जामखेड टाइम्स वृत्तसेवा : ज्या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे डोळे लागले होते, त्या अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या सत्तेचा महाफैसला अखेर आज झाला आहे! पारंपरिक राजकीय हाडवैर गुंडाळून एकत्र आलेल्या राधाकृष्ण विखे पाटील आणि बाळासाहेब थोरात यांच्या ‘शेतकरी विकास सहकार पॅनल’ने बँकेच्या तिजोरीच्या चाव्या पुन्हा आपल्याच खिशात ठेवल्या.

मात्र, या एकतर्फी वाटणाऱ्या निवडणुकीत पारनेरमध्ये खासदार नीलेश लंके यांनी सत्ताधाऱ्यांना थेट अस्मान दाखवत मोठा राजकीय सुरुंग लावला आहे; तर अकोल्यात आमदार डॉ. किरण लहामटे यांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. तर दुसरीकडे विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघातील दोन्ही जागांवर आपल्या समर्थकांना विजयी करत जिल्हा बँकेत धडाकेबाज एन्ट्री केली.
२१ जागांच्या या रणसंग्रामात निवडणुकीआधीच पडद्यामागून मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. विखे-थोरातांच्या समझोत्यामुळे २१ पैकी तब्बल ११ जागा बिनविरोध पदरात पाडून घेण्यात आल्या होत्या. मात्र, उरलेल्या १० जागांवर निवडणूक लागली. या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. दुष्काळात उठलेले राजकीय वादळ काहीसे थंडावले.
पारनेरमध्ये निलेश लंकेंचा ‘डंका’
लोकसभेनंतर जिल्हा बँकेतही खासदार नीलेश लंके यांनी आपला करिष्मा कायम ठेवला. विखे-शिंदे गटाचे उमेदवार राहुल शिंदे यांना अक्षरशः पाणी पाजत लंके यांनी ६३ मते मिळवली, तर शिंदे यांना अवघ्या ४० मतांवर रोखले. लंके यांनी २३ मतांच्या फरकाने दणदणीत विजय खेचून आणला.
अकोल्यात आमदार लहामटेंचा पराभव
या निकालातील सर्वात मोठा भूकंप अकोले सोसायटी मतदारसंघात घडला. माजी चेअरमन सीताराम गायकर यांच्या कन्या संजीवनी शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार डॉ. किरण लहामटे यांचा पराभव केला. संजीवनी शिंदे यांना ४९ तर आमदार लहामटेंना ३६ मते मिळाली; लहामटे यांचा १३ मतांनी पराभव झाला.
कर्जतमध्ये प्रा. राम शिंदेंचा करिष्मा, राहुरीत तनपुरे सुसाट :
विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या होमपिचवर कर्जत सोसायटीतून त्यांच्या समर्थक ज्योती प्रकाश शिंदे यांनी ५४ मते घेत विरोधक तुषार अंबादास पिसाळ (२० मते) यांचा ३४ मतांनी धुव्वा उडवला. या निकालातून पिसाळ यांचे सहकारातील वर्चस्व मोडीत निघाले. तर राहुरीतून माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी ८९ मते घेत एकहाती बाजी मारली.
अहिल्यानगर जिल्हा बँक : निवडून आलेल्या सर्व २१ संचालकांची संपूर्ण यादी
१. जामखेड सोसायटी : सचिन घुमरे
२. अहिल्यानगर तालुका : आमदार अक्षय कर्डिले
३. राहाता सोसायटी : डॉ. सुजय विखे पाटील
४. नेवासा सोसायटी : शंकरराव गडाख
५. संगमनेर सोसायटी : रणजितसिंह देशमुख
६. कोपरगाव सोसायटी : बिपीन कोल्हे
७. पाथर्डी सोसायटी : आमदार मोनिकाताई राजळे
८. शेवगाव सोसायटी : राजश्रीताई घुले
९. श्रीरामपूर सोसायटी : करण ससाणे
१०. श्रीगोंदा सोसायटी : दत्ता पानसरे
११. बिगर शेती संस्था मतदारसंघ : सचिन जगताप
मतदानातून विजयी झालेले संचालक (१० जागा) :
१२. पारनेर सोसायटी : खासदार नीलेश लंके
१३. अकोले सोसायटी : संजीवनी शिंदे
१४. कर्जत सोसायटी : ज्योती प्रकाश शिंदे
१५. राहुरी सोसायटी : प्राजक्त तनपुरे
१६. शेतीपूरक संस्था मतदारसंघ : आमदार आशुतोष काळे
१७. महिला राखीव प्रतिनिधी (जागा १) : अनुराधा नागवडे
१८. महिला राखीव प्रतिनिधी (जागा २) : संगीता जयंत वाघ
१९. इतर मागासवर्गीय प्रतिनिधी (OBC) : कारभारी जावळे
२०. विमुक्त जाती/भटक्या जमाती प्रतिनिधी (VJNT) : गणपतराव सांगळे
२१. अनुसूचित जाती/जमाती प्रतिनिधी (SC/ST) : वैभव पिचड
आता खरी लढाई चेअरमनपदाची!
२१ शिलेदारांची फौज तयार झाली असली, तरी आता अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती बँकेचा ‘बॉस’ कोण होणार? चेअरमनपदाची खुर्ची विखे गटाकडे जाणार की थोरात गट त्यावर दावा ठोकणार? की सत्तावाटपाचा अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला ठरणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करत फटाक्यांच्या आतषबाजी करत जोरदार जल्लोष केला.