दिवेआगर समुद्रकिनाऱ्यावर मृत्यूचे तांडव! सहलीचा आनंद ठरला अखेरचा; आळंदीतील ८ विद्यार्थ्यांचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : दिवस मावळतीकडे झुकलेला.. वेळ सायंकाळी साडेपाचची.. पर्यटकांनी गजबजलेला दिवेआगरचा समुद्रकिनारा आणि सर्वत्र आनंदाचे वातावरण! काही पर्यटक मौजमजेत दंग, तर काही जण लाटांवर पोहण्याचा आनंद घेण्यासाठी समुद्रात उतरलेले… पण पुढच्याच काही क्षणांत काळ मृत्यूचे तांडव मांडेल, याची पुसटशी कल्पनाही कोणाला नव्हती. पण नियतीने असा काही क्रूर डाव साधला की, उसळणाऱ्या लाटांनी ८ कोवळ्या जीवांना आपल्या कवेत ओढून घेतले आणि गुरुवारची ती हसती-खेळती सायंकाळ एका क्षणात काळरात्र ठरत संपूर्ण किनारा शोकसागरात बुडाला !

Tragedy strikes Diveagar beach, Joyous excursion turns fatal, eight students death from Alandi drown in sea,

रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या दिवेआगरच्या किनाऱ्यावर घडलेल्या या भीषण दुर्घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. सहलीसाठी आलेल्या आळंदी (जि. पुणे) येथील खासगी अकॅडमीतील आठ विद्यार्थ्यांचा समुद्रात बुडून करुण अंत झाला. मृत्युमुखी पडलेले सर्वजण अवघ्या १६ वर्षांचे होते.

आळंदीतील ‘विनार्स अकॅडमी’ या खाजगी पोलीस प्रशिक्षण केंद्रातील (११ वी आणि १२ वी सायन्सचे) ४२ विद्यार्थी शिक्षकांसह दिवेआगरला सहलीसाठी आले होते. त्यात १७ विद्यार्थिनी आणि २५ विद्यार्थी होते. अभ्यासाचा ताण मागे ठेवून आलेल्या या मुलांसाठी गुरूवारचा दिवस म्हणजे मोकळा श्वासच होता. पण नियतीच्या मनात काही वेगळेच होतं,  सायंकाळ होत आली आणि काही विद्यार्थी पोहण्याच्या मोहाने समुद्रातील पाण्यात उतरले.

समुद्रातील उसळणाऱ्या लाटांचा आणि पाण्याच्या खोलीचा अंदाज चुकला आणि वेगवान प्रवाहाने पाहता पाहता काहींना खोल समुद्राकडे ओढायला सुरुवात केली आणि सर्वत्र हाहाकार उडाला. मुले बुडत असल्याचे दिसताच किनाऱ्यावरील शिक्षक आणि इतर विद्यार्थ्यांनी एकच हंबरडा फोडला. त्या आक्रोशाने किनारा हादरला. स्थानिक नागरिक आणि जीवरक्षक क्षणाचाही विलंब न लावता समुद्रात उतरले. लाटांशी झुंज देत शर्थीच्या प्रयत्नांनी आठही जणांना पाण्याबाहेर काढण्यात आले आणि तातडीने बोर्ली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी करून आठही विद्यार्थ्यांना मृत घोषित केले. खाकी वर्दीचे स्वप्न उराशी बाळगून भविष्य घडवण्यासाठी धडपडणाऱ्या या मुलांचा असा दुर्दैवी अंत पाहून तिथे उपस्थित प्रत्येकाचेच डोळे पाणावले.

दिवेआगर दुर्घटनेतील मृतांची नावे

  1. यश किरण वानखेडे
  2. सोहम तुकाराम भांडवलकर
  3. तन्मय दत्तात्रय वाहिले
  4. कौस्तुभ संदीप दौंड
  5. कैवल्य वासनकर
  6. राजवीर वहिले
  7. प्रणव बनसोडे
  8. सुमित अहिरे

दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, महसूल आणि आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी आणि रुग्णालयात पोहोचले. प्रशासनाच्या देखरेखीखाली मृतदेहांची ओळख पटवून पंचनामे आणि शवविच्छेदनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली.

एकाच संस्थेतील आठ विद्यार्थ्यांचा एकाच वेळी मृत्यू झाल्याचे वृत्त आळंदीत पोहोचताच संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली. सहलीला हसतखेळत निघालेल्या सोळा वर्षांच्या लेकरांच्या परतण्याची वाट पाहणाऱ्या कुटुंबांना आता केवळ हा काळीज चिरणारा निरोप मिळाला आहे. त्या घरांवर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे.

या दुर्घटनेनंतर प्रशासनाने किनाऱ्यावर येणाऱ्या सर्व पर्यटकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. समुद्रात उतरण्यापूर्वी स्थानिक परिस्थिती, भरती-ओहोटीची वेळ, पाण्याची खोली आणि प्रवाहाचा अंदाज घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रशासनाने लावलेल्या सूचना फलकांचे आणि नियमांचे काटेकोर पालन करावे, तसेच अतिउत्साहात खोल पाण्यात जाऊन जीव धोक्यात घालू नये, अशी विनंती करण्यात आली आहे.

कारण समुद्र कोणालाही दुसरी संधी देत नाही. दिवेआगरच्या किनाऱ्यावर आज जे घडले, त्याची किंमत आठ कुटुंबांना आयुष्यभराच्या पोकळीने मोजावी लागणार आहे.

दिवेआगर समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांच्या बुडून मृत्यूच्या घटनेनंतर समुद्रकिनाऱ्यावरील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. संबंधित बीचवर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक दिशादर्शक फलक किंवा सावधानतेचा इशारा देणारे फलक दिसून येत नाहीत. त्यामुळे समुद्रातील धोकादायक भागांची माहिती पर्यटकांना कशी मिळणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.