता. जामखेड) यांच्या घरावर अज्ञात दरोडेखोरांनी सशस्त्र हल्ला चढवला होता. दरोडेखोरांनी चाकू आणि कोयत्याचा धाक दाखवून कुटुंबातील सदस्यांना धमकावत सोन्याचे दागिने व रोकड असा सुमारे १५ लाखांचा ऐवज जबरीने लुटून नेला होता. या प्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गंभीर गुन्ह्याची नोंद करताना पोलिसांनी सुरुवातीला टाळाटाळ केल्याचा, आरोपींची संख्या कमी दाखवल्याचा आणि साधी कलमे लावल्याचा आरोप करत फिर्यादी गोरे कुटुंब आक्रमक झाले होते. ३ ऑक्टोबर रोजी चार महिन्यांच्या २ चिमुकल्यासह पीडित कुटुंब व नान्नज ग्रामस्थांनी जामखेड-करमाळा रस्त्यावर तब्बल तीन तास रास्ता रोको आंदोलन केले होते. प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यानंतर ४ ऑक्टोबर रोजी विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी गोरे कुटुंबाची भेट घेऊन धीर दिला होता. या प्रकरणातील आरोपींना तात्काळ जेरबंद करण्याचे कडक निर्देश त्यांनी पोलिसांना दिले होते.

घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन आणि अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला समांतर तपासाचे आदेश दिले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे व पथकाने घटनास्थळाची पाहणी करून तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू केला होता.

७ ऑक्टोबर रोजी नान्नज येथील दरोडा पिंपळगाव आवळा येथील कुख्यात प्रदीप ऊर्फ गुड्या काळे याने साथीदारांसह केल्याची खात्रीशीर माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तातडीने पिंपळगाव आळवा व वाकी परिसरात छापा टाकून पाच जणांना ताब्यात घेतले.

नान्नज दरोडा प्रकरणात पाच आरोपी जेरबंद; चार जण फरार

  • अटक करण्यात आलेले आरोपी:
  • प्रदीप ऊर्फ गुड्या बिडकुत्या काळे (वय ३०, रा. पिंपळगाव आळवा, ता. जामखेड)
  • अनिल सुल्या पवार (वय ३४, रा. पिंपळगाव आळवा, ता. जामखेड)
  • सुविकास बिडकुत्या काळे (वय ४५, रा. पिंपळगाव आळवा, ता. जामखेड)
  • रूक्या ऊर्फ लोकेश बिडकुत्या काळे (वय ३५, रा. पिंपळगाव आळवा, ता. जामखेड)
  • समाधान ऊर्फ कारभारी दीपक काळे (वय २१, रा. वाकी, ता. जामखेड)

महिला निघाली नान्नज दरोड्याची मास्टरमाईंड

या दरोड्याचे संपूर्ण नियोजन चोभेवाडी येथील सारिका चंदन काळे हिच्या सांगण्यावरून करण्यात आले होते. चोरीचे सोने सारिका आणि तिचा पती परबत शिंदे यांच्याकडे विकण्यासाठी देण्यात आले होते. सध्या सारिका काळे, लवचिक्या ऊर्फ लहू जालिंदर पवार (रा. घोडेगाव), सोन्या नंग्या काळे (रा. धनेगाव) आणि परबत ऊर्फ प्रभाकर शिंदे (रा. जालना, हल्ली रा. कोरफळे, ता. बार्शी) हे चौघे फरार असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.

१० गुन्ह्यांची कबुली, लाखो रुपयांचे दागिने जप्त

ताब्यातील आरोपींकडे पोलिसी खाक्या दाखवून चौकशी केली असता, त्यांनी नान्नज दरोड्यासह जामखेड तालुक्यातील राजुरी, डोळेवाडी, आरणगाव, धामणगाव, वंजारवाडी, बुऱ्हाणपूर आणि चौंडी परिसरात रात्रीच्या वेळी केलेल्या घरफोड्यांची कबुली दिली. चोरीचे सोने आरोपींनी वाकी येथील ओळखीचे इसम भाऊ बिभीषण सावंत व हनुमंत आबासाहेब वायकर यांच्याकडे ठेवले होते.

  • पोलिसांनी पंचांसमक्ष खालील मुद्देमाल जप्त केला
  • सोन्याची अंगठी (०.५ ग्रॅम) – ₹७,०००
  • सोन्याचे मंगळसूत्र (५ ग्रॅम) – ₹७५,०००
  • सोन्याची बोरमाळ (१० ग्रॅम) – ₹१,५०,०००
  • सोन्याची बोरमाळ ३० मणी (१० ग्रॅम) – ₹१,५०,०००
  • सोन्याचे मणीमंगळसूत्र (७ ग्रॅम) – ₹१,०५,०००
  • सोन्याचे दोन गंठण (प्रत्येकी ५ व १० ग्रॅम) – ₹२,२५,०००
  • सोन्याची कर्णफुले (५ ग्रॅम) – ₹७५,००० एकूण जप्त मुद्देमाल: ६ लाख ९२ हजार ५०० रुपये
  • तसेच अटकेतील आरोपी रूक्या ऊर्फ लोकेश काळे हा २०१५ मधील जबरी चोरीच्या गुन्ह्यातही पोलिसांना हवा होता.

कारवाई करणारे तपास पथक

ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, पोउपनि अनंत सालगुडे, पोलीस अंमलदार निळकंठ कारखेले, फुरकान शेख, श्यामसुंदर जाधव, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, मनोज साखरे, बाळासाहेब खेडकर, अमोल आजबे, प्रकाश मांडगे, प्रशांत राठोड, सुनिता पवार आणि अरूण मोरे यांच्या पथकाने केली. पुढील तपास जामखेड पोलीस करत आहेत.