मोठी बातमी : खासदार नवनीत राणांची खासदारकी धोक्यात ?

जामखेड टाईम्स वृत्तसेवा: राज्यात वेगवेगळ्या कारणांनी सतत चर्चेत राहणाऱ्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांची खासदारकी आता धोक्यात आली आहे. नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केलं आहे. नवनीत राणा यांनी शिवसेनेचे जेष्ठ नेते आनंदराव अडसूळ यांचा 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पराभव केला होता.

अनुसुचित जातीसाठी राखीव असलेल्या अमरावती मतदार संघात राणा यांनी बनावट जात प्रमाणपत्र दाखवल्याचा आरोप करत अडसूळांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती.या याचिकेवर सुनावणी दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने राणा यांचं प्रमाणपत्र रद्द केलं आहे. यावेळी नवीनत राणा यांना दोन लाखांचा दंड आणि सहा आठवड्यात सर्व प्रमाणपत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत. 2014 सालीही नवनीत राणा या मतदार संघातून अपक्ष उमेदवार म्हणून लढल्या होत्या. दरम्यान या प्रकरणात नवनीत राणा यांच्या वकीलांनी कोर्टाकडे कागदपत्र सादर करण्यासाठी वेळ मागितला आहे. या निर्णयाला नवनीत राणा सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.