modi in pune : महाराष्ट्रात परतीच्या पावसाचा धुमाकूळ सुरु आहे. येत्या ४८ तासांत परतीचा पाऊस महाराष्ट्राला झोडपून काढणार असा इशारा हवामान विभागाने जारी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी (२६ रोजी) पुणे दौर्यावर येणार आहेत. मोदी यांच्या पुण्यातील सभेवर पावसाचे सावट घोंघावत आहे.
पुणे शहर व परिसरात परतीच्या पावसाचा जोर वाढला आहे. अनेक भागात मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. परतीच्या पावसामुळे राज्यातील अनेक भागात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. उद्या २६ रोजीही जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने जारी केला आहे. हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. तर २७ रोजीही मुसळधार पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या २६ सप्टेंबर २०२४ रोजी पुणे दौर्यावर येणार आहेत. पुण्यातील एस पी काॅलेजच्या मैदानावर त्यांची सभा पार पडणार आहे. या सभेची जय्यत तयारी सुरु आहे. परंतू गेल्या तीन दिवसांपासून पुण्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे मोदींच्या सभास्थळी चिखल आणि दलदल झाली आहे. चिखल झालेल्या ठिकाणी मुरुम व डांबर टाकण्याचे काम वेगाने सुरु आहे. परंतू पुण्यात मुसळधार पावसाचा इशारा अजूनही कायम आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा कशी होणार? याची चिंता आता मेट्रोच्या अधिकाऱ्यांना आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे मेट्रोच्या जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या दरम्यान धावणाऱ्या मेट्रो लाईनचे उद्घाटन होणार आहे. सदर कार्यक्रमाच्या सुरक्षा कारणास्तव जिल्हा न्यायालय मेट्रो स्टेशन पाच तास बंद राहणार आहे. त्यानंतर हे मेट्रो स्टेशन सायंकाळी ७ नंतर खुले होणार आहे.