जामखेड शहरात भीषण पाणीबाणी, ३० वाड्या-वस्त्यांसाठी १५ टँकर मंजूर! ५० किलोमीटरहून शहरात येणार पाणी

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : यंदा पावसाने ओढ दिल्याने दुष्काळाने हाहाकार उडवला आहे. जामखेड शहरासह उपनगरांमध्ये खतरनाक पाणीबाणी निर्माण झाली आहे. भीषण पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नगरपरिषद हद्दीतील सुमारे ३० वाड्या वस्त्यांसाठी १५ टँकर मंजूर केले आहे. विशेष म्हणजे, हे पाणी ५० किलोमीटर अंतरावरील ‘मांदळी’ उद्भवावरून शहरात आणले जाणार असून, २० हजार नागरिकांना दररोज ६ लाख लिटर पाणीपुरवठा केला जाणार आहे.

Severe water crisis in Jamkhed town,15 tankers sanctioned for 30 hamlets and settlements, Water to be brought to the town from distance of 50 kilometers,

सध्या भूतवडा व काझेवाडी या दोन्ही तलावांनी तळ गाठला आहे. यामुळे जामखेड शहरात पाणी टंचाईचा मोठा उद्रेक झाला आहे. त्यातच कोट्यावधी खर्चाची उजनी पाणी योजना रखडली आहे. शहरातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी नगरपरिषदेच्या कारभार्‍यांना अपयश येत असल्याने जनतेत मोठा रोष निर्माण झाला असून सध्या शहरात १२ ते १५ दिवसाला पाणी सुटते.ऐन हिवाळ्यात नागरिकांचे पाण्यासाठी हाल सुरु आहेत.

जामखेड शहरातील विविध भागांत दरडोई दरदिवशी पिण्याच्या पाण्याची उपलब्धता २० लिटरपेक्षा कमी झाल्याने तीव्र टंचाई निर्माण झाली होती.यामुळे टँकर सुरु करण्याची मागणी जोर धरत होती. त्यानुसार प्रशासनाने प्रांत कार्यालयाकडे टँकर मंजुरीचा प्रस्ताव पाठवला होता. जामखेड शहरात निर्माण झालेल्या भीषण टंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रांत कार्यालयाने १५ टँकर मंजुर केले आहेत.

दररोज ३० खेपा; ६ लाख लिटर पाण्याचे नियोजन

प्रशासनाने, माणसी ३० लिटरप्रमाणे २०,००० लोकसंख्येसाठी दररोज ६ लाख लिटर पाणी देण्याचे नियोजन केले आहे. यासाठी १५ टँकरने ३० खेपा टाकल्या जाणार असून सदरचे पाणी जामखेडपासून ५० किलोमीटर अंतरावरील मांदळी येथून आणण्यात येणार आहे.

‘या’ ३० वाड्या-वस्त्यांना मिळणार टँकरचे पाणी

प्रशासनाच्या आदेशानुसार जामखेड नगरपरिषद हद्दीतील आरोळेवस्ती, कोल्हे मळा वस्ती, आजबेवस्ती, आय.टी.आय. परिसर, द्रोणागिरी नगर, समता नगर, गुलमोहर नगर, म्हाडा कॉलनी, नवीन कोर्ट परिसर, बोराटेवस्ती, बेलेकरवस्ती, जगदाळेवस्ती, बटेवाडी, मोरेवस्ती, राळेभात वस्ती, संताजी नगर, जिजामाता नगर, विकास नगर, मार्केट यार्ड, धोत्री, लेहनेवाडी, जांबवाडी, शेळकेवस्ती, माने वस्ती, देशपांडे नगर, संपूर्ण कर्जत रोड परिसर, अंदुरे पंप शेजारील परिसर, हिमालय पेट्रोल पंप परिसर, अहिल्यावस्ती, सम्राट फटाका दुकान परिसर, चुंबळी आणि जमदारवाडी या भागांना टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जाणार आहे.

प्रशासनाच्या कडक अटी आणि नियम

टँकरद्वारे दररोज पहाटे ५:०० ते सायंकाळी ९:०० वाजेपर्यंतच पाणीपुयवठा करणे बंधनकारक. विनाकारण उशिराने पाणीपुरवठा केल्यास संबंधित ठेकेदारावर भाडे कपातीची कारवाई केली जाणार

मंजूर टँकरने दररोज ठरवून दिलेल्या खेपा पूर्ण केल्या आहेत की नाही, याची खात्री करून मुख्याधिकारी आणि तहसीलदारांनी दररोज सायंकाळी ५:०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय आणि उपविभागीय कार्यालयाला अहवाल सादर करणे अनिवार्य आहे.

वाड्या-वस्त्यांवर एका निश्चित ठिकाणी टँकर खाली करण्यासाठी नगरपरिषदेने सिंटेक्स टाक्यांची व्यवस्था करावी. तसेच ज्या विहिरीत पाणी सोडले जाईल, तिथे पुरेशा प्रमाणात जंतुनाशक औषधाचा वापर करावा.

गावच्या १.५ कि.मी. परिसरात खाजगी विहिरीस पाणी उपलब्ध असल्यास प्रथम विहीर अधिग्रहण करण्याची कार्यवाही करावी आणि शासकीय खर्चात बचत करावी.

पुरेसा पाऊस झाल्यास किंवा मूळ उद्भवास पाणी उपलब्ध होताच टँकर तात्काळ बंद करण्याची जबाबदारी तहसीलदार व मुख्याधिकाऱ्यांवर राहणार

कारभार्‍यांनो जुन्या चुका कराल तर….

जामखेडकरांना शुद्ध, स्वच्छ आणि मुबलक पाणीपुरवठा होण्यासाठी नगरपरिषद प्रशासन व सर्व नगरसेवकांना आता डोळ्यात तेल घालून काम करावे लागणार आहे. गतकाळात टँकरद्वारे पाणीपुरवठा करताना ज्या गंभीर चुका आणि गैरप्रकार झाले, त्याची पुनरावृत्ती झाल्यास जनतेच्या तीव्र उद्रेकाला सामोरे जावे लागेल आणि याचा थेट राजकीय फटका सत्ताधारी गटाला बसेल, अशी जोरदार चर्चा सध्या शहरात रंगली आहे.

ऐन हिवाळ्यातच जामखेडमध्ये टँकर सुरू करण्याची वेळ आल्याने आगामी उन्हाळ्यात पाण्याची स्थिती किती गंभीर असेल, याची चिंता नागरिकांना सतावत आहे. दरम्यान, प्रशासनाने मंजूर केलेल्या या १५ टँकरमुळे ३० वाड्या-वस्त्यांमधील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता टँकर कधी सुरु होणार याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.