मोठी बातमी: किरीट सोमय्या यांनी केले ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप !

भष्टाचाराचे पुरावे ईडीला देणार असल्याची सोमय्यांची घोषणा

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : राज्यात सत्तेवर असलेल्या महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांना अडचणीत आणण्याचा धडाका भाजपच्या नेत्यांनी लावला आहे.भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेत ठाकरे सरकारमधील आणखी एका मंत्र्यावर कोट्यवधींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला आहे.

ग्रामविकासमंत्री तथा अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याविरुद्ध ईडीकडे तक्रार करणार असल्याचे जाहीर केले आहे. या पत्रकार परिषदेत सोमय्यांनी २७०० पानांचे पुरावे माध्यमांना दाखवले. त्यामुळे मुश्रीफ यांच्यामागेही ईडीचा ससेमिरा लागण्याची शक्यता आहे. सोमय्यांच्या आरोपांमुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. ( Kirit Somaiya accuses Rural Development Minister Hasan Mushrif of corruption worth crores of rupees)

सोमय्या यांनी ठाकरे सरकारमधील काही मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केलेले आहेत. तशी यादी त्यांनी जाहीर केली होती. त्यानंतर आणखी एका मंत्र्यांच्या नावाची घोषणा करणार असल्याचं त्यांनी काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं. त्यानंतर सोमय्या यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे.

यावेळी त्यांनी २७०० पानांचे पुरावे असल्याचा आरोप केला आहे. ही सर्व कागदपत्रे प्राप्तिकर विभागाला देणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी मनी लॉन्ड्रिंगचा आरोप करत शेल कंपनीकडून मुश्रीफ यांच्या पुत्राने  दोन कोटीचे कर्ज घेतल्याचेही म्हटले आहे.उद्या ईडीकडे तक्रार करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. मुश्रीम परिवाराने साखर कारखान्यात काळा पैसा वळता केल्याचाही आरोप त्यांनी केला.

राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कुटुंबाने 127 कोटींचा घोटाळा केल्याचा गौप्यस्फोट सोमय्या यांनी केला आहे.हसन मुश्रीफ आणि परिवारांनी सरसेनानी संताजी धनाजी साखर कारखान्यामध्ये 100 कोटीहून अधिक भ्रष्टाचाराचा पैसा पार्क केला आहे. हे मी जबाबदारीने सांगत आहे. याबाबत उद्या मी मुंबई ईडीकडे अधिकृत तक्रार करणार आहे. 2700 पानांचे पुरावे देणार आहे असे सोमय्या म्हणाले.

परवा दिल्लीला फायनान्स मिनिस्ट्री, ईडी, कंपनी मंत्रालय यांच्याकडेही हे सर्व पुरावे देणार आहे. ठाकरे सरकारची डर्टी इलेव्हन घोटाळ्यात राखीव खेळाडूंची भरती चालूच राहणार आहे. माझ्याकडे दोन मंत्र्याच्या फाईल तयार होत्या. आज एनसीपीच्या मंत्र्यांचा घोटाळा उघड केला. कालांतराने दुसऱ्या मंत्र्याचा घोटाळा उघड करणार आहे, असं त्यांनी सांगितलं. (Kirit Somaiya accuses Rural Development Minister Hasan Mushrif of corruption worth crores of rupees)