श्रीमंतांचा राक्षसी चेहरा! सासरचा जाच,उच्चशिक्षित पायल झांबरेचा बळी; पती अक्षय झांबरेला बेड्या, चौघांवर गुन्हे दाखल
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : बाहेरून लखलखणारी कोट्यवधींची श्रीमंती, घरात प्रतिष्ठा आणि समाजात मोठा दरारा… पण याच अलिशान घरांच्या चार भिंतींमागे दडलेला असतो राक्षसी भकासुरांचा भयावह चेहरा. याचा प्रत्यय देणारी एक संतापजनक घटना पुण्यातून समोर आली आहे. (Payal Zambare Case Pune)

ज्या घरात लक्ष्मीसारखी नांदायला गेली, त्याच आलिशान महालात पायल झांबरे या उच्चशिक्षित तरूणीचा पैसा, सोने आणि जमिनीच्या हव्यासापायी धनदांडग्यांनी छळ करत बळी घेतला. मन सुन्न करणाऱ्या या घटनेने अवघा महाराष्ट्र हादरला असून सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी पती अक्षय झांबरे याला बेड्या ठोकल्या आहेत, तर सासरच्या चौघांविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. (Payal Zambare News Pune)
५० तोळे सोने, २५ लाख रोख… तरीही हाव मिटली नाही!
पुण्यात व्यावसायिक असलेल्या झांबरे कुटुंबात आयटी क्षेत्रात कार्यरत असलेल्या उच्चशिक्षित पायल हिचा विवाह मोठ्या थाटामाटात झाला होता. माहेरच्यांनी लग्नात अंगावर तब्बल ५० तोळे सोने, २५ लाख रुपयांची रोख रक्कम आणि लग्नाचा ७० ते ८० लाखांचा खर्च असा कोट्यवधींचा चुराडा केला होता. मात्र, तरीही सासरच्या भकासुरांची पैशांची राक्षसी हाव संपली नव्हती. मयत पायलचा सतत छळ केला जायचा.

मुलगी जन्माला आल्याचा राग अन् जमिनीसाठी छळ
पायल हिने एका गोंडस मुलीला जन्म दिला; पण हीच तिची चूक ठरवून सासरच्यांनी तिचा मानसिक व शारीरिक छळ सुरू केला. मुलगी झाली म्हणून सततचे टोमणे, दिवाळी सणाला माहेरहून आणखी सोने आणण्यासाठी तगादा आणि माहेरची कोट्यवधींची जमीन झांबरे कुटुंबाच्या नावावर करण्यासाठी पायलवर अमानुष दबाव टाकला जात असल्याचा थेट आरोप माहेरच्या मंडळींनी केला आहे.
मृत्यूपूर्वी भावाला पाठवला निरोप; मुकुंदनगर हादरले
सोमवारी मुकुंदनगर परिसरातील आलिशान फ्लॅटमध्ये पायल झांबरे हिचा मृतदेह अत्यंत संशयास्पद अवस्थेत आढळून आला. मृत्यूपूर्वी पायल हिने आपल्या भावाला सासरच्या जाचाबाबत एक हृदयद्रावक मेसेज पाठवला होता. तो संदेश समोर येताच कुटुंबीयांच्या पायाखालची जमीन सरकली. या अमानुष त्रासाला कंटाळून तिने टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. या घटनेमुळे एका चार वर्षांच्या चिमुरडीचे मातृछत्र कायमचे हिरावले गेले आहे.
पती गजाआड, सासरच्या चौघांवर गुन्हे दाखल
या घटनेची माहिती मिळताच स्वारगेट पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. माहेरच्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी तात्काळ कारवाईचा बडगा उगारत मुख्य आरोपी पती अक्षय झांबरे याला अटक केली आहे. तसेच सासू, सासरे आणि नणंद अशा सासरच्या चौघांविरुद्ध विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उर्वरित आरोपींचा पोलीस शोध घेत असून या प्रकरणाचा पुढील तपास स्वारगेट पोलीस करत आहेत.
घरात कोट्यवधींची माया, दारात आलिशान गाड्या आणि समाजात मिरवली जाणारी खोटी प्रतिष्ठा… पण आत मात्र पैशांच्या हव्यासाने बरबटलेली सडकी मनोवृत्ती! लेक शिकली, स्वावलंबी झाली तरी धनदांडग्यांच्या दारात तिला विकत घेतलेल्या वस्तूप्रमाणेच वागवले जाणार असेल, तर ही केवळ एका घराची विकृती नाही, तर समाजात हुंड्याच्या हव्यासापायी सुरू असलेल्या जळजळीत समस्येचे ज्वलंत उदाहरण आहे.
अंगावरचे सोने आणि बँकेतला पैसा मोजणाऱ्या तथाकथित श्रीमंत भकासुरांना अनाथ झालेल्या त्या चार वर्षांच्या लेकीचा चेहरा शांत झोपू देईल का?